80 160
Download Bookhungama App

वाईकर भटजी - धनुर्धारी (कै. रामचंद्र विनायक टिकेकर)

Description:

जन्मल्यापासून मरेपर्यंत, जी स्थिती प्राप्त होईल ती नकोशी असणे व नसेल ती हवीशी वाटणे, इत्यादी मनुष्यस्वभावाचे चित्र ‘वाईकर भटजी’त फार चांगल्या रीतीने रेखले आहे.प्रस्तावना प्रख्यात इंग्लिश कवी ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांची सर्वविश्रुत व सर्वमान्य कादंबरी व्हिकार ऑफ वेकफील्ड ( Vicar of Wakefield ) ही मूळची इंग्रजी कादंबरी प्रथमत: सन १७६६ साली प्रसिद्ध झाली. गोल्डस्मिथ कवी व लक्ष्मी यांचे अतिशय वाकडे ! त्याचा बहुतेक जन्म अत्यंत दारिद्र्यात व कर्जबाजारीपणात गेला. त्याने ही कादंबरी केवळ करमणुकीखातर लिहिली, व आपल्या आयुष्यांतील सर्व अनुभव तीत ओतला. गोल्डस्मिथचे चित्रकार मि. फॉर्स्टर म्हणतात : - “Rather as a refuge from the writing of books was this book undertaken. Simple to very boldness are the materials employed but he threw into the midst of them his own nature, his actual experience, the suffering, discipline, and sweet emotion, of his chequered life; and he made them a lesson and a delight to all men.” गोल्डस्मिथ एकदा पैशाच्या अतिशय अडचणीत असल्यामुळे ज्यांची त्याच्यावर पुत्राप्रमाणे प्रीती होती अशा डॉ. जॉनसन् बोवांनी मोठी खटपट करून एक गिऱ्हाईक त्या ग्रंथास पाहिले. तो अर्थात पुस्तके प्रसिद्ध करणारा एक गृहस्थ होता. त्याने थोडेसे पौंड देऊन ती कादंबरी विकत घेतली व पुढे काही दिवसांनी छापून ती प्रसिद्ध केली. तिची लोकप्रियता दिवसानुदिवस वाढत गेली. प्रसिद्ध कादंबरीकार वॉल्टर स्कॉट, प्रसिद्ध व खरा मुत्सद्दी एडमण्ड बर्क, जर्मनीचा प्रसिद्ध कवि गटे यांच्यासारख्या मोठमोठ्या विद्वानांनी व ग्रंथकर्त्यांनी गोल्डस्मिथच्या या लहानशा कादंबरीची फारच थोरवी गाईली आहे. युरोपातील दहा-बारा भाषांमध्ये त्या ग्रंथाची भाषांतरे झाली आहेत व हा ग्रंथ आपल्या इंग्रजी शाळांतून मुलांसही शिकवितात. वाईकर भटजी ही गोष्ट त्या कादंबरीचे अनुकरण होय. वस्तुत: मुळातल्या बहुतेक गोष्टी यात नाहीत म्हटले तरी चालेल. मूळच्या कादंबरीची ३२ प्रकरणे आहेत. वाईकर भटजी प्रस्तुत प्रसिद्ध झालेल्या भागात फक्त ११ प्रकरणे आहेत. पहिल्याच प्रकरणात पाहिले तरी बराच फरक दृष्टीस पडतो. मूळच्या इंग्लिश भटजींनी आपली बायको, आपली मुले आपले आप्त व इष्टमित्र व आपली गृहस्थिती या सर्वांचे थोडक्यात पण चटकदार वर्णन केले आहे. वाईकर भटजींनी पहिल्या प्रकरणाच्या बारा पानांपैकी आठनऊ पाने खर्चून आपल्या ‘गुणवती व समजूतदार’ गृहिणीचे शब्दचित्र दिले आहे, व राहिलेल्या दोन तीन पानांत आपला वडील मुलगा गोविंदा ऊर्फ बाळा, याचे थोडेसे वर्णन देऊन आपल्या दोन मुली आवडी व बगडी यांच्या लग्नासंबंधाची हकीकत सांगितली आहे. इंग्लिश भटजीस सहा मुले होती, चार मुलगे व दोन मुली. आमच्या वाईकर भटजींस पाचच आपत्ये-तीन मुलगे व दोन मुली. वेकफील्ड या गावाऐवजी वाईक्षेत्र. डॉ. प्रिमरोझच्या ऐवजी त्रिंबकभटजी. ऑलिव्हिया व सोफिया या दोन मुलींच्या ऐवजी आवडी व बगडी. डॉ. प्रिमरोझची बायको डिबोरा, तिच्या ठिकाणी अन्नपूर्णाबाई आली. असे सादृश्य हुडकीत जावे किंवा मूळच्या ग्रंथाची ओळख पटविण्यास जावे, तो पुढच्या प्रकरणातून मुळातील संविधानकाचा पत्ता लागत नाहीसा होतो. परंतु खरोखर पाहिले तर मूळच्या इंग्रजी कादंबरीशी धनुर्धारी यांनी लिहिलेली गोष्ट कितपत जुळते हे पाहण्याचे विशेष कारण दिसत नाही. वाईकर भटजी ही गोष्ट बहुतेक स्वतंत्रच अशी लिहिलेली आहे म्हटले तर चालेल. शिवाय ‘मूळच्या बिंबाशी मराठी वाचकांस काय करावयाचे आहे ? ’ असाही प्रश्न कोणी एखादा करील; आणि तेही खरेच आहे. वाईकर भटजी ही एक स्वकपोलकल्पित गोष्ट आहे असे समजून, तिचे संविधानक कसे आहे, तिची भाषा कशी आहे, गोष्ट कितपत मनोरंजक झाली आहे, तीत आणलेल्या पात्रांची चित्रे काढण्यात ग्रंथकाराचे कौशल्य कितपत दिसत आहे, वगैरे गोष्टींचा विचार हा मुख्य आहे. परन्तु, हा विचार विस्तारेकरून करण्याचे काम टीकाकाराचे अथवा पुस्तकपरीक्षकाचे आहे. हे काम माझे नाही. ही प्रस्तावना लिहिण्यात माझा मुख्य हेतू टीका करण्याचा किंवा पुस्तकपरीक्षणाचा नसून ग्रंथाच्या संबंधाने वाचकांस साधारण माहिती द्यावी एवढाच आहे. वाईकर भटजी ही गोष्ट विविधज्ञानविस्तार नावाच्या प्रसिद्ध मासिक पुस्तकातून प्रथम आली. हल्ली या गोष्टीची ११ प्रकरणे कर्त्यांनी लिहिली, ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहेत व त्यास भाग १ ला असे नाव दिले आहे. वाईकर भटजी ही गोष्ट प्रथम ‘विस्तारात’ वाचण्यात आली, तेव्हाच ती लोकप्रिय होईल असे मला वाटले होते. परंतु तिचे कर्ते कोण हे कळले नव्हते. पुढे शोधाअंती आपले मित्र ‘धनुर्धारी’ हेच ती गोष्ट लिहितात म्हणून कळले. त्यावरून त्यांस अशी विनंती केली की, आपला हा प्रयत्न खरोखरच चांगला आहे व ही गोष्ट पुरी करून स्वतंत्र पुस्तकरूपाने छापली असता महाराष्ट्रवाङ्मयात एका चांगल्या पुस्तकाची भर पाडल्याचे श्रेय आपणास मिळणार आहे. त्यांनी ती विनंती मान्य करून गोष्ट यथावकाश पुरी करण्याचे अभिवचन दिले. कार्यव्यापृतत्त्वामुळे समग्र गोष्ट त्यांस प्रसिद्ध करिता आली नाही. परंतु या गोष्टीचा दुसरा भागही ते लवकरच लिहून काढून प्रसिद्ध करतील, अशी आशा करून पुढे आलेला घास गोड करून घ्यावा, अशी धनुर्धारी यांचे तर्फे वाचकांस मी विनंती करीत आहे, भटजी मजकूर हे बऱ्याच लोकांची करमणूक करतील व त्यांनी जो आपला बोधप्रद वृत्तांत मनोरंजक रीतीने व उघड्या मनाने सांगितला आहे त्यापासून मनोरंजक व बोध हे दोन्ही लाभ वाचकांस होतील, असे मला वाटते. भटजींचा स्वभाव मोठा विनोदी दिसतो, तथापि त्यांचे अंगी सहनशीलता व विवेक पुष्कळ दाखविला आहे. आपणापैकी बहुतेकास संसारात येणारा अनुभव भटजींसही आला आहे. भटजींनी जे आत्मवृत्त कथन केले आहे, त्याचा हेतू त्यांनी आरंभीच दिला आहे तो असा : - ‘मी संसारयात्रेचा बराच लांबवर पल्ला मारिला आहे, त्यामुळे मला पुष्कळ गोष्टी कळलेल्या व नाना प्रकार माझ्या नजरेस पडलेले आहेत. माझ्या संसारयात्रेचे कथन बोधप्रद नाही तरी मनोरम असे इतरांस वाटण्याचा संभव आहे.’ आणि हा भटजींचा हेतू पुष्कळ अंशांनी सफल झाला आहे असे म्हणण्यास हरकत नाही.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)