60.00 116.00
Download Bookhungama App

वैभव पेशवेकालीन वाड्यांचे - सौ. मंदा खांडगे

Description:

मराठ्यांच्या इतिहासाचा सुवर्णकाळ म्हणजे पेशवेकाल. पेशवेकालीन मराठ्यांची राजधानी पुणे. पुण्यातील एकेका सरदारांचे वाडे म्हणजे एक स्वतंत्र इतिहास आहे. जवळजवळ २५० वर्षांपूर्वीचे हे पराक्रमी वाडे जे अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहेत, आज मोडकळीला आले आहेत. काहींनी तर आज नव्या जमान्यापुढे मान टाकली आहे. प्रत्येक मराठी हृदयात या वाड्यांचे चिरंतन स्थान आहे. अशा २२ - २३ वाड्यांचा इतिहास, त्यांचे वैभव, बांधणीतील वैशिष्ट्ये, कलाकुसर यांचा वाचनीय इतिहास डॉ. मंद खांडगे यांनी पुस्तकाद्वारे चिरंतन केला आहे. डॉ. मंदा खांडगे यांचीरविवार सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली ऐतिहासिक वास्तुंविषयीची लेखमाला पुस्तकरूपाने प्रसिद्ध होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.

पुण्यातील पेशवेकालीन वाड्यांचे वैभव सांगणारी ही मालिका आहे. चार पाच प्रमुख वाड्यांबद्दल लेख लिहावे, अशी श्रीमती खांडगे यांची कल्पना होती. पण हा विषय विशिष्ट काळाच्या संदर्भात असला तरी केवळ तात्कालिक महत्त्वाचा नाही. त्यामुळे केवळ चार-पाच लेख लिहून न थांबता या विषयीचा व्यापक आढावा घेणारी, शक्यतो सर्व प्रमुख वाड्यांची आजची स्थिती, ऐतिहासिक व स्थापत्यविषयक माहिती यांचा परामर्श घेणारी मालिका लिहावी, असे मी सुचविले. ऐतिहासिक शहरातील वास्तू म्हणजे केवळ इमारती नसतात. त्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक, व्यक्तिविषयक असे अनेक संदर्भ जोडलेले असतात. त्यामुळे आपला पूर्वकाळ सांगणाऱ्या त्या महत्त्वाच्या पाऊलखुणा ठरतात. या पाऊलखुणांची त्यांच्या सर्व वैशिष्ट्यांसह नोंद होणे म्हणजे केवळ इतिहासाचा गौरव करणे नव्हे, तर त्याबाबतची आजची समाजाची दृष्टी नमूद करणे ही आहे आणि भावी पिढ्यांसाठी महत्त्वाचा दस्तऐवजही निर्माण करणे आहे. विशेषतः पुण्यासारख्या वाढत्या शहरात प्राचीन वास्तू अस्तंगत होऊ लागल्या आहेत. हे लक्षात घेता लेखनाच्या आणि छायाचित्रणाच्या स्वरूपात तरी या वास्तुवैशिष्ट्यांचे जतन होणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने पाहाता श्रीमती खांडगे यांनी ऐतिहासिक संदर्भ पारखून, विविध व्यक्तींना भेटून परिश्रमपूर्वक केलेले काम मोलाचे आहे. पुण्याच्याच नव्हे, तर कोल्हापूर, नगर यासारख्या ऐतिहासिक महत्त्वाच्या शहरांच्या बाबतीतही अशा स्वरूपाचे लेखन होणे आवश्यक आहे.

वास्तुशास्त्राच्या विद्यार्थ्यांना या मालिकेचा अभ्यासासाठी उपयोग झाला, हे पुण्यापासून अहमदाबादपर्यंत विविध शहरांतील या शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या औत्सुक्यातून दिसून आले. वास्तुकलेपासून कलाकुसरीच्या कामापर्यंत किती प्रकारचे आपलेच वैभव आपल्याला फारसे माहित नाही, हे या व अशा अन्य प्रतिक्रियांतून स्पष्ट होते. म्हणजे शास्त्रीय अभ्यास करणाऱ्यांपासून सामान्य माणसापर्यंत सर्वांना याबाबत आस्था आहे, उत्सुकता आहे. ही आस्था जागविणे आणि वाढविणे आवश्यक आहे. अशा लेखनातून काही प्रमाणात तरी हे उद्दीष्ट साध्य करता येईल. या मालिकेत उणिवा असतील, पण त्याचा हा उपयोग अधिक मोठा आहे. परदेशामध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तूंचे, स्थळांचे जसेच्या तसे जतन केले जाते. आपल्याकडे या बाबतीत बव्हंशी उदासीनता आहे. त्यामुळे आणखी काही वर्षांनी ऐतिहासिक पुणे पुस्तकातच वाचावे लागेल. हीच परिस्थिती ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अन्य काही शहरांबाबतही आहे. या वास्तू नष्ट करणे म्हणजे एक प्रकारे आपणच आपला इतिहास डोळ्यांआड करण्यासारखे आहे. हे करू नये आणि किमान अत्यंत महत्त्वाच्या अशा काही वास्तू तरी जतन केल्या पाहिजे, ही भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यात ही लेखमाला यशस्वी झाली, असे त्या संदर्भात जी अनेक पत्रे आली त्यावरून म्हणता येईल. अर्थात केवळ काही लोकांच्या मनात ही जाणीव निर्माण होणे पुरेसे नाही, तर संपूर्ण समाजालाच त्याची गरज पटली पाहिजे आणि सरकारनेही याचे महत्त्व ओळखून पावले टाकली पाहिजेत. म्हणूनच या प्रकारच्या लेखनाचे स्वागत केले पाहिजे.

 

- विजय कुवळेकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि