40.00 80.00
Download Bookhungama App

स्पर्श-अस्पर्श - सी. एल. कुलकर्णी

Description:

हा विषय एका वेगळ्या मितीने माझ्याशी जोडला गेला आहे आणि म्हणून त्या बाबतीतल्या अतिशय साध्या सोप्या तुम्हा आम्हामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या संवेदनांच्या कुप्या उलगडाव्या ह्या हेतूने केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे......!!मनोगत

हा विषय एका वेगळ्या मितीने माझ्याशी जोडला गेला आहे आणि म्हणून त्या बाबतीतल्या अतिशय साध्या सोप्या तुम्हा आम्हामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या संवेदनांच्या कुप्या उलगडाव्या ह्या हेतूने केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे......!!

मी ह्यातकवितांविषयीलिहिणार असलो तरी मान्यता प्राप्त हयात अथवा दिवंगत कवींपासून, ‘कविता ह्याविषयात बराच दूर आहे. त्यांच्याशी, वाचन-चर्चा-प्रबोधन अशी कुठलीच देवाण घेवाण, माझी आजतागायत झालेली नाही. जे आहे ते माझ्या स्वतःच्या प्रवासातील अनुभवांवर बेतलेलं आहे. त्यात कुणाला काय वाटेल ह्याचा अंदाज मला नाही; कारण हा प्रयोगही पहिलाच आहे.

कविता शिकवणे, रसग्रहण करून ज्ञानाचं प्रदर्शन करणे किंवा माझं कवित्त्व सिद्ध करणे यापैकी कुठलाच उद्देश ह्यात नाही. जगातील प्रत्येक व्यक्ती ही कवी असते, मिटलेल्या पाकळीसारखी. तिला उघडण्याचा माझा हा अल्पसा भृंग प्रयत्न आहे. पाकळी उमलली तर दोघांनाही आनंद आहे. तुमच्यातल्या कवीला; त्याची स्वतःची ओळख देण्याचा एक हा प्रयास आहे.

कवित्त्व ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. जिथे मन, भावना, संवेदना असतात तिथे, रामचरणी मारुतीरायासारखी, कविता असतेच, पण तिची अवस्था ही सरदारजीच्या विनोदासारखी चेष्टेचा विषय होईल की काय म्हणून भितीपोटी अव्यक्त राहण्यात होते. त्यातला मी ही एक आहे. ह्या निमित्ताने हा गंड निवळला तरीमी माझं समाधान करू शकलोह्याचा मला आनंद मिळेल, आणि आपला त्याला उत्तेजक प्रतिसाद मिळाला तर तो आनंद द्विगुणित होईल......!!!

पाहू या..............

विस्मृती आणि आठवणी ह्या दोघांच्या बळावर माणूस जगतो असं मला नेहमीच वाटत आलं आहे. प्रत्येक नाण्याला, स्वभावाला, वृत्ती-प्रवृत्तींना दोन बाजू असतातवाईट विसरणे आणि चांगले लक्षात ठेवणेआणित्या उलटअशा त्या दोन बाजू.

सुदैवाने मी पहिल्या गटात जन्माला आल्याने एक तर वाईट गोष्टींचे विस्मरण मला झालेले असते किंवा त्या वाईटाने मला काय चांगले दिलेले आहे ह्याचे स्मरण स्मृतिकोषात घर करून राहिलेले असते.

तसं जगात प्रत्येकाचं आयुष्य, त्याची वाटचाल आणि अनुभवांची शिदोरी वेगळी असते. त्यात दुसऱ्याच्या अनुभवातून शहाणं होण्याची वृत्ती सहज असते परंतु स्वानुभवातून मिळालेली अनुभूती जास्त सशक्त, सकस असते.

अनुभूतींचा समन्वय आणि अनुनय ह्यातून निर्माण झालेलं साहित्य काहींना दिशा दर्शक, काहींना पुनःप्रत्ययाचा आनंद देणारं, क्वचित सुप्त दृष्टी पुनरुज्जीवित करणारं असू शकतं. अशी निर्मिती, किमान रंजक तरीही उद्बोधक आणि सुप्त गाठींचा उलगडा करणारी झाली तर दुधात साखरच!

माझ्या हातून वेळोवेळी झालेलं लिखाण हे त्या त्या वेळच्या परिस्थिती आणि मनस्थितीतून पाझरलेला स्त्रोत आहे. काळवेळपरत्वे जे जे जेव्हा जेव्हा जसं जसं सुचत गेलं तसं तसं मी वेगळी डायरी करून त्यात अनुक्रमाने वेळ, वार, ठिकाणाची नोंद करून लिहून ठेवत गेलो. जाता येता प्रत्यक्ष भावनिक स्पर्शाला मिळत गेलेले दान साठवत गेलो. डायरीची सुरुवात मनोगताने होत गेली आणि तिची सांगता प्रवासातल्या अनुभवांच्या अवलोकनाने.

लोक स्वतःची जन्मकहाणी आत्मवृत्तात लिहितात. ही माझ्या कवितांची जन्म कहाणी आणि प्रवासाची अनुभव कथा आहे. किंबहुना तिच्या प्रवासाचं अमृतवर्णन आहे. असं वर्णन कुणी मोठ्या प्रस्थापित कविंनीच लिहावं असा कुठे प्रघात नसल्याने माझ्यातल्या प्रज्ञामूषकाने हा शब्दांचा डोंगर उभा करायचा प्रयत्न केला आहे. कदाचित ह्याला मुंग्यांचं वारुळही म्हणता येईल. कारण आत साचलेल्या भावनांचं शब्दांनी बाहेर उभं केलेलं हे मखर आहे. बऱ्याचदा पुन्हा वाचायला घेतल्यावर हे आपणच लिहिलयं ह्यावर मलाच विश्वास ठेवणं अवघड जातं आणि तसं तिऱ्हाइतासारखं वाटूनही ते मला आवडतं म्हणून इतरांनाही आवडू शकेल असं वाटतं. माझ्या ह्या विचाराला माझे हितचिंतक सहकारी सर्वश्री धनंजय गोवर्धने, विनायक रानडे, मिलिंद जोशी, आणि सौ. सुहास यशवंत जोशी ह्यांचे अनुमोदन आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व संपादन होत असल्याने सादरीकरणाचं सर्व श्रेय त्यांनाच असेल. त्यांचे आभार मानून त्यांना लहान करण्याऐवजी इथे त्यांची ओळख व्हावी एवढाच हा उल्लेख करण्यामागचा उद्देश.

- चारुदत्त लक्ष्मण (सी. एल.) कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि