100 204
Download Bookhungama App

वैवाहिक जीवन - श्री. के. पी. भागवत

Description:

विवाहपद्धती आदर्श होण्यासाठी लोकशिक्षणाची आवश्यकता आहे. वैवाहिक जीवनातील सुखदु:ख कोणत्या गोष्टींवर अवलंबून असते याचे मुलां - मुलींस घरी आईवडिलांनी तसेच कॉलेजमध्ये प्राध्यापकांनी व दूरचित्रवाणी, आकाशवाणी यांच्या साह्याने तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले पाहिजे. समाजशास्त्र, मानवशास्त्र, मानसशास्त्र, कामशास्त्र व वैद्यक शास्त्र या सर्व शास्त्रांचा सखोल अभ्यास करून लेखकाने वैवाहिक जीवन या विषयी मार्गदर्शनपर असे लेखन केलेले आहेप्रस्तावना माणूस ज्या समाजात राहतो, त्या समाजातील चालीरीती, रूढी, विवाह संस्था, धर्मकृत्ये ही फार पुरातन आहेत, त्यांत मागे बदल झालेला नाही व पुढेही होणार नाही, अशी त्याची धारणा असते. पण समाजशास्त्रज्ञ व मानवशास्त्रज्ञ त्याची ही समजूत अज्ञानमूलक आहे असे मानतात. विवाह संस्थेविषयी बोलावयाचे झाल्यास तिच्यात अनेक बदल घडून आल्याचे हे शास्त्रज्ञ सांगतात. कै. वि. का. राजवाडे हे भारतीय विवाहसंस्थेचे आद्य इतिहासकार होत. त्यांनी या विषयावर पाच सहा मौलिक प्रकरणे लिहिली, पण अनेक कारणांनी ते हा इतिहास पुरे करू शकले नाहीत व आपण एका मौलिक ग्रंथास मुकलो. भारतीय विवाह संस्थेत स्थूलमानाने कसे फरक होत गेले ते त्यांनी लिहिले. पण ते तसे का झाले या बद्दल त्यांचे मत काय होते ते आपणास माहीत नाही. पण कै. श्री. व्यं. केतकर यांनी मात्र हे बदल अंतिमतः' आर्थिक करणांमुळे घडून येतात असे म्हटले आहे. बरेचसे आधुनिक समाजशास्त्रज्ञही असेच मानतात. या गोष्टीचे प्रत्यंतर आज आपणास येत आहे. प्रगत देशांतील लोक येथे मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक करीत आहेत. ही गुंतवणूक अर्थात खाजगी क्षेत्रात अधिक आहे. झपाट्याने होणाऱ्या औद्योगीकरणामुळे आपल्या देशात अनेक बदल घडून येत आहेत. औद्योगीकरणात चलनवाढ, भाववाढ अटळ असते. त्यामुळे स्त्रिया मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन करू लागल्या आहेत. इतर अनेक पुरुषांबरोबर मिसळावे लागल्यामुळे व वर्तमानपत्रे, टी. व्ही., मासिके, पाक्षिके, या सर्व प्रचार - माध्यमांतून कामुकतेस सतत खतपाणी घालण्यात येत असल्यामुळे विवाह - बाह्य संबंध, विवाहपूर्वसंबंध यांची शक्यता वाढत आहे. हे असे घडत आहे असे सांगणारे अनेक लेख ' टाईम्स् ऑफ इंडिया ' सारख्या दैनिकात प्रसिद्ध होत आहेत. हे लेख लिहिणारे लोक आकडेवारी देत नसल्यामुळे त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा हे कळत नाही. पण आकडेवारी अगदीच नाही असे नाही. मद्रासमधील डॉ. नारायण रेड्डी यांनी ३७५० नागरिकांना कामजीवनविषयक एक प्रश्नपत्रिका पाठविली. त्यांना फक्त ६७१ उत्तरे आली. यात ५०६ पुरुष व १६५ स्त्रिया होत्या. यातील निम्म्याहून अधिक व्यक्तींनी वयाच्या २० ते २५ च्या दरम्यान विवाहपूर्व संभोगाचा अनुभव घेतला होता. कॉलेजातील मुलामुलीत हे प्रमाण थोडे कमी होते. वाढत्या औद्योगीकरणामुळे विवाह विषयक नीतिमूल्यात जसे फरक घडून येतात, तसेच इतर नीतिमूल्यांचे बाबतीतही होते. ती ऱ्हास पावतात. रोजचे वर्तमानपत्र उघडले म्हणजे ते आपल्या ध्यानी येते. पैसा हाच परमेश्वर मानण्याची वृत्ती, ध्येयवादाची दुर्मिळता, चंगळवाद, भ्रष्टाचार, आर्थिक व इतर गुन्हेगारी हे झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगीकरणाचे इतर दुष्पीरणाम होत. ' विवाहसंस्थेचे स्वरूप ' हे तीस पानांचे प्रकरण लिहिण्याचा मुख्य उद्देश विवाहसंस्थेत मागे बदल झाले आहेत व आजही ते होत आहेत, हा ऐतिहासिक दृष्टिकोन देणे व त्यांची कारणे ' अंतिमतः ' अर्थव्यवस्थेशी निगडीत आहेत हे सांगणे हाच आहे. ' वैवाहिक जीवन ' ह्या पुस्तकाच्या निरनिराळ्या आवृत्त्यांसाठी लिहिलेल्या प्रस्तावना, साथीदाराची निवड, पति - पत्नीतील संघर्ष ही प्रकरणे यात मी विवाहाचा मानसशास्त्रदृष्ट्या विचार केला आहे. हे लिखाण पाश्चिमात्य वाङ्मयावर आधारित असले तरी ते उपयुक्त आहे, असे मला वाटते. आपल्या वैवाहिक जीवनासंबंधी संशोधन होत नसल्यामुळे नाईलाजाने असे करणे प्राप्त आहे. ' वैवाहिक जीवन ' हे पुस्तक केवळ कामजीवनावर लिहिलेले नाही हे वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षात येईल.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)