60.00 116.00
Download Bookhungama App

द व्हाईट एप्रन - डॉ. एम. एम. जैन

Description:

दुर्दैवाने समाज पांढऱ्या कोटाला न्याय देत नाही. तथाकथित विचारवंतांनी तर या पांढऱ्या कोटाची काळीकुट्ट प्रतिमा रंगवण्याचा जणू विडाच उचलला आहे. त्या पांढऱ्या कोटाची वस्तुनिष्ठ प्रतिमा जनमानसात रुजवण्यासाठी, सच्चाई सांगण्यासाठी मी हा पंक्तीप्रपंच करीत आहे. सन्मान्य सहृदय वाचकांना ही पांढऱ्या कोटाची कहाणी वाचून वास्तवाचे भान होईल. डॉक्टरांकडे पाहाण्याचा समाजाचा दृष्टिकोण नितळ, निष्पक्ष आणि निरोगी होईल या आशेने मी माझ्या आयुष्याचा लेखाजोखा आपल्यापुढे मांडत आहे.

यद्रोचते तद् ग्राह्यम् ।

- डॉ. एम. एम. जैनप्रस्तावना...

या पृथ्वीवर जेथे जेथे मॉडर्न मेडिसिनचा वापर केला जातो तेथे वैद्यकीय व्यावसायिक पांढऱ्या रंगाचा कोट वापरतात. त्यामुळे, हा पांढरा कोट वैद्यकीय व्यवसायाचे प्रतीक मानला जातो. हा कोट चढवला की समाज असा कोट घालणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय व्यावसायिक म्हणून ओळखते. म्हणून हा कोट वापरणाऱ्या व्यक्तीची जबाबदारीही वाढते. कोणत्याही वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असणाऱ्या व्यक्तीवर व्यावसायिक आणि नैतिक जबाबदारीची जाणीव हा पांढरा कोट करून देतो. डॉ. जैन. (डॉ. मगनलाल माणकचंद जैन (कोटेचा) यांनी हा पांढरा कोट १९५६ सालापासून आजपर्यंत वापरलेला आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वास्तव दर्शन करणाऱ्या पुस्तकाचे नावद व्हाईट अॅप्रनआहे हे उचितच आहे. डॉ. जैन हे वैद्यकीय व्यवसायातील उच्चशिक्षित आहेत. वैद्यकशास्त्राच्या दोन प्रमुख शाखांमध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. अशी दोन शास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे डॉक्टर्स फारच थोडे असतील. इंटर्नल मेडिसिन आणि बालरोगशास्त्र या दोन्ही शाखांमध्ये अत्युच्च परिक्षांत ते पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले ही गोष्ट त्यांना, त्यांच्या शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना अभिमानास्पद आहे.

डॉक्टरांचे आयुष्य किती खडतर व कष्टप्रद असते याची कल्पना सामान्य जनतेला अनेकदा नसते. त्यातून आजचा समाज व सामाजिक मूल्ये बदलत चालली आहेत. अशा वेळी आपली नैतिकता सांभाळून व्यवसाय करणे किती कठीण आहे हे व्यवसायातील माणसांनाच कळते. एका बाजूने आपले व्यावसायिक कौशल्य उत्तम तर ठेवावेच लागते तर दुसरीकडे सामाजिक प्रतिष्ठा टिकवून ठेवावी लागते. समाजाच्या अपेक्षादेखील वास्तव जाणून बनलेल्या नसतात. या सगळ्या बाजूंना तोंड देत व्यवसाय करावा लागतो. व्यावसायिक आणि नैतिक बाजूंना सांभाळीत राहणे हे असि-धारा-व्रत जन्मभर करावे लागते. डॉ. जैन यांनी हे केले. यशस्वीरीत्या केले, कठिणाईला सतत तोंड देत देत केले. वैद्यकीय व्यवसाय निवडण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचावे. त्यातील विचारांवर मनन आणि चिंतन करावे. प्रत्येक डॉक्टरने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे आणि अडचणी आल्या म्हणून नाउमेद होऊ नये.

डॉ. जैन यांनी हे आत्मकथन अत्यंत प्रामाणिकपणे मांडलेले आहे. असे करण्यास उच्च नैतिक बळ लागते. अन्यथा बहुतेक वेळा आपल्या मिळालेल्या यशाबद्दल लिहिणे आणि अपयशाबद्दल मूग गिळणे म्हणजे आत्मचरित्र लिहिणे असा प्रकार अनेकदा दिसतो. डॉ. जैन यांच्या मनाचा मोठेपणा या त्यांच्या प्रांजळपणातच दिसतो. अशा पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचा मान त्यांनी मला दिला याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. डॉ. जैन यांना दीर्घायुरारोग्य चिंतितो. असेच समाजाचे आणि वैद्यकीय व्यावसायिकांचे मार्गदर्शन त्यांनी करीत रहावे अशी एक प्रेमळ सूचनाही करतो.

- डॉ. . वि. सरदेसाई


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि