Id SKU Name Cover Mp3
Vikreechi Bara Sutre


30.00 58.00
Download Bookhungama App

विक्रीचीं १२ सूत्रे - शं. वा. किर्लोस्कर

Description:

या छोटेखानी पुस्तकावरून मालाची विक्री करण्याचे तुमचे काम बरेच सुलभ होऊ शकेल. या पुस्तकाचा दुसराहि एक उपयोग होऊ शकेल. तो असा की मालाची विक्री आपोआप घडून येत नसून प्रयत्न केल्यास आपल्या ग्राहकांची संख्या वाढेल तितकी वाढविता येते हे या पुस्तकावरून स्पष्टपणे लक्षात येईल व स्वतःच्या व्यापाराची वाढ करण्यासाठीही आपण काही उपाय करावे अशी स्फूर्ति येईल. इच्छा झाली की मार्ग सुचतो या म्हणीप्रमाणे अशा स्फूर्तीपासून अनेक नव्या कल्पना प्रत्येकास सुचून स्वतःचा फायदा करून घेता येईलविषय प्रवेश

तुमचा उद्योग धंदा अथवा पेशा वाटेल तो असो, तुम्ही उत्तम विक्री करणारे असाल तरच त्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल.

दुकान मांडून बसलेले व्यापरी अथवा माल तयार करणारे कारखानदार यांसच विक्रीचे काम करावे लागते असे नाही. समाजाला उपयोगी असा एखादा व्यवसाय करणारा कोणीही मनुष्य असो, तो काहीना काही विकीतच असतो. मग ती हाताने उचलून देण्याजोगी कसली वस्तू असो अथवा समाजाला जरूर असणारे एखादे काम असो.

वाणी उदमी प्रपंचासाठी लागणारे सामानसुमान व निर्वाहाचे पदार्थ विकतात.

कुंभार कौले विटा इत्यादी विकतात. इंजिनिअर घराचा नकाशा विकतो. गवंडी आपली मेहनत विकतो. एकाकडून, माल दुसऱ्याकडून कल्पना व तिसऱ्याकडून मेहनत विकत घेऊन आपण आपले घर बांधतो.

कोणी विचारतील वकीलसुद्धा विक्री करणारेच काय? अलबत्, आपल्यास ते कायद्याचा सल्ला व न्यायासनापुढील वक्तृत्व विकत नाहीत काय? त्यांचाकडे काम घेऊन चला म्हणजे ते आपला शब्द कस्तुरीप्रमाणे कसे तोलून विकतात ते दिसून येईल.

एक गांवढळ मनुष्य रस्त्यातून जात असता त्याला दहा रुपयांची एक नोट सापडली. ती घेऊन तो एका वकिलाकडे गेला. व म्हणालारावसाहेब ही नोट खरी आहे का खोटी एवढे मेहरबानी करून सांगाल काय?”

वकिलाने ती नोट खिशात घातली व त्या गांवढळाच्या हातावर पाच रुपये ठेवून म्हटले, “तुझी नोट खरी आहे जा.”

गांवढळ म्हणाला, “माझी दहाची नोट होती ना? मग तुम्ही पाचच कसे देता?”

वकीलाने सांगितलेपाच रुपये माझ्या सल्ल्याची किंमत बरे का.”

डॉक्टर लोक आपल्यास आरोग्य विकतात; शाळा कॉलेजे शिक्षण अथवा एखादी कला विकतात; आगगाड्या, मोटारी, टांगे प्रवास विकतात; नाटके, सिनेमा मनोरंजन विकतात; हरदास, पुराणिक परमार्थ विकतात. अशा रीतीने पाहू लागल्यास जग हा एक प्रचंड बाजार असून त्यात मोळीविक्यापासून मिलच्या मालकापर्यंत, रस्ते झाडणाऱ्या पासून राजवैद्यापर्यंत, प्रत्येकजण काहीना काही विकण्यात गुंतला आहे असे दिसून येईल.

आमचे ऐवढे सार्वभौम ब्रिटिश सरकार पण त्यांची दृष्टी तरी काय आहे? त्यांचे अनेक डाव पेच कशासाठी चालू असतात? एकाच मुख्य गोष्टीसाठी, आणि ती ही की आपल्या ब्रिटिश मालाची विक्री हिंदुस्थानात व इतरत्र अव्याहत व वाढत्या प्रमाणात चालू राहावी.

विक्री हा व्यापारातील प्राण आहे. विक्री मंदावली अथवा थांबली की व्यापाऱ्यांच्या नाड्या आखडतात व विक्री जोराने होत असली म्हणजे व्यापार भरभराटीस येतो. असेच कोणत्याही देशात व कोणत्याही काळी तुम्हास आढळून येईल.

व्यापारी लोक लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून तिची आराधना व पूजा करितात. परंतु लक्ष्मी ही केवळ विक्रीची पाठराखीण आहे. विक्री देवता प्रसन्न झाली की तिच्या मागोमाग लक्ष्मी आपोआप येत असते. परंतु लक्ष्मीच्या छणछणाटाने व चकचकाटाने तीच लोकांचे लक्ष प्रथम वेधून घेते आणि व्यापारांत विक्रीकडे लक्ष देण्याऐवजी लक्ष्मीचाच लोक अधिक बडेजाव करितात. परंतु ही केवळ त्यांची दिशाभूल आहे.

इतर कलांप्रमाणे विक्री करणे ही सुद्धा एक कला आहे. व्यापाराचे ते एक स्वतंत्र व प्रमुख अंग आहे. अलीकडच्या काळात तर त्यांचे एक शास्त्रच निर्माण होत आहे. या कलेचा व शास्त्राचा अभ्यास करून जे उत्तम विक्रीयकार होतील त्यांना आपले पोट कसे भरेल ही चिंता उरणार नाही.

सध्या तर असे दिवस आले आहेत की, विक्री कशी करावी याचे भरपूर ज्ञान नसेल तर माणसाचा कोणत्याही धंद्यांत टिकाव लागणे मुष्किल होऊन बसले आहे. लहानसा खाजगी धंदा असो अथवा मोठ्या कंपन्या असोत, सर्वांना चढाओढीने सतावून सोडले आहे. ग्राहकाला आपल्याकडे ओढून घेण्यासाठी सर्वत्र झगडा चालू आहे. त्यात ज्यांचा जोर विशेष असेल, विक्री कशी करावी याचे ज्यांस अधिक ज्ञान असेल त्यांचीच सरशी ठरलेली असते.

आमचे स्वदेशी धंदे उर्जितावस्थेत आणण्यास माल कसा विकावा या विषयाचे सांगोपांग शिक्षण मिळविणे आवश्यक आहे. स्वदेशी धंद्यांच्या मार्गात अनेक अडचणी आहेत हे निःसंशय आहे. तथापी आमचे नवीन निघणारे बरेच धंदे अल्पायुषी का होतात अथवा जीव धरून राहिले तरी त्यांची जोमाने वाढ का होत नाही याचे एक मोठे कारण विक्री कशी करावी या संबंधाने आपले ज्ञान पार कच्चे व अपुरे असते असेच आढळून येईल.

पाश्चात्त्य लोक ज्याप्रमाणे माल तयार करण्याच्या बाबतीत तरबेज आहेत त्याप्रमाणे तो विकण्याच्या बाबतीतही तरबेज आहेत. रोज नव्या युक्त्या व नवे प्रकार लढवून गिऱ्हाइके काबीज करण्याचा त्यांचा सपाटा सारखा चालू असतो. अशा जबरदस्त प्रतिस्पर्यांालशी आपल्यास टक्कर द्यायची आहे हे नीट ओळखून स्वदेशी उद्योग करताना केवळ विलायतच्या तोडीचा माल काढूनच आपला निभाव लागणार नाही, तर त्यांच्याप्रमाणे आपणही विक्री शास्त्राचा अभ्यास करून आधुनिक विक्रीच्या पद्धतींची व उपायांची आपल्या मालाला जोड दिली पाहिजे.

विक्री कशी करावी यासंबंधी माहिती असणे प्रत्येकाला किती अगत्याचे आहे हे यावरून आपणास कळून येईल. प्रत्येकाच्या उत्कर्षाशी याविषयाचा निकट संबंध आहे व एवढ्यासाठीच विक्रीच्या बाबतीत सर्वत्र लागू होतील व सर्वांना अनुसरता येतील असे १२ ठळक सिद्धांत या पुस्तकाच्या द्वारे आपल्यापुढे ठेवीत आहोत.

विक्री कशी वाढवावी असा ज्यांना प्रश्न पडला असेल अथवा, जे कोणत्याही व्यापारात नवीन शिरत असतील त्यांनी ही लेखमाला लक्षपूर्वक वाचावी. आपल्या धंद्यात पुढे येण्याचे अनेक नवे मार्ग नव्या कल्पना त्यांस यावरून सुचतील


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि