40.00 87.00
Download Bookhungama App

व्यक्तिरंग - राजीव साबडे

Description:

'व्यक्तिरंग' हे व्यक्तिचित्रणांच संकलन आहे.बातमीदारीच्या धकाधकीतलं सर्वात मोठं समाधान असतं नानाविध माणसांना भेटण्याचं. गेल्या १७ वर्षांच्या बातमीदारीत ते मी भरपूर अनुभवलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांपासून, आपल्या छोट्या झोपडीपलीकडचं विश्वच माहीत नसणाऱ्यांपर्यंतचे, मानवी जीवनातले भिन्न भिन्न आविष्कार या काळात मला जवळून पाहायला मिळाले आहेत. या कालावधीत सामान्यासारखं राहूनही कार्यकर्तृत्वात असामान्यत्व दाखवणारी माणसं दिसली, तशीच मोठ्या समजल्या जाणाऱ्या काहींची ओंगळ स्वरूपही पाहायला मिळाली. कुठलीही दोन माणसं सारखी नसतात आणि ज्याच्यात दोषच नाही असे कल्पनेतले आदर्श तर अस्तित्वातच नसतात. पण तेवढ्यावरून चांगली माणसं हल्ली राहिलीच नाहीत असं मानण्याचं कारण नाही. सध्याच्या आत्मकेंद्रित जगात स्वतःपलीकडचा विचार करणारी आणि काहीतरी वेगळं घडवणारी माणसं फार थोडी भेटतात, हे खरंच आहे. पण अशी माणसंही असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रांत ती आढळतात, हे पत्रकारितेतल्या वाटचालीत मी अनेकदा अनुभवलं आहे. अशी माणसं आपल्या वेगळेपणानं आणि कर्तृत्वानं संपर्कात येणाऱ्यांच्या मनावर ठसा उमटवतात.

सकाळचा वार्ताहर म्हणून काम करताना अशा काही व्यक्तिमत्त्वांनी मला प्रभावित केलं, काहींनी भारावून टाकलं. त्यांतल्या काही जणांशी जवळून परिचय झाला, काहींशी व्यक्तिगत स्नेहसंबंध निर्माण झाले. दुर्दैवानं वार्ताहराची लेखणी आणि ही कर्तृत्ववान माणसं यांचा संबंध क्वचित येतो. येतो तोही कधीतरी होणारे त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम, सन्मान किंवा भाषणे यांच्यापुरता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकांना माहीत नसणारे अद्भुत पैलू मांडायची संधी सहसा कधीच मिळत नाही. पुण्याच्या सार्वजनिक जीवनातल्या काही निवडक व्यक्तिमत्वांच्या विविध पैलूंची माहिती करून देणारं सदर मीरविवार सकाळमध्ये लिहावं असं सकाळचे संपादक विजय कुवळेकर यांनी सुचवलं. अशी माणसं लेखनासाठी निवडणं तसं सोपं असलं, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले बहुविध रंग माझ्यासारख्या वार्ताहराची लेखणी कितपत समर्थपणे उतरवू शकेल याबद्दल माझ्या मनात शंका होती. माझ्यापेक्षा श्री. कुवळेकर यांनी त्या बाबतीत अधिक विश्वास दाखवला. क्रिकेटमहर्षी प्रा. दि. . देवधर यांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं जानेवारी १९९२ मध्ये त्यांच्यापासून सुरू केलेलंव्यक्तिरंगहे पंधरवड्याचं सदर संपूर्ण वर्षभर चाललं. वाचकांनी वेळोवेळी स्वतःहून दिलेल्या पसंतीच्या पावतीमुळे ते चालू ठेवण्याचा हुरूप टिकून राहिला. अनिल उपळेकर यांनी काढलेल्या रेखाचित्रांनी हे सदर आकर्षक बनवलं.

व्यक्तिरंगमधील २३ व्यक्तिमत्त्वं तशी एकमेकांपेक्षा अत्यंत भिन्न आहेत. त्या सर्वांत एक समान धागा काही असेल तर तो धडपड्या वृत्तीचा आहे. त्यामुळेच या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रातून किंवा आपल्या छंदातून पुण्याच्या सार्वजनिक जीवनास मोठं योगदान दिलं आहे. जीवनातल्या संघर्षातून त्यांनी आपली व्यक्तिमत्त्वं अधिक संपन्न केली आहेत आणि त्याचा लाभ समाजाला मिळवून दिला आहे. ही माणसं दोषरहित आहेत असं मुळीच नाही. त्यांच्यातही कमी-अधिक प्रमाणात अवगुण, त्रुटी, दोष आहेत. त्यांच्यातल्या काही जणांच्या बाबतीत दोष शोधावे लागतील, तर काहींचे ते जगजाहीर असतील. पण त्यांच्या गुण-दोषांचा तौलनिक अभ्यास करून अल्पचरित्र वाचकांपुढे ठेवणं हाव्यक्तिरंगचा उद्देश नाही. या वेगळ्या माणसांमधील आगळेपणा आणि त्यातून उभ्या राहिलेल्या त्यांच्या कर्तृत्वसंपन्न जीवनाची ओळख करून द्यावी, एवढाच मर्यादित हेतू त्यामागे आहे. यांपैकी काही जणांचं जीवन असामान्य प्रसंग आणि अनुभवांनी भरलेलं आहे. एखाद्या प्रतिभासंपन्न लेखकानं या व्यक्तिरेखांचं सौंदर्य आणि सामर्थ्य कितीतरी अधिक प्रभावीपणे चितारलं असतं. हा माझा विनय वगैरे अजिबात नाही. या व्यक्तींना ओळखणारे वाचक नक्कीच या मताला दुजोरा देतील.

सदराच्या लेखनात काही मोठ्या अडचणी उद्भवल्या. ते सुरू झाल्यावर तिसऱ्याच महिन्यात झालेल्या अपघातानं मला दीड महिना अंथरुणावर खिळवून ठेवलं. त्याआधी आणि नंतर अयोध्येतील घडामोडींच्या वृत्तांकनासाठी अनेकदा तिथे जावं लागलं. या काळातहीव्यक्तिरंगमध्ये खंड पडू नये यासाठीसकाळचे संपादक श्री. कुवळेकर आणि वृत्तसंपादक किशोर कुलकर्णी यांनी सतत सहकार्य आणि प्रोत्साहन दिलं. माझे शेजारी आणि मित्र सुरेशचंद्र वारघडे यांनी या लेखांचं पुस्तक व्हावं यासाठी माझ्यापेक्षा अधिक उत्साह दाखविला. उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी आणि मुखपृष्ठाचे चित्रकार चारुहास पंडित यांनी लेखमालिकेला ग्रंथरूप देण्यात मोलाचं सहकार्य दिलं. या सर्वांचा मी ऋणी आहे. सर्वात मोठं ऋण आहे तेसकाळच्या असंख्य वाचकांचं. ‘रविवार सकाळमध्ये हे सदर येत असताना पत्राद्वारे, टेलिफोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून अनेकांनी दिलेला प्रतिसाद ही या लेखनामागील सर्वांत मोठी प्रेरणा होती. वाचकांच्या प्रेमळ आग्रहाचा हा रेटा नसता तर एक पुस्तक व्हावं एवढं लेखन वर्षभर सातत्यानं माझ्या हातून घडूच शकलं नसतं.

 

राजीव साबडे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि