40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान मार्च २०१ ८ - विविध लेखक

Description:

‘सृष्टिज्ञान’ हे एक वैज्ञानिक मासिक आहे. सुमारे ९० वर्षांपूर्वी प्रा. गोपाळ रामचंद्र परांजपे यांनी दिनांक १ जानेवारी, १९२८ ला ‘सृष्टिज्ञान’ हे मासिक सुरु केले.महिला वैज्ञानिक विशेषांकाच्या निमित्ताने

 

मार्च महिन्याचा हामहिला वैज्ञानिकविशेषांक म्हणून प्रसिद्ध करताना आम्हाला विशेष आनंद वाटतो आहे. या अंकाची कल्पना सुचली ती एका बातमीने! ही बातमी होती नुकत्याच निधन पावलेल्या डॉ. लिली हॉर्निग यांच्या संबंधीची!

निधनासमयी त्यांचे वय 96 वर्षे होते. याचा अर्थ 1920 हे त्यांचे जन्मवर्ष! 20व्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या या स्त्री वैज्ञानिकेची उत्सुकतेने अधिक माहिती मिळवली. तेव्हा कळलं की, दुसऱ्या महायुद्धाच्या निमित्ताने अणुबॉम्ब संशोधनासाठी मॅनहटन प्रकल्प राबविला गेला होता. त्यात एकूण 1500 वैज्ञानिक होते. त्यात डॉ. लिली हॉर्निग यांचा सहभाग होता. ही गोष्ट त्या काळानुसार एकूणच धाडसाची आणि एका महिलेसाठी मोठ्या कर्तृत्वाची होती.

सुरुवातीला डॉ. लिली यांना या प्रकल्पाचे गुप्त अहवाल टंकलिखित करण्याचे काम दिले होते. परंतु डॉ. लिली यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. त्या ट्रिनीटी कॉलेजमध्ये रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख होत्या. त्यामुळेच त्यांनी आपण मुलगी आहोत म्हणून दुय्यम स्वरूपाची नोकरी आपल्याला दिली गेली आहे या विचाराने ठाम नकार दिला. त्या नकारात खूप आत्मविश्वास होता आणि त्याची ताकद एवढी होती की, शेवटी मॅनहटन प्रकल्पात त्यांना संशोधन करण्याची संधी दिली गेली.

विज्ञानात महिलांना स्थान मिळाले पाहिजे यासाठी सक्रियपणे काम करणाऱ्या त्या वैज्ञानिक होत्या. माझ्या शिक्षणाला, ज्ञानाला साजेसे काम मी मिळवणार या निर्धाराने त्यांनी प्रयोगशाळेत काम मिळविले.

रसायनशास्त्रात पीएचडी केल्यावर त्यांनीविज्ञानातील महिलाया विषयाला वाहून घेतले. महिला वैज्ञानिक, प्राध्यापक, विद्यार्थिनी यांना सातत्याने उत्तेजन दिले. उच्च शिक्षण व विज्ञानातील महिला या विषयावरील तीन पुस्तकांचे संपादन केले. डॉ. लिली यांना अनेक संस्थांमध्ये महिलांविषयी सापत्नभावाची वागणूक दिल्याचे जाणवे. तसेच महिला वैज्ञानिकांना पुरुषांपेक्षा कमी वेतन दिले जाई. डॉ. लिली यांनी धीटपणेद न्यूयॉर्क टाईम्सया वर्तमानपत्रात पत्र लिहून आपला आवाज उठवला. ही गोष्टी 60-70 वर्षांपूर्वी विशेष दखल घेण्याजोगी होती. अर्थात महिला वैज्ञानिकांविषयीचा हा दृष्टिकोन जगभरच होता. तसेच महिला विज्ञान क्षेत्रात कितपत काम करू शकतील, हा संशयही नेहमीच व्यक्त केला गेला आहे. भारतात देखील डॉ. कमला सोहोनी यांना अशाच विचारांना टक्कर देऊन स्वतःला सिद्ध करावे लागले होते.

हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली आहे. महिला वैज्ञानिकांनी विज्ञान संशोधन क्षेत्रात चमकदार कामगिरी करत आपले स्थान दुय्यम नाही हे दाखवून दिले आहे. या अंकातील लेख आपल्याला याची साक्ष पटवतील असा सार्थ विश्वास वाटतो. अर्थात हा विषय व्यापक आहे आणि कर्तृत्ववान महिलांची यादीही खूप मोठी आहे. तरीसुद्धा या अंकातील लेखांनी, वाचकांची उत्सुकता अधिक वाढेल व त्या संबंधी अधिकाधिक माहिती ते मिळवतील, हा आशावाद आमच्यासाठी हुरूप वाढवणारा आहे हे निश्चित!

कविता भालेराव

कार्यकारी संपादक


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)