40.00 96.00
Download Bookhungama App

वेगळे व्यवसाय वेगळ्या वाटा - चंद्रशेखर जोशी

Description:

आजूबाजूला असूनही अज्ञात राहीलेल्या चाकोरी बाहेरील व्यवसाय- विश्वांची माहिती द्यावी, या हेतूने लिहिलेली ही एक लेखमाला चंद्रशेखर जोशी यांचे हे पुस्तक, नावाप्रमाणे, खरोखरच व्यवसाय मार्गदर्शनाचे नवे दालन खुले करणारे आहे. केवळ इंजिनियरिंग व मेडिकल या सरधोपट मार्गावरून धावणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इतर अनेक आव्हानात्मक क्षेत्रात संधी कशी उपलब्ध आहे. याची झलक या पुस्तकात पाहायला मिळते. नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी (एन. डी. .) महाराष्ट्रात आहे, परंतु महाराष्ट्र एन. डी. . मध्ये नाही असे अनेक वर्षे म्हटले जायचे. सध्या तेथे काय स्थिती आहे माहीत नाही, परंतु लढवय्यांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना सेनादलातील करिअरचे अधिक आकर्षण का वाटू नये याचे कोडे अनेकांना वाटते.

एन. डी. . पुरतेच हे मर्यादित आहे असे नाही. पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूट सारखी राष्ट्रीय संस्था गेली पंचवीस वर्षे अस्तित्वात आहे. शबाना आझमी पासून नसिरूद्दिन शहा पर्यंत तेथील अनेक विद्यार्थ्यांनी चित्रपटसृष्टीत चांगले नाव कमावले. मराठी तरूण मात्र इन्स्टिट्यूटच्या आवारात पाऊल टाकायचे धाडस क्वचितच करतो.

मंत्रालयात गेलात तर आय. . एस. केडरमधील बहुतेक नावे मराठीतर असतात. अनेक जिल्हाधिकारीही इतर भाषिक असतात. महाराष्ट्रीय तरूणांना प्रशासकीय सेवेचे वावडे का असावे? बुद्धिमत्ता, परिश्रम करण्याची तयारी, आर्थिक क्षमता, शिक्षणाची संधी अशा सर्व गोष्टी अनुकुल असूनही महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थी अशा तऱ्हेच्या वेगळ्या मार्गाने जात नव्हते याचे कारण एका विशिष्ठ तऱ्हेच्या करिअरचा त्यांच्या मनावर बसलेला जबरदस्त पगडा. महाराष्ट्रीय तरूणांचा ओढा आधी नोकऱ्यांकडे! स्वतंत्र उद्योग, व्यवसाय करण्यासाठी लागणारी जिद्द आणि धाडस कमी. मग नोकऱ्यांतही इंजिनियरिंग आणि अगदीच स्वतंत्र व्यवसाय म्हणजे डॉक्टरकीचा. परंपरेने निर्माण झालेले हे मानसिक ओझे फेकून देण्यासाठी, कार्यकर्तृत्वासाठी भरपूर आव्हान असलेल्या नवनव्या क्षेत्रांत कशी संधी उपलब्ध आहे याची माहिती, विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सातत्याने देणे आवश्यक आहे. पालक आणि विद्यार्थी या दोघांनाही अशा तऱ्हेच्या माहितीची किती मोठ्या प्रमाणावर गरज असते, याचे अगदी ताजे उदाहरण द्यायचे तरसाप्ताहिक सकाळचे देता येईल. दहावी / बारावी मधील विद्यार्थांसाठी काढलेला व्यवसाय मार्गदर्शन विशेषांकाला राज्याच्या सर्व भागातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांना अशा तऱ्हेच्या वेगळ्या अभ्यासक्रमांची माहिती देणारी लेखमालासाप्ताहिक सकाळने सुरू केली, त्याचाही मूळ उद्देश हाच. केवळ अभ्यासक्रमांची नावे देऊन उपयोगाचे नाही, त्यासाठी कशा तऱ्हेची पूर्वतयारी करावी, आणि या व्यवसायात करिअर करण्याच्या संधीचे स्वरूप काय आहे यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असावे म्हणून संबंधित क्षेत्रातील जाणकारांच्या मुलाखती घेऊन अद्ययावत माहिती देण्याचा आमचा प्रयत्न होता. त्या लेखमालेचे उत्तम स्वागत झाले, आणि त्यातूनच चंद्रशेखर जोशी यांच्या या पुस्तकाचा जन्म झाला. चंद्रशेखर जोशींचा आवर्जुन उल्लेख करावा असा गुण म्हणजे चिकाटी. त्या विषयांची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय आणि संबंधित तज्ज्ञ व्यक्तीची भेट झाल्याशिवाय त्यांनी आपला लेख कधी पूर्ण केला नाही. संपादकाचे समाधान होईपर्यंत पुनर्लेखन करण्याचा त्यांचा उत्साहही अपरिमीत होता. त्यामुळे या पुस्तकातील प्रत्येक लेखाला तपशीलाची परिपूर्णता व करिअरकडे पाहाण्याचा स्पष्ट दृष्टीकोण लाभला आहे आणि त्याचे संदर्भमूल्यही वाढले आहे. अशा तऱ्हेच्या विषयावरील पुस्तकांपेक्षा या पुस्तकाचे हे वैशिष्टच म्हणावे लागेल.

या पुस्तकात आले नाहीत असे आणखी विषयही बरेच आहेत, आणि दरवर्षी त्यात भरच पडत आहे. त्या क्षेत्राचा सातत्याने मागोवा घेऊन दरवर्षी नवी आवृत्ती प्रकाशित करता आली तर त्यांचे पालक व विद्यार्थ्यांकडून स्वागतच होईल. स्वतःची पूर्ण वेळ नोकरी सांभाळून असे वेगळे उद्योग करण्यासाठी लागणारा उत्साह चंद्रशेखर जोशी यांच्याकडे पूरेपूर आहे. त्यांना त्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

 

- सदा डुंबरे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि