190.00 348.00
Download Bookhungama App

१८५७चे स्वातंत्र्य युद्ध : पेटलेला दक्षिण हिंदुस्थान - वा. द. दिवेकर

Description:

या पुस्तकाचा हेतू सर्वसाधारणपणे १८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात दक्षिण हिंदुस्थानचा जो सहभाग होता तो गौरविणे हा आहे, विशेषत्वेकरून, ज्या स्वातंत्रयोद्ध्यांनी आपली जीवने या लढ्यात संपवली, किंवा ज्यांना जन्मठेप काळ्या पाण्यावर हद्दपारी भोगावी लागली, अथवा १८५७च्या दक्षिण हिंदुस्थानातल्या या लढ्यात भाग घेतल्याबद्दल ज्यांना अपार कष्ट भोगावे लागले त्यांची नावे प्रकाशात आणणे, हा आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या जोखडाखालून मुक्त होण्याचा हिंदुस्थानचा लढा, ही एक प्रदीर्घ काळ चाललेली घटना होती. हा लढा शतकाहून अधिक काळ चालला, व आतुरतेने ज्याची वाट पाहिली जात होती ते स्वातंत्र्य आले, ते अनेक चळवळींच्या पोटी व परिस्थितिशरणतेमुळे. स्वातंत्र्याचा लढा चालू असतानाच्या काळात हिंसक व अहिंसक अशा दोन्ही प्रकारच्या परस्परांशी मेळ नसलेल्या निरनिराळ्या राजकीय चळवळींचे दबाव होते. आणि यातून अनेक वाद व राजकीय, घटनात्मक, आर्थिक व सामाजिक बदलाच्या संस्था उत्क्रांत होत गेल्या. याचा परिणाम म्हणून आजचे लोकशाहीप्रणीत राजकीय शासन अस्तित्वात आलेले आहे. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याची उभारणी त्याच आधारांवर झालेली आहे.

ब्रिटिश सत्ता १९व्या शतकाच्या प्रारंभापासून जसजशी पसरत गेली, तसतसा हिंदी लोकांना राजकीय दडपशाहीचा, वसाहतवादी आर्थिक पिळवणुकीचा व वांशिक भेदभावाचा सर्व भार सहन करत जावा लागला. जेव्हा जेव्हा ब्रिटिश सत्ता देशाच्या एखाद्या भागात दृढमूल होत गेली, तेव्हा तेव्हा तेथील स्थानिक जनतेला सामाजिक आर्थिक व राजकीय संकटांना तोंड द्यावे लागले, व कधी कधी ती जनता बंड करून उठाव करू लागली.

हिंदुस्थान हा प्रचंड देश आहे. शिवाय हा देश बहुभाषिक असून ठिकठिकाणी वेगवेगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी व समस्या आहेत. १८५७चा स्वातंत्र्य संग्राम हा राष्ट्रीय पातळीवरील पहिला उठाव होता, की ज्यात सर्व प्रादेशिक, भाषिक, धार्मिक व सामाजिक भेदांवर मात करून, हिंदुस्थानची जनता त्यात सहभागी झाली. वेगवेगळ्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांनी व लोकांनी त्यात जो सहभाग घेतला त्याचे ज्ञान, शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा त्या युद्धाचे स्वरूप व व्यापकता समजून घेण्यासाठी नितांत आवश्यक आहे.

 

१८५७च्या उठावात दक्षिण हिंदुस्थानने काही भाग घेतला नाही व ते केवळ शिपायांचे युद्ध होते असा जो सर्वसाधारण समज आहे, तो ऐतिहासिक सत्याबद्दलच्या अज्ञानामुळे आहे. अगदी प्रथमच, या सत्य गोष्टी डॉ. वा. . दिवेकर यांनी या पुस्तकात एकत्रितपणे आणलेल्या असून, यामागे त्यांनी लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे केलेल्या संशोधनाचे परिश्रम आहेत. त्यांनी सुरवातीलाच आपल्यापुस्तक परिचयातवाचकांना इशारा दिलेला आहे, की प्रस्तुत पुस्तक म्हणजे १८५७च्या युद्धातील दक्षिण हिंदुस्थानच्या सहभागाचा विस्तारपूर्वक लिहिलेला इतिहास नाही. असे असले तरी, या पुस्तकात आपल्याला, त्या युद्धात त्या त्या स्थानिक नेत्यांनी व सर्व सामान्य लोकांनी, तळागाळावरील पातळीपर्यंत जी भूमिका बजावली, त्याचा महत्त्वाचा तपशील मिळतो. आजच्या ऐतिहासिक सत्याच्या ज्ञानात, खरोखरच ही महत्त्वाची भर पडलेली आहे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि