Id SKU Name Cover Mp3
Vasant Bahar


60 116
Download Bookhungama App

वसंत-बहार - संपादन : संध्या देवरुखकर

Description:

या पुस्तकनिर्मितीमागचा उद्देश एकच की एका महान अवलियांच्या सुरांची ओळख नव्या पिढीला करून द्यावी, शब्दांच्या माध्यमातून एक सांगितिक व्यक्तिमत्त्व रसिकांपुढे उलगडावे. सुरांच्या दौलतीची गुहा पाहण्यासाठी या पुस्तकाचा पासवर्डसारखा उपयोग व्हावा हीच नम्र भावना आहेआरोही

आपण वसंतराव देशपांडे यांच्या संगीत कारकिर्दीवर एक गौरवग्रंथ काढू या. त्याचं संपादन तुम्ही करा!” असं उत्कर्ष प्रकाशनच्या सु. वा. जोशींनी मला सांगितलं आणि मी अगदी मोहरून गेले. त्याच वेळी मला जाणवलं की हा तर शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न आहे. वसंतरावांची गायकी उलगडून सांगायची माझी लायकी नाही, पात्रता नाही; पण वसंतरावांबद्दल कलाक्षेत्रातल्या दिग्गजांचे उद्गार एकत्रित करण्याची संधी या निमित्ताने मला लाभणार होती. मग सुरांच्या यशाकरिता समिधा गोळा करण्याची माझी धडपड चालू झाली; आणि समुद्रकिनारी पसरलेल्या मऊशार रेतीतून कोणकोणत्या रंगांचे शिंपले वेचू? असं काहीसं झालं. वसंतरावांना इहलोक सोडून तीस वर्षापेक्षा अधिक काळ लोटला. त्यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकलेले. त्यांच्या मैफलीत सुखावलेले रसिक आणि समकालीन कलावंतही आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत. पण या मनस्वी कलावंतावर अनेक लोकांनी अगदी भरभरून प्रेम केले आहे असे माझ्या ध्यानात आले.

वसंतरावांची ज्येष्ठ कन्या आशा ही माझी बालमैत्रीण. आशा वडुजकर. सध्या ती ऑस्ट्रेलियात सीडनीजवळ रहाते. माझं आजोळ वसंतरावांच्या वास्तव्यामुळे सुप्रसिद्ध (?) बनलेल्या त्याच चाळीत होतं. त्यामुळे या साध्या, सालस देशपांडे कुटुंबीयांशी माझा खूप जवळचा परिचय होता. वसंतरावांचे तानपुरे नाडकर्णींच्या पौर्णिमा बंगल्यात असायचे. तिथे काहीतरी निरोप सांगायला पळतपळत आशाबरोबर गेलेलं मला अंधुक आठवते आहे. एका खोलीतल्या बिऱ्हाडात झोळीत बसून, पान खात डुलणारी ती. ताईंची म्हणजे वसंतरावांच्या आईची मूर्ती माझ्या डोळ्यात साठली आहे. त्यांच्या हातची तव्यावरची गरम पोळी मी खाल्ली आहे. बापू नंदाबरोबर पत्ते खेळले आहेत. आशाची आईविमलताईम्हणजे मांगल्याचं, सात्त्विक रूप! नावाला साजेल असंच निर्मळ व्यक्तिमत्त्व! त्या मानाने आशाच्या बाबांशी म्हणजे वसंतरावांशी माझा फारसा परिचय नव्हता. कारण एकतर त्यांचा दबदबा आणि त्यांची घरातली विरळ उपस्थिती! पण सवाई गंधर्व उत्सवात आशासोबत पहिल्या रांगेत बसून, त्यांचं गाणं ऐकताना भोवतालचे लोक कसे भारल्यासारखे स्तब्ध असत, संगीतात तल्लीन झालेले असत हे आठवतं, वसंतरावांबरोबर खाल्लेली भजीही आठवतात.

प्रचंड गर्दीने फुललेला तो मंडप, फुलांनी सजवलेली ती बैठक मागे सवाई गंधर्वांची लावलेली ती रुबाबदार तसबीर. आणि वसंतरावांना टाळ्यांच्या गजरात दिली जाणारी दाद! हे सारं मनात ठसलेलं आहे. आज घरातल्या होमथिएटरवर वसंतरावांचा ध्वनिमुद्रित जोगकंस ऐकतानाही हे सारं पुन्हा आठवतं, आणि हा मनस्वी कलाकार आता आपल्यात नाही, हे स्वर्गीय सूर आता फक्त तबकड्यातूनच ऐकायला मिळणार हे मनात येऊन त्यांची अपुऱ्या राहिलेल्या मैफलीची हुरहुर जाणवत रहाते. गेल्या 40 वर्षात हे रेकॉर्डिंग अनेकदा ऐकूनही त्याचा प्रभाव तसूभरही कमी झालेला नाही. उलट कोणत्याही अभिजात कलाविष्काराप्रमाणे दरवेळी मला त्या गाण्यात वेगळीच झळाळी जाणवते. ते गाणे अधिकाधिक तजेलदार वाटते. अनेक जागा माझ्या संगीतातल्या अल्पबुद्धीला नव्याने जाणवतात, सापडतात आणि मी त्यांच्या अलौकिक, गायकीकडे नव्याने आकृष्ट होते.

मी वसंतरावांच्या सुरांची निस्सीम चाहती आहे. वसंतरावांची गायकी उलगडून सांगणारा ग्रंथ खरंतर यापूर्वीच निर्माण व्हायला पाहिजे होता. त्यांच्या समकालीन गायकांची महती समजून घेताना मला जाणवले की त्या त्या गायकांनी, गायनाच्या क्षेत्रातले काही ठरावीक शिखर पादाक्रांत केले आहे. जसे कोणी ख्याल गायकीत, कोणी नाट्यसंगीतात तर कोणी पार्श्वगायनात; पण वसंतरावांनी मात्र संगीताच्या जवळजवळ अनेक - प्रत्येक - प्रांतात आपली मोहर उठवलेली आहे. मग तो मैफलीत रंगवलेला रागविस्तार असो, ठुमरी गायनातली नजाकत असो, नाट्यसंगीताचे माधुर्य असो किंवा चित्रपटगीत, भावगीत यांसारख्या सुगम संगीतातली मुशाफिरी असो. वसंतरावांच्या गाण्याची त्यांच्या गळ्याची जातकुळी अशी होती; जणू निर्मळ जलाचा प्रवाह! “पानी तेरा रंग कैसा जिस मे मिला दे बने उस जैसा ।

वसंतरावांचे संगीतात अनेक गुरू होते. प्रत्येकाकडून त्यांनी थोड्या थोड्या पण नेमक्या, उत्तम गोष्टी आत्मसात केल्या. त्यातून त्यांची स्वतंत्र, निर्मळ गायकी तयार झाली; पण तरीही मला पु. लं. प्रमाणे वाटतं की त्यांचा जीव खरा गुंतला होता तो एका अलौकिक गायकाच्या स्वरतालात. अभिजात नाट्यसंगीत विलक्षण ताकदीने गाणाऱ्या, सुरांच्या वादळाशी अक्षरशः झुंजणाऱ्या स्व. मा. दीनानाथ यांच्या गायकीत वसंतराव पूर्णपणे बुडून गेलेले दिसतात. पं. चंद्रकांत लिमये म्हणतात, “गुरुशी भावनिक जवळीक साधली तरच गुरुची विद्या साध्य होते.” तशी स्वरांशी जवळीक साधत वसंतराव मा. दीनानाथांचे एकलव्य-शिष्य बनलेले आढळतात. वसंतरावांच्या गाण्यातील पंजाबी बाज, गतिमान तान, तेजस्वी सूर यावर दीनानाथी रंगांची पखरण झालेली जाणवते.

पु. . देशपांडे, वसंतरावांच्या गुरूंबद्दल, गायकीच्या घराण्याबद्दल बोलताना म्हणतात, “वसंताने कधी आपल्या कमलापूरच्या वतनदार घराण्याची पिसे लावली नाहीत की संगीतातल्या एकाच घराण्याच्या नावाचे कान पकडले नाहीत. कुणा अनाथाने अन्नाची माधुकरी मागावी तशी सुरांची माधुकरी मागितली त्याने. ह्या एकलव्याचे अनेक गुरू होते.”

नागपुरातल्या सप्रे गुरुजींपासून, लाहोरमधल्या उस्ताद असद् अली खाँ साहेब, पंजाबमधले उस्ताद आशिक अली खाँ साहेब कै. सुरेशबाबू माने, यांच्याकडून त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण गायन आत्मसात केले. भेंडीबाजार घराण्याची मेरखंड गायकी उस्ताद अमानअली खाँ यांच्याकडे गंडाबंधन करून आपलीशी केली. पं. कुमार गंधर्व हे तर त्यांचे गुरू आणि मित्र! या सर्व दिग्गजांची तालीम घेऊन वसंतरावांनी आपली गायकी अतिशय आकर्षक बनवली. संगीताचा एक स्वतंत्र, अलग असा विचार मांडला गेला.

ईश्वराने दिलेल्या मधुर आवाजाला, कुशाग्र बुद्धीची जोड मिळाल्यामुळे वसंतरावांचे गायन, ठरावीक मोजमापातली, ठाशीव आकृती न रहाता एक अप्रतिम स्वरचित्र बनले होते आणि प्रत्येक मैफलीत हे चित्र नव्या ढंगात, नवे रंग लेवून मिरवत मिरवत येई असे अनेक जाणकार, दर्दी आवर्जून सांगतात.

खरेतर आजकाल गाणे किंवा सूर फार स्वस्त झाले आहेत. कुठेही जा, रेडिओवरून, ध्वनिमुद्रिकेतून, मोटारीत सुद्धा ते तुमच्या मनात असो किंवा नसो, कानावर पडतातच. अगदी आदळतात; पण त्यातून सुरांचा सात्त्विक आनंद कितपत मिळतो? ऐकणाऱ्याचे कान कितपत सुखावतात? हा प्रश्नच आहे.

वसंतरावांचे एक आध्यात्मिक गुरूही होते, श्री. ताजबुद्दीन महाराज. त्यातून वसंतरावांच्या गायकीला एक आध्यात्मिक अधिष्ठान लाभले असावे. तसं पाहिलं तर अध्यात्म आणि संगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीकडे प्रचंड साधना, घनघोर तपस्या पाहिजे. आज तपस्या आणि उद्या प्रकाश असे होत नाही. वर्षानुवर्षे साधना - तालीम केल्यानंतर सिद्धी प्राप्त होते. अध्यात्मामध्ये बीजमंत्र असतो. तो फलदायी असतो. संगीतामध्ये गुरुमंत्र पाहिजे. तो प्रत्यक्ष गुरुमुखातून मिळाल्यानंतर या हृदयीचे त्या हृदयी गेल्यानंतर, अनेक आवर्तनानंतर पुढचा मार्ग दिसत जातो. अध्यात्माइतकेच तादात्म्य तितकीच एकाग्रता संगीतातही आवश्यक असते. जेव्हा संगीताची आराधना करणाऱ्याचे भान हरपते तेव्हाच श्रोत्यांना सुरांचा आनंद मिळतो. म्हणूनच संगीताला नादब्रह्म म्हणत असावेत. वसंतरावांच्या गायकीतून हा आनंद श्रोत्यांना वारंवार मिळत असे.

गाणे हे केवळ मनोरंजन नाही तो एक विचार आहे.” असे स्वतः वसंतराव म्हणत असत. म्हणूनच संगीताला प्रत्येक युगात महत्त्व लाभलेले आहे. संगीत सर्वव्यापी असते. सुखदुःखात साथ देते, विचारांची प्रगती करते, संगीताने मानवी जीवन व्यापलेले आहे. प्रभाकर जठार म्हणतात, “संगीताचा जो वैचारिक भाग आहे त्यात वसंतरावांना उत्तम गती होती. संगीताची विविध अंगे, समस्या, पेशकश याबाबत वसंतरावांचे विचार ठाम आहेत. स्वतंत्र आहेत. ते मूलगामी आहेत आणि त्यांनी साहित्यिक भाषेत व्यक्त केले आहेत. त्यांच्या (transformation of music) ‘संगीताचे परिवर्तनया प्रबंधात ते त्यांनी व्यक्त केले आहेत. हा प्रबंध वैविधतेने नटलेला आहे. याच प्रबंधामुळे वसंतरावांना डॉक्टर ऑफ म्युझिक पदवी प्रदान करण्यात आली.”

आमच्या पिढीने दीनानाथांचे तेजस्वी गाणे ऐकले नाही. बालगंधर्वांचा लडिवाळ अभिनय, वेल्हाळ सूर आम्हाला ऐकायला, पाहायला मिळाला नाही; पण निदान वसंतरावांचे देदीप्यमान गाणे आम्ही ऐकले, नाट्यसंगीताचा आनंद घेतला, कलीयुगातल्या तंत्रज्ञानाच्या आशीर्वादामुळे आमच्या पुढच्या पिढीसाठी हा अनुभव आम्हालारेकॉर्डकरता आला.

संगीतात मधुररस ओतणारा हा गायक जीवनात़ल्या प्रत्येक रसाचा स्वाद घेण्यास उत्सुक होता - असेच त्यांच्याबद्दलच्या मिळणाऱ्या माहितीतून प्रत्ययाला येते. वसंतरावांचे उर्दू, संस्कृत या भाषांवर प्रेम होते आणि प्रभुत्वही होते. अनेक शेरोशायरी, चिजा, गझल त्यांना मुखोद्गत होत्या. त्यांनी रचनाही केल्या होत्या. एखाद्या होराभूषणासारखा पत्रिका/कुंडल्या यांचा स्वाध्याय त्यांनी केलेला होता. देशी-विदेशी औषधांची नावे त्यांना पाठ होती. जुनी शिल्पकला माहीत होती. कुस्तीबद्दल तर असे सांगत जणू किती आखाड्यातून अंगाला लाल माती लावून आले आहेत. कीर्तनकला ते जाणत होते आणि मर्तिकाची उत्तरक्रियाही त्यांनी समजून घेतली होती. पाककौशल्यात इतकी निपुणता की घरंदाज गृहिणींनीही शरणागती पत्करावी. सर्वांवर ताण म्हणजे कारकुनी. कारस्थाने करावीत ती कारकुनांनी आणि कशी? हे विचारावे वसंतरावांना, म्हणूनच वामनराव देशपांडे म्हणतात, “जीवनाचा अनेकविध अनुभव त्यांच्या गाठी होता. ख्यालगायकीत सखोलता आणि कल्पनाविलास होता. सुगम गीतात काव्याकडे, शब्दाकडे, भावांकडे त्यांचे लक्ष असे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय हरहुन्नरी, व्युत्पन्न होते. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या गायकीत पडलेले आढळून येते.”

1942 सालापासून 1965 पर्यंत वसंतरावांनी मिलिटरी अकाऊंट्समध्ये कारकुनी केली. गृहस्थाश्रमाचे योग्य पालन करता यावे, कुटुंबाला स्थैर्य मिळावे म्हणून अनेक रसिकांचा आग्रह नम्रतापूर्वक दूर करून वसंतराव नोकरी करीत राहिले. 1964च्या नंतर त्यांची नेफा बॉर्डरवर बदली झाली. पाण्यातून मासोळी बाहेर काढावी तसे संगीताच्या साम्राज्यातून उठवून त्यांना जंगलात पाठवलं गेलं. या वेळेला त्यांना नोकरीतून सोडवलं, त्याचं श्रेय जातं बेगम अख्तरीबाईंकडे. बेगम साहिबा, वसंतरावांना गुरुस्थानी होत्या, भगिनीसमान होत्या. अनेक युक्त्या लढवून वसंतराव स्वतंत्र झाले आणि बेगम साहेबांची मैफल रोशन झाली.

साथीदारांना सांभाळून घेऊन मोठं करणं, योग्य जागी त्याचं जाहीर कौतुक करणं, हा मनाचा मोठेपणा वसंतरावांच्यात पुरेपूर होता. वक्तशीरपणात कोणी त्यांचा हात धरू शकणार नाही असा त्यांचा लौकिक होता. नाहीतर कलाकारांना बेजबाबदार असण्याचा शाप असतो.

हिराबाई बडोदेकर म्हणजे चंपुताई, वसंतरावांवर लोभ करणाऱ्या कलावंतामध्ये अव्वल होत्या. वसंतरावांनी अनेकदा त्यांना तबल्याची साथ केली आहे. आफ्रिकेचा सहा महिन्यांचा दौरा त्यांचेसमवेत तबलजी बनून केला आहे. चंपुताई म्हणतात, “वसंतराव म्हणजे देवाने आणि दैवाने संगीताला दिलेली देणगी आहे.”

पु. . देशपांडे व वसंतरावांचे मैत्र उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. पुलंचे वसंतरावांवर, त्यांच्या गायकीवर अतोनात प्रेम होते. पु. . म्हणतात, “स्वर, वसंताच्या भोवती असे नाचायला लागतात की ऐकणाऱ्याला धाप लागते.” अशाच एका रंगलेल्या मैफलीत नाना जोग म्हणाले, “अरे वसंता, सहन होत नाही रे, इतके जडजवाहीर. एकदम उधळू नको. एकेक दागिना पहायला उसंत तरी देशील.” सूर्याच्या भोवती ग्रहमाला असावी तशी अस्सल रसिकांची मांदियाळी वसंतरावांच्या भवती सतत भिरभिरत असे.

गीतम्, वाद्यम्, नृत्यम् त्रयम् संगीतम उच्चम्।काव्य, वाद्यवादन, नृत्य या त्रयीपेक्षा संगीत सर्वश्रेष्ठ आहे असे भरतमुनींनी नाट्यशास्त्रात म्हटले आहे.

स्वर + लय + भाव यांच्या मिलाफातून संगीत तयार होते. लय आणि भाव यांच्या मिलाफाला स्वरांची झालर लागते आणि संगीत प्रकट होते. वसंतरावांच्या गायनात या सर्वांची अनुभूती येते म्हणूनच शास्त्रीय संगीताइतकीच लोकप्रियता त्यांच्या नाट्यगीतांना लाभली. ‘कट्यार काळजात घुसलीया नाटकाने त्यांच्या जीवनात स्थित्यंतर घडले; पण दारव्हेकर मास्तर म्हणतात, “‘कट्यारमुळे वसंतराव मोठे झाले नाहीत, तर वसंतरावांमुळेकट्यारला आधुनिक संगीत नाटकात आढळपद मिळाले.”

दाटून कंठ येतोयासारखे चित्रगीत-भावगीत अनेक वधुपित्यांच्या मनाला, हृदयाला स्पर्श करून जाते; याचे कारण वसंतरावांचे त्या सुरांशी, गीतातल्या भावाशी एकरूप होणे.

रोहिणीताई भाटे या नृत्यांगना जवळजवळ दहा वर्ष वसंतरावांकडे संगीताची तालीम घेत होत्या. आपल्यालहजाया पुस्तकात त्या म्हणतात, “वसंतरावांचं गाणं विलक्षण वेगळं होत. कधी बेदरकार, कधी आक्रमक, एखादे वेळी कलाकुसरीबाबत अतिरेकी; पण रसाळ खरपूस, लयलोम्य, रसघन, काय काय म्हणून सांगू? कसं सांगू? असं हृदयंगम गाणे फक्त वसंतरावच गाऊ शकतात.”

कट्यारमधल्या गायकीबद्दल रोहिणीताई म्हणतात, “‘कट्यारत्यांना लौकिकदृष्ट्या जिथे ज्या उंचीवर घेऊन गेली तिथे तर ते प्रथमपासूनच विराजमान होते.”

वसंतराव एकदा रोहिणीताईंना म्हणाले, “ज्या रागात गायचं, त्या रागाची चाल, त्याचा भाव, त्याची ठेवण सांभाळून त्याला जागं ठेवून स्वरगुंफण, गतिगुंफण करायची. त्यामुळे राग, चिज आणि त्याचं वाहन असणारा ताल याचं अद्वैत होतं. त्याचेच नाव रंग. इतक्या सुंदर शब्दात अभिव्यक्ती करणारा हा स्वरकिन्नर म्हणजेच वसंतराव!”

वसंतरावांच्या आठवणी मी गोळा करू लागले आणि मला साहाय्य केलं ते त्यांच्या शिष्यवर्गाने. ‘वसंतराव माझे बुवाम्हणत पं. चंद्रकांत लिमये हळुवारपणे लिहिते झाले. गेली 17 वर्षे त्यांच्या नाट्यसहकारी असणाऱ्या, आज नाट्यपरिषदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेल्या अभिनेत्री फैयाज आनंदाने पुढे सरसावल्या. बकुल पंडीत, शैला दातार, लता देव यांनी भरलेल्या डोळ्यांनी आणि गुरूंच्या स्वर्गीय सुरांमुळे भारावलेल्या मनानी आपल्या स्मृतींची भांडारे रिती केली.

आकाशवाणीने वसंतरावांना दीर्घकाळ विटेवरच्या विठ्ठलासारखे द्वारीच उभे केले होते. पण पुणे आकाशवाणीच्या संचालकपदी काम केलेल्या डॉ. सुहासिनी कोरटकर यांनी आवर्जून आपला नम्रभाव सुंदर शब्दात व्यक्त केला.

प्रभाकर पणशीकर म्हणजे रंगभूमीवरचे साम्राज्य दीर्घकाळ भोगणारे अभिनेते, त्यांनीतोच मीया पुस्तकात वसंतरावांचे नट म्हणून आणि एक सहृदयी व्यक्ती म्हणून लोभस व्यक्तिचित्रण केले आहे. तेही या पुस्तकात समाविष्ट केले आहे.

वसंतरावांच्या अमेरिकेच्या दौऱ्याचे वर्णन सरोज सरदेसाई यांच्यातेरावा सूरमधून घेतले आहे. शब्दांकित केले आहे डॉ. मंदाकिनी पानसरे यांनी. रांगोळीतले रंगीत ठिपके कसे लक्ष वेधून घेतात तशाच परदेशी रंगलेल्या मैफली आणि गमतीजमती, वसंतरावांचे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायला उपयोगी पडतील असे वाटते.

मुकुंद संगोरामांनी पत्रकारितेच्या भरगच्च कार्यक्रमातून वेळ काढत वसंतरावांप्रती असलेला आपला आदर शब्दांकित केला आहे. पिढीजात रसिकता जोपासत, संगोरामांनी वसंतरावाच्या गायकीचे चित्रण केले आहे.

मोनिका गजेंद्रगडकर या तरुण पिढीच्या, नव्या दमाच्या लेखिकेने वसंतरावांच्या गायकीने, पिताकन्येमध्ये एक अद्भुत भाव कसा निर्माण झाला त्याची एक हळुवार कथा सांगत वसंतरावांचे शब्दशिल्प रेखाटले - ते मुळातच वाचनीय बनले आहे.

अशोक रानडे या दर्जेदार समीक्षकाचा लेख या पुस्तकातून एका रसिक मनाच्या जाणकार, संगीतप्रेमी व्यक्तीची वसंतरावांप्रती अस्सल भक्ती कशी असते याची प्रचिती देतो.

कै. श्री. कृ. . दीक्षित, कै. श्री. रामकृष्ण बाक्रे, कै. श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे लेख वसंतरावांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रकाशित झालेल्या पहिल्या वर्षीच्या श्रद्धांजलीच्या अंकातून पुनर्प्रकाशित केले आहेत.

विजय देशपांडे म्हणजे बापू! हा तर घरचाच भाऊराया! आपल्या लोकविलक्षण वडिलांबद्दल, आपल्या आदरभावना त्याने मनःपूर्वक माझ्या स्वाधीन केल्या. पु. . देशपांडे त्यांचावसंतखाँया पुस्तकात समाविष्ट केल्याखेरीज या पुस्तकाला पूर्णरूप आलेच नसते. ‘लोकमान्य सेवा संघपार्ले यांच्या मान्यतेने हा लेख इथे शोभून दिसतो आहे.

राहुल देशपांडे या युवा कलाकाराची मुलाखत या पुस्तकात वाचायला मिळेल. राहुल, स्वतः वसंतरावांचे नातू आणि आजच्या तरुण गायक कलाकारातील एक अग्रणी नाव!

वारसाहक्काने मिळालेली सुरांची दौलत या तरुणाने कल्पकतेने वाढवली आहे. नाम आणि दाम कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध असताना, मैफलीतल्या ख्याल गायकाची भूमिका निवडण्याचे त्याने ठरविले आणि अभिजात संगीताचे आव्हान स्वीकारले. आजच्या युवा वर्गाला, या निमित्ताने एका आदर्शवादाची ओळख व्हावी, हाच या मुलाखतीमागचा दृष्टिकोन!

या पुस्तकनिर्मितीमागचा उद्देश एकच की एका महान अवलियांच्या सुरांची ओळख नव्या पिढीला करून द्यावी, शब्दांच्या माध्यमातून एक सांगितिक व्यक्तिमत्त्व रसिकांपुढे उलगडावे. सुरांच्या दौलतीची गुहा पाहण्यासाठी या पुस्तकाचा पासवर्डसारखा उपयोग व्हावा हीच नम्र भावना माझ्या मनात आहे. ‘खुल जा सिमसिम्म्हणत सूरसाम्राज्यात आता शिरायचे आहे. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी कै. वसुंधरा पंडित ट्रस्टने केलेले आर्थिक साहाय्य बहुमोलाचे आहे.

यापुढेही गाण्याच्या अनेक मैफलींना जाणे होईल. संगीताच्या अलौकिक साथीने रात्र चढत जाईल, हवेतला गारवा अंगाला झोंबू लागेल. पहाटेची चाहूल लागेल. ललत भटीयारच्या सुरात आळवलेली, तेजस्वी सुरांनी लगडलेलीतेजोनिधी लोहगोलही आराधना ऐकण्यासाठी तो भास्करही क्षणभर थांबेल; पण मग जाणवेल त्याला की हे स्वर्गीय सूर पृथ्वीतलावर आता कधीच ऐकू येणार नाहीत.

अवघ्या 62व्या वर्षी या सम्राटाने आपले सूरसाम्राज्य खालसा केले. आपले आयुष्य ईशचरणी अर्पण केले. रसिकांच्या मनात अर्ध्या मैफलीची हुरहुर जागती ठेवून वसंतराव निघून गेले - दूऽऽर अज्ञाताच्या प्रवासाला!

भीमसेनजी म्हणतात, “संगीताच्या क्षेत्रातील हा आमचा सहप्रवासी. गाणं संपवावं कुठे याचं तंत्र जाणणारा हा तपस्वी गायक! जीवनाच्या मैफलीची सम कशी चुकला हेच काही लक्षात येत नाही!”

- संध्या देवरुखकर

 

 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि