40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान ऑगस्ट २०१ ८ - विविध लेखक

Description:

सृष्टिज्ञान - ध्याससृष्टिज्ञानचा, कास विज्ञानाची, आस समृद्धीची !समुद्र अन्नसाखळी धोक्यात ?

 समुद्राच्या लाटांबरोबर समुद्र शैवालासारख्या सूक्ष्म वनस्पती आणि सूक्ष्म जीव हेलकावे खात, तर कधी तरंगत असतात. त्यांचे समुद्रातील अस्तित्व अत्यंत महत्त्वाचे आणि अनन्यसाधारण असेच आहे. ही प्लवकवनस्पती सृष्टी आणि प्लवक प्राणीसृष्टी सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कार्बन डायॉक्साइड व इतर खनिजद्रव्यांचे कर्बोदकात रूपांतर करतात. समुद्रातील कोळंबी, झिंगे सारखे छोट्या छोट्या कवची प्राण्यांचे हे अन्न असते. त्याच्यावर त्यांची चांगली वाढ होते. हा त्यांचा शाकाहार असतो. म्हणून त्यांना शाकाहारी छोटे जलप्राणी म्हणतात. आता या प्राण्यांना त्यांच्यापेक्षा मोठे मासे खातात. ते मांसाहारी मासे म्हणून ओळखले जातात. लहान प्लवकाची प्रजनन क्षमता खूपच असते. त्यामुळे समुद्रात त्यांची संख्याही खूप असते. त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचे काम हे शाकाहारी जलप्राणी करतात. तर मांसाहारी माशांना समुद्रातील शक्तिमान आणि आकाराने मोठे असलेले प्राणी खातात. देवमासे, शार्क, डॉल्फीन्स, ट्यूना त्याचबरोबर पेलिकन्स, पेग्विन्स, सिल, वॉलरस अशी ही सर्व सागरी प्राणीसृष्टी आपले भक्ष्य पकडण्यात तरबेज आहे. ती आकाराने प्रचंड आणि दीर्घायुष्यी असतात. परंतु त्यांचे प्रजनन संथपणे चालते त्यामुळे त्यांची संख्याही मर्यादित असते.

असे हे समुद्र परिसंस्थेतील अन्नसाखळीचे विविध टप्पे आहेत. काही सागर संशोधकांच्या मते, ही एका जातीच्या जलचराकडून दुसऱ्या जातीच्या जलचराकडे अन्नाच्या स्वरूपात ऊर्जा हस्तांतरित केली जाते. म्हणून त्यालाअन्न जाळे’ (फूड वेब) असेही म्हणले जाते. समुद्रातील जलचरांच्या काही जाती या स्वतःच्याच जातीतील प्राणीही खातात, हेही या अन्नजाळ्यांचे एक निराळेपण आहे.

सध्या ही समुद्रातील अन्नसाखळी धोक्यात आलेली आहे. त्यामुळे सागरी परिसंस्थाही अडचणीत आल्याचे संशोधनाचे निष्कर्ष आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, अन्नसाखळीतील सर्वात वरच्या टप्प्यावरील मोठ्या माशांची माणसांकडून मोठ्या प्रमाणात शिकार होत आहे. मांसाहारी माशांची चव चांगली असल्याने त्यांना खूप मागणी असते. अति मासेमारीमुळे त्यांचे समुद्रातील प्रमाण घटले आहे. ही सर्वात वरची अन्नसाखळी विस्कळीत झाल्यामुळे, त्याचे विपरीत परिणाम, संपूर्णपणे खालपर्यंत पोहोचले आहेत.

मासेमारीमध्ये काळानुरूप तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यात तीव्र व्यावसायिकता आली आहे. उपग्रहांच्या आधारे, माशांना शोधण्याची यंत्रणा वापरण्यात येत आहे. अशा निरनिराळ्या कारणांनी आधीच प्रजननाचा वेग कमी असलेल्या या माशांच्या संख्येत लक्षणीय घट जाणवते आहे. त्याचबरोबर काही माशांचे आकारही लहान झाल्याचे सांगितले जाते. अतिमासेमारी बरोबरच हरितगृहांमधील वायू, स्थानिक प्रदूषण या कारणांनीही जगभरातील सागरी अन्नसाखळी धोक्यात आली आहे.

समुद्राच्या पाण्याचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे माशांच्या वर्तणुकीवर व वसतिस्थांनावर अनिष्ट परिणाम होत आहेत. या पाण्याच्या तापमान वाढीने समुद्र शैवाल व सूक्ष्मजीवांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, साहजिकच लहान माशांना जास्त खाद्यपुरवठा उपलब्ध होतो. परंतु तापमान वाढीने त्यांचे प्रजनन घटल्याने, हे संतुलनही बिघडले आहे. पर्यायाने वरच्या टप्प्यांमधील माशांचे अन्न कमी झाले आहे, असे एका संशोधनात मांडले गेले आहे. समुद्राच्या पाण्यातील आम्लतेत वाढ होते आहे. त्यामुळे कालवे, शंबुक यांना संरक्षक कवचे तयार करण्यात अडचणी येत आहेत.

एकूणच समुद्राची बदलती अन्नसाखळी सागरी परिसंस्थेसाठी चिंताजनक ठरते आहे, तशीच ती एकूणच मनुष्यजातीवरही गंभीर परिणाम करणारी आहे.

या महिन्यात आपण नारळीपौर्णिमा साजरी करणार आहोत. फार प्राचीन काळापासून समुद्राचे माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचे स्थान आहे. जलमार्गाने एका देशातून दुसऱ्या देशात केवळ व्यापारच नाही तर तत्त्वज्ञान, धर्म, भाषा, संस्कृती इ. महत्त्वाच्या गोष्टींचेही आदान-प्रदान झाले. समुद्राने माणसाला जगण्यासाठी मासेरूपी अन्नही पुरवले. त्या माशांच्या ज्येष्ठ-आषाढ महिन्यांमधील प्रजननाच्या काळात समुद्रात आपण ढवळाढवळ करायची नाही, अशी कृतज्ञता आणि संयम पूर्वी पाळला जात होता आणि नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्रात नावा नेण्यास आरंभ करत होते. हा एक निसर्ग संतुलनाचाच विचार होता नाही का ? आजच्या माणसाने हे कसोशीने शिकायला हवे आहे, असे वाटते.

कविता भालेराव

 

कार्यकारी संपादक


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)