40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान जुलै २०१ ८ - विविध लेखक

Description:

सृष्टिज्ञान - ध्यास ‘सृष्टिज्ञान’चा, कास विज्ञानाची, आस समृद्धीची !संपादकीय

पर्यावरणाचा मागोवा

 

मागच्या आठवड्यात वर्तमानपत्र वाचता वाचता दोन - तीन वेगवेगळ्या परंतु शेवटी पर्यावरणापाशीच जाऊन थांबणाऱ्या बातम्या वाचनात आल्या. या साऱ्या बातम्या माणसाच्या वृत्ती आणि प्रवृत्तींशी निगडीत आहेत. पहिली बातमी पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातील मुळा - मुठा नदीपात्र प्रदूषीत झाल्याबद्दलची होती. याठिकाणी नदीचे पाणी अत्यंत प्रदुषीत झाले आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यावर प्रदूषणाचा चक्क फेस तरंगतो आहे. एकीकडे नदीला जीवनदायिनी म्हणायचे, आमच्या प्राचीन संस्कृती; नदीच्या उपयुक्ततेमुळेच नदीकाठी वसल्या असे गोडवे गायचे. मात्र प्रत्यक्षात नदीचे पाणी खराब होईल, अशाच पद्धतीने वागायचे. यातील विरोधाभास कसा समजून घ्यायचा हाच प्रश्न आहे.

गेली दहा वर्षे पुण्याचे उपनगर असलेल्या निगडीत एक पर्यावरणप्रेमी गट झपाट्याने काम करतो आहे. पुणे - मुंबई महामार्गाच्या जवळील देहूरोड भागातील उजाड टेकडी, हिरवीगार करण्यासाठी ही मंडळी दर रविवारी व इतर सुट्ट्यांच्या दिवशी अक्षरशः झटते आहे. या घोरवडेश्वर टेकडीवर 8000 स्थानिक झाडे लावून, ती जगवून चांगली वाढवली देखील आहेत. जणू काही पक्षी, कीटक व इतर लहान - लहान प्राण्यांसाठी हे नवे जंगल या गटाने उभे केले आहे. अंतःप्रेरणेने होणारी कामेच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात, असे या पर्यावरण संवर्धनाच्या कामावरून सिद्ध होते आहे.

 

पुणे शहरातील पर्यावरण प्रदूषण फार वाढले आहे, असे सातत्याने म्हटले जाते. अर्थात पुणेच काय पण आपल्या देशातील प्रमुख शहरे प्रदूषणाच्या खरोखर विळख्यात अडकली आहेत. त्यावर मात करण्याचे प्रयत्न किती यशस्वी आणि उपयोगी होतील, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तरीसुद्धा अशा प्रयत्नांना आपण जमेल तेव्हा नक्की साथ द्यावी. किमान त्याबद्दल समाधान तरी व्यक्त करावे व प्रेरणा घ्यावी अशीच सध्याची परिस्थिती आहे.

अशीच अजून एक बातमी म्हणजे राज्यशासनाच्यावतीने पुण्याच्या प्रसिद्ध वेताळ टेकडीवरील वनपरिक्षेत्रात जैवविविधता उद्यान उभे केले जाणार आहे. यामध्ये स्मृतिवन, पंचवटीवन, बांबूवन, औषधीवन, गुलाबवाटिका अशा विविध प्रकारच्या वनांच्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे. हे जैवविविधता उद्यान सर्वांच्या सहकार्याने आगामी दोन वर्षात साकारले जाईल, असे ठरले आहे. हे उद्यान इतर शहरांसाठीपथदर्शी प्रकल्पठरावे. त्यामुळे इतर शहरांमध्ये आजूबाजूला टेकड्यांवर व पाणथळ जागेत विपुलतेमुळे वाढणारी स्थानिक प्राणी - पक्षी - कीटक संपदाही पर्यावरण संवर्धनास सहाय्यभूत ठरेल. एका संशोधनाद्वारे वाघ, हत्ती यासारखे प्राणी दिवसा जास्त झोपा काढतात आणि रात्री फिरत आहेत. त्यांनी आपले झोपेचे वेळापत्रक, माणसांच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने बदलले आहे, असे निरिक्षणाद्वारे सिद्ध करण्यात आले आहे. माणसापासून दूर पळाल्यानेच आपले अस्तित्व बिनधोक होईल, असे या प्राण्यांना का वाटते आहे ? त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी माणसानेच जबाबदारीने वागायला हवे आहे ना ? कारण या पृथ्वीतलावरील सर्व सजीव प्राणीमात्रांना, एका ठरावीक साखळीनेच उत्तमरितीने बांधून/जोडून ठेवलेले आहे. त्यातच प्रत्येक सजीवाचे जीवन जगण्याच्या पद्धतींना विशेष महत्त्व आहे. माणसाने आणखी उशीर न करता हे आता तरी ओळखायलाच हवे आहे.

कविता भालेराव

कार्यकारी संपादक

 

 


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)