Id SKU Name Cover Mp3
Vyaktidarshan


60.00 116.00
Download Bookhungama App

व्यक्तिदर्शन - डॉ. सुरेश गरसोळे

Description:

डॉ. सुरेश गरसोळे हे माणसांचे, त्यातही वैशिष्ट्यपूर्ण माणसांचे प्रचंड चहाते-भोक्ते आहेत आणि त्यामुळंच त्यांनी सुमारे सत्तर अशा ‘खास’ मंडळींचं थोडक्यात पण परिपूर्ण स्वभावदर्शन घडवणारा ‘व्यक्तिदर्शन’ या नावाचं म्हटलं तर सचित्र पुस्तक, म्हटलं तर ग्रंथ तयार केला आहे. ते त्यांच्या या मनोगतात खरं तर व्यक्तिदर्शनामागं असणारं व्याकरणच सांगताना दिसतात

 व्यक्तिदर्शनाच्या निमित्ताने .....

मला भावलेली भारतरत्न, वारकरीरत्न, भागवताचार्य, गीतावाचस्पती, भूगोलमहर्षी, तर्कतीर्थ, साहित्यिक, समाजसेवी, शिक्षण-भाषा-भूगोलतज्ज्ञ, नाट्यकर्मी, दिग्दर्शक, माध्यम प्रतिनिधी-तज्ज्ञ, काही प्रकाशक खरोखरच ही दर्शनीय, अनुकरणीय, आदरणीय व्यक्तिमत्त्वेयांचा प्रातिनिधिक, समावेश व्यक्तीदर्शनात आहेच. त्याचबरोबर काही सामान्यांमधील असामान्य गुण यात आहेत.

गेल्या चाळीस वर्षात मला अनेक व्यक्तीमत्त्वे भेटली, नव्हे मीच या ना त्या कारणाने अनेकांना भेटलो, संपर्कात आलो, बोललो, बसलो, चर्चा, संवाद, वाद-प्रतिवाद साधला, त्यांच्याकडून वेळोवेळी खूप काही अनुभवजन्य ज्ञान, कृतीशील सज्ञान आणि शिस्तशीर कर्तृत्व पाहिले. त्यावर मी भाळलो, प्रेरित झालो. म्हणूनच त्यांच्यावर प्रसंगोपात सत्कारार्थ, कृतज्ञतेने, भाविकतेने, समीक्षेने आणि सतर्कतेने लिहित गेलो, त्यातले बरेच लेखन प्रसिद्ध पावले. अर्थात हा माझा वैयक्तिक स्वानुभव शब्दबद्ध केला आणि मीच संपन्न आणि श्रीमंत झालो त्यांच्या तत्कालिन, प्रासंगिक सहवासाने, प्रेमाने, मायेने आणि उदारतेने. त्यांचे संपूर्ण व्यक्तीमत्त्व कवेत घेण्याचा अथवा उलगडण्याचा माझा प्रयत्न नाही आणि ते मला शक्यही नाही, फक्त मला भावलेल्या व्यक्तीमत्वापैकी काहींचे हे शब्ददर्शन, मला वाटले, आवडले तसे!

त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाला आकार, प्रकार आणि उच्चार लाभला. त्याचे हे व्यक्तीदर्शन माझ्याबरोबरच माझ्या कुटुंबियांनाही घडलं. यामागील हेतू वाचकांनाही त्यातून काही व्यक्तीदर्शने घडावीत, आवडावीत किंबहुना पुनःप्रत्ययाचा आनंद-योग यावा हाच आहे. आपणही त्यांच्या व्यक्तिदर्शनाने, अनुभवाने भारावलेले क्षणकालावधी इतरेजनांना, औत्सुक्यप्रिय व्यक्तींना, मित्र-मैत्रिणींना, आप्तेष्टांना, समविचारी नागरिकांना, वाचकांना वाटावा, आनंद लुटावा, समाधान वाटावे, कृतज्ञता आणि कृतार्थता अनुभवावी.

अशा व्यक्ती म्हणजे आपले गुरू, मित्र, सखा, सोबती, मार्गदर्शक, काळजीवाहक आणि प्रोत्साहक असतात. त्याचे माझ्या आयुष्यात येणे, त्यावर मी काही लिहिणे आणि पुस्तकरूपे प्रसिद्ध करणे यात प्रकाशकही श्रेयाला पात्र आहेत.

अशी बरीच क्षेत्रे आणि संस्था आहेत, त्यातील सर्व प्रत्यक्षानुभव आहेत. ना ऐकीव ना साचेबंद. त्यामध्ये कृतज्ञता, वाढदिवस, अमृतमहोत्सव, षष्ठ्यब्दी, श्रद्धांजली, आठवणी इत्यादी प्रसंगोचित व प्रासंगिक लेखन मी त्याच तन्मयतेने केले व बहुतांशी वेळोवेळी प्रसिद्ध झाले. परंतु त्यात अद्ययावतता, वाचनीयता आणून ते वाचकांपर्यंत ग्रंथरूपाने पोचावे यासाठी ज्येष्ठ बालसाहित्यिकार दत्ता टोळ आणि कन्या प्रा. मुक्ता गरसोळे कुलकर्णी आणि लेखकमित्र रमेश पेठे यांचे सहकार्य मोलाचे आहे.

माझ्या फोटोग्राफीच्या छंदातून संकलित केलेल्या व काढलेल्या फोटोंमधील प्रासंगिक फोटोंमधून दुर्मीळ  दर्शन आणि पुनर्भेटीचा आनंद लाभेल तो घ्यावा व वाटावा.

विविध प्रकारच्या व्यक्तींच्या संगतीने मला आकार आणि प्रकार लाभला, विकार दुरावून माझे व्यक्तीमत्त्व साकार, साक्षेपी होण्यास सहाय्य झाले. संतसंगती लाभो सदा, असे संत म्हणतात, त्याचा प्रत्यय आला म्हणूनच तुकोबांच्या शब्दात सांगायचे तर

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा!

कारण ही सर्व तीर्थस्वरूप मंडळी म्हणजेच त्या त्या क्षेत्रातील संतसंगतीच, आणि त्यांचा विसर न व्हावा ही प्रार्थना, याची देही, याची डोळा, याच शब्दी!

 

डॉ. सुरेश गरसोळे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि