60 140
Download Bookhungama App

स्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते - गंगाधर गाडगीळ

Description:

गंगाधर गाडगीळ लिखित विनोदी कथासंग्रहस्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते स्नेहलतानं फोन खाली ठेवला आणि ती अधीरेपणानं म्हणाली, “अहो, ऐकलं का? जगूभावजी अमेरिकेला चालले आणि बरोबर प्रमिलाताईपण जाताहेत.” पेपर वाचण्यात मग्न झालेला बंडू डोकं वर न करताच म्हणाला, “हो. हो. येस. येस.” आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत असताना बंडूनं आपल्याकडे दुर्लक्ष करावं यांचा स्नेहलताला संताप आला. तिनं बंडूच्या हातातला पेपर हिसकावून घेतला आणि त्याचं बकोट धरून त्याला गदगदा हलवीत म्हणाली, “अहो, पेपर कसले वाचत बसलाय? इथे सगळे लोक चालले अमेरिकेला आणि तुम्हाला त्याचं काहीच नाही...” “सगळे लोक? हे कोण सगळे लोक?” “कोण म्हणजे? जगूभावजी चालले आणि ते बरोबर प्रमिलाताईंनापण नेताहेत.” “अगं, पण जगू नेहमीच जातो आणि अधूनमधून प्रमिलावहिनीपण जातात त्याच्याबरोबर. त्यात काय आहे विशेष?” “प्रमिलाताईंची ही पाचवी खेप.” “असं का? वा, वा! मग आपण त्यांच्याकडून पाच पार्ट्या घ्यायच्या. प्रमिलावहिनी पार्ट्या मात्र मस्त देतात हां.” बंडू खूश होऊन म्हणाला. “डोंबल तुमचं! लोक जातात अमेरिकेला आणि तुम्ही नुसते इथे बसून पार्ट्या खाता.” स्नेहलतानं बंडूला ढकलून दिलं. सोफ्यावर कोलमडलेला बंडू पुन्हा सावरून बसत म्हणाला, “अगं, लोक जातात, लोक जातात असं तू म्हणते आहेस. पण हे लोक म्हणजे फक्त जगूच ना?” “नुसते जगूभावजी नाही, माझा चुलतभाऊपण चाललाय.” “तुझा चुलतभाऊ? म्हणजे ज्याच्या नाकावरची माशीदेखील उडत नसे तो?” “होय, तोच. तुमच्यासारखं त्याला अच्यावच्या बोलता येत नाही. पण तो गणितात भलताच पक्का आहे. आणि नाकावरच्या माश्या उडवण्यात वेळ न घालवता, त्यानं खूप अभ्यास केला. खूप डिग्र्या मिळवल्या आणि आता अमेरिकेत त्याला मोठी नोकरी मिळाली आहे. म्हणून तो चाललाय वहिनीला बरोबर घेऊन. आणि मी बसल्येय इथे तुमच्या नाकावरच्या माश्या उडवीत.” स्नेहलता संतप्तच नव्हे, तर क्रुद्ध आणि प्रक्षुब्ध झाली होती..... क्रमशः...


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि