40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान सप्टेंबर २०१ ८ - विविध लेखक

Description:

सृष्टिज्ञान - ध्यास ‘सृष्टिज्ञान’चा, कास विज्ञानाची, आस समृद्धीची !केरळमधील महापूर

एकीकडे माणसाला अंतराळाची रहस्ये जाणून घेण्याची खूपच उत्सुकता आहे. त्यासाठी त्याचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. तर त्याच आकाशातून पडणाऱ्या मुसळधार संततधारेने देवभूमी केरळ राज्याची प्रचंड वाताहत केली आहे. हे वास्तव गेल्या पंधरा-वीस दिवसांत पहायला मिळते आहे.

काही निरीक्षणांवरून असे सांगण्यात आले आहे की, गेल्या 80 वर्षांपूर्वी एवढा विध्वंसक पूर केरळमध्ये आला होता. त्यानंतर आत्ता झालेली ही अतिवृष्टी अधिक संहारक ठरली आहे. केरळमधील माणसांचे जनजीवन खूपच विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात घरांची पडझड, दरडी कोसळणे, रस्ते खचणे अशी हानीही झाली आहे. जनावरे, वन्यपशू, पक्षी, या पुरात वाहून गेले आहेत. तर अति पावसाच्या ओल्या दुष्काळाचे संकट शेती उत्पादनांवर कोसळले आहे. पर्यावरण अभ्यासकांच्या मते, केवळ अतिवृष्टीमुळे केरळ राज्यात ही अभूतपूर्व आपतकालीन पूरस्थिती निर्माण झाली नाही तर केरळच्या पश्चिम घाटातील खाणकामे आणि बांधकामे त्याला विशेष कारणीभूत आहेत. त्यासाठी झालेली वृक्षतोड, पर्यटकांसाठी करण्यात आलेल्या सुखसोयी आणि रस्तेबांधणी, या कारणांमुळे केरळची नैसर्गिक भूशास्त्रीय जडणघडण बदलली आहे. अशा या मानवी निसर्ग हस्तक्षेपाने आज केरळला फार मोठी किंमत मोजावी लागते आहे. जसे निसर्गाचे नुकसान झाले आहे, तसेच येथील स्थानिक रहिवाशांचेही जीवन उद्ध्वस्त झाले आहे. निसर्ग नियमांचे पालन झाले नाही तर, कशी भयावह परिस्थिती ओढवते याचे केरळ राज्य हे ढळढळीत उदाहरण आहे. अर्थातमागच्यास ठेच, पुढचा शहाणाअशा प्रकारचे अनुभवातले शहाणपण प्रत्यक्षात आणण्याचे तारतम्य आपण कधी आणि कसे दाखवणार हाच खरा कळीचा प्रश्न आहे.

झेपावे सूर्याकडे !

12 ऑगस्ट 2018 हा दिवस अंतराळ संशोधन क्षेत्रासाठी अतिशय अविस्मरणीय ठरला आहे. या दिवशीनासाया अमेरिकेच्या जगप्रसिद्ध संशोधन संस्थेचेपार्कर सोलर प्रोबहे यान अंतराळात प्रक्षेपित झाले. सूर्याला स्पर्श करण्याची ही अतिशय मोठी, महत्त्वाकांक्षी मोहीम नासाने आखली आणि मानवी प्रज्ञा, जिज्ञासा आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच जणू कामाला लागली.

2009 मध्ये या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अप्लाइड फिजिक्स लॅबोरॅटरी या विभागाकडे अंतराळ यानाच्या आराखड्याची आणि ते तयार करण्याची जबाबदारी नासातर्फे सोपविण्यात आली होती. फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून एलियान्स डेल्टा - 4 या रॉकेटच्या माध्यमातून या यानाच्या अतिदूरच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. 1958 मध्ये डॉ. युगेन पार्कर यांनी पहिल्यांदा सूर्यावर जोरात उष्ण वारे वाहत असल्याचे संशोधन केले होते. त्यांचे हे संशोधन सूर्यासंबंधीचे अतिशय महत्त्वाचे आणि सूर्याची विशेष माहिती देणारे होते. सध्या डॉ. पार्कर हे 91 वर्षांचे आहेत. त्यांच्या सन्मानार्थ या यानाचेपार्कर सोलर प्रोबअसे नामकरण करण्यात आले. यानाला ऊर्जा पुरविण्यासाठी सौर तावदाने लावण्यात आली आहेत. ताशी 43,000 मैल इतक्या प्रचंड वेगाने हे यान सूर्याकडे झेपावते आहे.

सूर्याभोवती नक्की आहे काय ? सौर कण आणि सौर वादळांची निर्मिती कशी होते ? सूर्याभोवतालचे किरीट कसे आहे ? अशा सर्व कुतूहलजन्य प्रश्नाचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे. हे यान तब्बल 7 वर्षे अवकाशात राहणार आहे. कारण शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार सूर्याच्या वातावरणाला स्पर्श करण्यासाठी या यानाला एवढा अवधी निश्चितच लागणार आहे.

या यानाची 25000 से. तापमान सहन करण्याची क्षमता आहे. खरे तर सूर्याचे प्रखर तापमान हेच फार मोठे आव्हान या यानासमोर आहे. त्यापासून बचाव होण्यासाठी यानाच्या समोर कार्बन कंपोजिट 4.5 इंच आकाराचीथर्मल प्रोटेक्शनयंत्रणा लावण्यात आली आहे. याढालीमुळे यानातील यंत्रसामुग्री सुरक्षित राहील, असा संशोधकांचा कयास आहे.

सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा त्याच्या वातावरणाचे तापमान 300 पटींनी अधिक आहे. त्यामुळेच सूर्यापासून सुमारे 61 लाख किलोमीटर अंतरावरून फेऱ्या मारत सूर्याचे निरीक्षण केले जाईल. संशोधनानुसार सूर्याच्या अजून अधिक जवळ जाणे, सध्या तरी शक्य होणार नाही. कारण सूर्याच्या चौफेर असणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या ज्वाळांमध्ये कोणतीही वस्तू क्षणात जाळण्याची क्षमता आहे.

सूर्याच्या एवढ्या जवळ जाणारं हे जगातलं पहिलं यान आहे. एकूणच ही मोहीम म्हणजे अंतराळ रहस्य उलगडण्याच्या दृष्टीने टाकलेले फार मोठे धाडसी पाऊल आहे. विज्ञानाच्या प्रगतीचे ते फार मोठे द्योतक ठरणार, हे निश्चित ! भविष्यकाळात या यानाची वाटचाल कशा प्रकारे होईल, हे पाहणेही मोठे कुतूहलाचे आणि उत्सुकतेचे आहे.

जे न देखे रवि ते देखे कविअसे म्हटले जाते, आता माणूस प्रत्यक्ष रविलाच पाहण्यासाठी निघाला आहे, त्याच्या या प्रवासालासृष्टिज्ञानकडून शुभास्ते पन्थाः

कविता भालेराव

 

कार्यकारी संपादक


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)