12 80
Download Bookhungama App

विनू मिनूची परदेशी सफर - लीलावती भागवत

Description:

विनू मिनू सांगत आहेत त्यांच्या पहिल्या परदेश सफरीचे अनुभव.



बरं का मुलांनो, काही दिवसापूर्वी एका संस्थेने मुलांसाठी एक स्पर्धा लावली होती. तिकिटांचा संग्रह करण्याची. वेगवेगळ्या देशांतली सुंदर, अर्थपूर्ण तिकिटं जमवायची आणि त्यांचा आकर्षक संग्रह करायचा. ज्यांचा संग्रह उत्तम ठरेल त्यांना बक्षीस मिळणार होतं. बक्षीस कोणतं तर दहा देशांची सफर करण्याचं. ऑस्ट्रेलिया, बर्फाच्या प्रदेशातले काही देश आणि युरोप, आशिया, आफ्रिका या खंडातले काही असे हे दहा देश. तुमच्या एवढ्या बऱ्याच मुलांनी स्पर्धेत भाग घेतला. आणि पहिलं बक्षीस विभागून मिळालं दोन मुलांना, मिनू आणि विनू दोघांना. विनू १२ वर्षाचा आणि मिनू १० वर्षाची. दोघांची जाण्याची तयारी झाली. पहिलाच विमान प्रवास आणि तो इतक्या लांबचा. पण मुलं मजेत होती. कारण त्यांना वेगवेगळे दहा देश बघायला मिळणार होते. त्या देशांत त्यांनी काय काय बघितलं? प्रत्येक देशातले लोक राहतात कसे, त्यांची घरं कशी असतात, जेवणखाण कोणतं घेतात, त्यांचे पोशाख कसले असतात, त्यांचे खेळ कोणते, सण उत्सव कोणते, शिवाय त्या त्या देशांत बघण्यासारख्या वस्तू, इमारती, झाडं, जंगलं, धरणं सगळं विनूमिनूने बघितलं. तिथल्याच कुटुंबात ती दोघं राहिली. त्या त्या ठिकाणचे पोशाख घातले. त्या त्या देशांतली भाषा... हो! त्यांना कुठे सगळ्या भाषा येत होत्या? पण थोडं थोडं इंग्रजी येत होतं, हिन्दी येत होतं. तिकडच्या कुणाला तरी इंग्रजी यायचं, अरब देशात यांचं हिन्दी उपयोगी पडलं. कधी कुणी दुभाषा भेटायचा. आणि सरते शेवटी खाणाखुणा, हातवारे यांची भाषा होतीच की बोलकी. या सगळ्यांमुळे त्यांना अडचण नाही आली. अर्थात त्यांनी जे पाहिलं, ते तुमच्यासारख्या आपल्या मित्र मंडळीना सांगावंसं वाटलं त्यांना. म्हणून त्यांनी हे तुम्हाला या पुस्तकात सांगितलंय्. शिवाय पटकन कळावं, वाचायला अडचण होऊ नये म्हणून तुमच्यासाठी सगळं मराठीतच त्यांनी सांगितलंय् बरं का. तर मग आता तुम्ही पण चला त्यांच्याबरोबर या परदेश सफरीला! लीलावती भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि