80 144
Download Bookhungama App

वैद्यकीय विज्ञानाचे शिल्पकार - डॉ. आनंद जोशी

Description:

आधुनिक वैद्यकीय विज्ञान ही विज्ञानाचा आधार घेतलेली ज्ञानशाखा.मनोगत आधुनिक वैद्यकीय विज्ञान ही विज्ञानाचा आधार घेतलेली ज्ञानशाखा. मूलभूत विज्ञान किंवा गणिती विज्ञानासारखी ही ज्ञानशाखा काटेकोर नाही. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ ही म्हण आधुनिक वैद्यकीय विज्ञानात चपखल बसते. निसर्गातील बहुविधता हा नियम मानवी शरीरालाही लागू पडतो. म्हणून विविध रोगांचे आविष्कार प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असतात. असे जरी असले तरी आधुनिक वैद्यकीय विज्ञानातील निदानाची व उपचाराची तत्त्वे विज्ञानाच्या विचारसरणीवर आधारित आहेत. विविध रोगांबद्दलची, त्यावरील उपायांबद्दलची माहिती समाजाला करून देणे; हा आधुनिक वैद्यकीय विज्ञानाची तोंडओळख करून देण्याचा एक मार्ग. आधुनिक वैद्यकाची इमारत ज्या संशोधकांनी उभी केली, त्यांच्या कार्याचा परिचय करून देणे, हा दुसरा मार्ग. हा मार्ग वाचकांसाठी जास्त रसपूर्ण व रुचकर. म्हणून गेली दोन दशके अशा वैज्ञानिकांची कार्यचित्रे मी विविध वृत्तपत्रातून शब्दबद्ध करत होतो. या वैज्ञानिकांचे मूळ संशोधन अभ्यासताना, त्यांची नोबेल व्याख्याने वाचताना माझ्या ज्ञानात भर पडली. संकल्पना स्पष्ट झाल्या. ‘मी तो हमाल भारवाही’ या भावनेने काम करताना ‘ही हमाली आनंददायी आहे.’ याचाही प्रत्यय आला. आज या कार्यचित्रांचं पुस्तक तयार होतंय, हा तर बोनसच आहे. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, पुणे सकाळ, नवशक्ति, मुंबई सकाळ या वृत्तपत्रांनी वेळोवेळी हे लेख छापले व ते पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यास परवानगी दिली, त्याबद्दल या सर्व वृत्तपत्रांचा मी आभारी आहे. माझ्या लेखांची हस्तलिखिते तयार करणे, त्यातील शुद्धलेखनाच्या व इतरही चुका दुरुस्त करणे हे काम माझी सुविद्य पत्नी सुमती हिने केले; म्हणून तर हे सर्व लेख पुस्तकरूपात प्रकाशित होत आहेत. त्याबद्दलच्या माझ्या भावना शब्दापलीकडल्या आहेत. कविता महाजन यांनी हे पुस्तक काढण्यासाठी मला उद्युक्त केले, संकलन-संपादनाची जी मेहनत त्यांनी घेतली; त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आज समाजातील आयुष्यमर्यादा वाढली आहे, समाजाचे आरोग्य सुधारते आहे. आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा फायदा सर्वांपर्यंत पोचण्यासाठी या विज्ञानाची माहिती सर्वांना असणे जरुरीचे आहे. ज्यांना आरोग्याचे ज्ञान असते, ते आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतात; असे वैद्यकीय विचारवंतांनी सांगितले आहे. तो उद्देश सफल व्हावा म्हणून हा पुस्तक प्रपंच. यातील जे उत्तम आणि उदात्त आहे त्याचे श्रेय त्या वैज्ञानिकांच्या संशोधनकार्याला आहे आणि या पुस्तकात ज्या उणिवा असतील त्याचा धनी मात्र मी आहे. - डॉ. आनंद जोशी.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि