40.00 90.00
Download Bookhungama App

शुक बहात्तरी - पी. व्ही. भानुशाली

Description:

शुकाने प्रभावतीला सांगितलेल्या चंचल स्त्री-पुरुषांच्या ७२ बोधकथा.फार फार वर्षांपूर्वी मदन नावाच्या एका संसारी माणसाजवळ शुक आणि मैना असे दोन पक्षी होते. हे दोन्ही पक्षी अतिशय बुद्धिमान होते. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेवर मोहित होऊनच मदन त्यांच्यावर जीवापाड प्रेम करीत होता.

पण हाच मदन आपल्या माता-पित्यांचा अनादर करून कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करीत नव्हता. त्याने कुठेतरी दूरदेशी जाऊन कुठला तरी व्यवसाय करावा अशी त्याच्या माता-पित्याची उत्कट इच्छा होती. पण मदन मान्य करील तर ना ?

ही गोष्ट अर्थातच शुकाला पसंत नव्हती. एके दिवशी संधी साधून तो मदनला म्हणाला,

न पूजयंति ये पूज्यं न मान्यं मानयंति ये

जीवनन्मृताश्च ते ज्ञेया मृताः स्वर्ग न यांत्यपि।।

अर्थ – “जे लोक आपल्या पूज्य माता-पित्यांचा आदर करून त्यांची पूजा करीत नाहीत असे लोक जिवंत असूनही मृतासमान आहेत. शिवाय त्यांना मृत्यूनंतर स्वर्गही लाभत नाही.”

आणि या श्लोकाला आधारून शुकाने जी गोष्ट सांगितली ती अशी-

फार फार वर्षांपूर्वी एका नगरात सप्तशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहात होता. त्याला धर्मशीला नावाची पत्नी आणि देवशर्मा नावाचा पुत्र होता.

सप्तशर्मा अतिशय विद्वान असल्यामुळे देवशर्माने त्याच्यापासून पुष्कळ विद्या प्राप्त केली आणि मग तो आपल्या माता-पित्याचा अनादर करून देशांतरास निघून गेला.

पुढे त्याला भक्तीमार्गाला लागण्याची सुबुद्धी झाली आणि अरण्यात जाऊन तो ईश्वराची भक्ती करू लागला. काही कालांतराने त्याला सिद्धी प्राप्त झाली आणि मग तो घरोघर भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागला.

एके दिवशी तो एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेलेला असता त्या ब्राह्मणाची पत्नी पतीसेवा करण्यात मग्न होती यामुळे साहजिकच भिक्षा देण्यास तिला विलंब झाला. यामुळे देवशर्मा तिच्याकडे क्रोधाने पाहू लागला.

यावर ती ब्राह्मण पत्नी म्हणाली, “महाराज, आपण नाहक क्रोध करू नये. कारण मी मुळीच दोषी नाही. केवळ पतीसेवेत मग्न असल्यामुळेच मला विलंब झाला.”

तिचे ते उद्गार ऐकून देवशर्मा अक्षरशः तिच्या चरणी आपले मस्तक ठेवीत म्हणाला, “हे देवी, तू खरोखरच महान स्त्री आहेस. कृपा करून मला उपदेश कर.”

यावर ती ब्राह्मण पत्नी म्हणाली, “महाराज, नकाराबद्दल क्षमा असावी. माझा सारा समय पतीसेवेत व्यतित होत असल्यामुळे मी आपणास उपदेश करण्यास असमर्थ आहे. पण आपण जर काशी क्षेत्राला राहणाऱ्या खाटकाकडे गेला तर तो आपणाला उपेदश करील.”

ब्राह्मण पत्नीच्या मार्गदर्शनानुसार देवशर्मा ताबडतोब काशी क्षेत्री रवाना होऊन खाटकाकडे आला.

पण तो खाटीक त्यावेळी माता-पित्यांच्या सेवेत मग्न असल्यामुळे साहजिकच देवशर्माला त्याची खूप वाट पाहावी लागली. सेवा आटोपताच तो खाटीक देवशर्माजवळ आला आणि म्हणाला,

आपणाला त्या पतिव्रता स्त्रीने माझ्याजवळ कशासाठी धाडले आहे हे मी अंतर्ज्ञानानेच जाणले, पण सत्यस्थिति अशी आहे की, आपल्यासारख्या थोर सिद्ध पुरुषाला उपदेश करण्याइतका मी थोर नाही. पण इतके मात्र अवश्य सांगू इच्छीतो की, आपण आपल्या माता-पित्याला सोडून उपदेश प्राप्तीसाठी इथे आलात हे अनुचित केलेत. तेव्हा आपण सरळ आपल्या घरात जाऊन आपल्या माता-पित्यांची सेवा करावी जेणे करून आपल्याला मोक्ष लाभेल.”

खाटकाच्या तोंडचा तो उपदेश ऐकून देवशर्मा ताबडतोब आपल्या घरी आला आणि आपल्या माता-पित्यांची सेवा करू लागला.

ही गोष्ट सांगून शुक मदनाला म्हणाला, “मदना, देवशर्माप्रमाणेच तू आपल्या माता-पित्यांचा अनादर करून व्यवसाय त्याग केलेला आहेस हे पूर्णतः अनुचित आहे. तेव्हा तू त्यांच्या विनंतीला मान्यता देऊन ताबडतोब व्यवहाराला लाग.”

शुकाचा उपदेश ऐकून मदनाच्या मनावर योग्य तो परिणाम झाला आणि त्या दिवसापासून तो माता-पित्यांची सेवा करू लागला.

थोड्याच कालावधीत सेवा आटोपताच तो आपल्या अत्यंत सुंदर आणि तरुण अशा पत्नीला - प्रभावतीला - शुक आणि मैनेच्या हवाली करून देशांतरास चालता झाला.

पण त्याचा परिणाम असा झाला की, पतीसेवेपासून क्षणभरदेखील दूर न राहणाऱ्या प्रभावतीला मदनाचा विरह असह्य झाला आणि ती त्याच्या आठवणीने रात्रंदिवस अश्रू ढाळू लागली.

प्रभावतीच्या मैत्रीणींनी तिची समजूत घालण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला, पण प्रभावतीचा शोक थोडादेखील कमी झाला नाही.

पती विरहाने दिवसें-दिवस झुरत चाललेल्या प्रभावतीला एके दिवशी तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, “प्रभावती, मदनाच्या विराहात सतत अश्रू दाबून तू स्वतःच्या शरीराची जी हानी करून घेत आहेस ती पूर्णतः अनुचित आहे. त्यापेक्षा एखाद्या पुरुषाबरोबर रममाण होऊन तू आपल्या तारुण्याचा सदुपयोग करून घ्यावास असे आम्हाला तरी वाटते.”

आपल्या मैत्रिणींचा उपदेश प्रभावतीला पटला आणि ती एका राजकुमारावर प्रेम करू लागली.

एके दिवशी ती भरपूर शृंगार करून त्या राजकुमाराशी प्रणयक्रीडा करावयाला चालली असता मैनेने तिचा धिःक्कार केला. तेव्हा प्रभावतीस क्रोध येऊन ठार मारण्यासाठी तिला पिंजऱ्याबाहेर काढले तोच मैना अचानक तिच्या हातातून निसटली आणि दूर उडून गेली.

नंतर त्याच दिवशी रात्री जेव्हा प्रभावती त्या राजकुमाराकडे जाण्यास निघाली तेव्हा शुकाने तिला अडविले आणि तिला अनीतीच्या मार्गावरून परावृत्त करण्यासाठी तो म्हणाला, “प्रभावती, तुझ्या अंगी जर लक्ष्मीसारखे चातुर्य असेल तरच तू त्या राजकुमाराकडे जा. अन्यथा न जाणे हेच उत्तम !”

ते कसे ?” असे प्रभावतीने विचारताच शुकाने तिला रोज एक याप्रमाणे ज्या बहात्तर गोष्टी सांगितल्या. या गोष्टी वाचण्यासाठी आजचं हे इ-बुक खरेदी करा. 

 


Format: Adaptive

Publisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)