30 76
Download Bookhungama App

शोधांचा प्रवास - डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे

Description:

विज्ञान व तंत्रज्ञानातील आज दिसणारी प्रगती डोळे दिपवून टाकणारी आहे. ही प्रगती काही दहापाच वर्षातली नाही. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. प्रगतीचा हा हमरस्ता अनेक पायवाटांनी बनला आहे. या पायवाटांवर प्रगतीच्या पाऊलखुणा पदोपदी पहायला मिळतात. या पायवाटा अनेक शतकापासून अेकमेकींना भेटत छेदत पुन्हा दूर जात आल्या आहेत. शोधाचे कोणतेही गणित नसते; ना त्याला काही काळ, वेळ, ठिकाण, व्यक्तीचे बंधन ! सर्व शोध हे अपघाताने लागतात. शोध लावायचा म्हणून कोणीही काहीही करत नसतो. जो सतत प्रयोगशील असतो, चिंतनशील असतो व निसर्गाचा डोळस निरीक्षक असतो त्यालाच कदाचित शोध लागतो. शोधाचे धागेदोरे दूरवर गेलेले दिसतात. त्या धाग्यादोऱ्यांची माहिती मनोरंजक आहे. ते शोध लावणाऱ्या शोधकाच्या विचारधारेतील, स्वभावातील गुणदोषाचे मनोज्ञ दर्शनही शोधांच्या प्रवासात घडते.प्रस्तावना विज्ञान व तंत्रज्ञानातील आज दिसणारी नेत्रदीपक प्रगती ही दहा, पाच वर्षातील नाही तर तिला हजारो वर्षांची पार्श्वभूमी आहे. शोधाला कसलेही नियम नसतात किंवा त्याला स्थळकाळाचे बंधन नसते. काही शोध हे अपघाताने लागतात. काही शोध विशिष्ट मार्ग व लक्ष्य समोर ठेवून लागलेले असतात. दोन्हीमध्ये प्रयोगशीलता, चिंतनशीलता असते, निसर्गाचे डोळस निरीक्षण असते, नोंदी असतात, त्याच्यातील संबंध शोधण्याची धडपड असते, त्यातूनच शोध लागतात. शोधांचे धागेदारे खूप दूरवर गेलेले दिसतात. त्या धाग्या-दोऱ्याची माहिती घेणे मनोरंजक आहे. अेखाद्या शोधामागे अनेक छोटयामोठ्या घटनांची गुंफण असते. सर्व घटना कलानुक्रमे हाती येतीलच असे नाही. शोधामागे कोणाचे किती प्रयत्न असतील, अेकुणच शोधाचा प्रवास कसा घडला ते सांद्यंत सांगणेही अवघड आहे. तसेच अेखाद्या शोधासाठी कोणत्या बाबी, घटना अेकत्र येतील हे सांगणे कठीण आहे, येथेच सृजनशीलता आणि नावीन्याचा ध्यास आवश्यक असतो त्यातूनच नवनवे शोध लागतात. शोधाचे श्रेय कोणाला मिळेल वा कोणाला कसे हुलकावणी देईल त्याचा अंदाज करणे अशक्य असते. उपलब्ध माहितीतून शोध व शोधकाचे परस्पर संबध जेव्हा लक्षात येतात तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते. शोध लावणारी माणसेच होती त्यामुळे त्यांचातील धाडस, चिकाटी, प्रयोगप्रेम याबरोबर राग, लोभ, मत्सर, याचे दर्शन या प्रवासातून घडते. प्रस्तुत पुस्तकाचे लेखक डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे हे पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी विषय मनोरंजक करण्यासाठी या शोधांचा, तंत्राचा थोडा इतिहास, पार्श्वभूमी, त्याची गरज त्यांच्यातले परस्पर संबध या शोधांच्या प्रवासातून मांडले आहेत, शिकताना, शिकविताना विषयाची, शोधांची, तंत्राची गरज, थोडा इतिहास माहीत असेल तर खूप फायदा होतो असा अेक शिक्षक म्हणून माझाही अनुभव आहे. यासाठी अनेक विषयातील आवड उपयुक्त व फायद्याची असते. . त्यामुळे कोणताही विषय चटकन कळतो. या पुस्तकातील शोधांच्या प्रवासातून गेल्या हजार वर्षांचा संदर्भ वारंवार येतो. काही प्रकरणे वाचताना कधी कधी त्यात विस्कळीतपणा जाणवतो. कालक्रमानुसार सर्व धागेदोरे हाती येत नाहीत त्यामुळे हा विस्कळीतपणा अंगभूत आहे असे म्हणावे लागेल. धडे वाचताना शोध, शोधक, त्याचा प्रवास, प्रवासात भेटलेले समविचारी, मित्र, नातेवाईक याचीही माहिती मनोरंजन करते. बऱ्याचदा आपल्या मनात शोधक व शोध यातला अेकच अेक दुवा असतो त्याला या प्रवास वाचनातून पूर्ण फाटा बसतो. शोधकांना अनेक विषयात असलेली गती पाहून आपण आश्चर्यचकित होतो. या दृष्टीने पाहिले असते तर जवळ पास सर्व लेखातून हे आश्चर्य विखुरले आहे असे मी म्हणेन. प्रत्येक लेखाची सुरुवात लेखक अगदी साध्या जे कोणाच्याही जीवनात घडू शकतात अशा प्रसंगापासून वा घटना वा निरीक्षणापासून करतो, त्यात बऱ्याचदा खुद्द लेखकच असतो. यातूनच तो विषयावर अलगद उतरतो लेखकाचे त्या प्रवासात असणे कुठेतरी आवडून जाते. शोध व शोधकांबरोबर प्रवास करताना लेखक सद्यस्थितीवर काही भाष्य करतो, काही सत्य विधाने करतो, ती विधाने व त्यातली सत्यता ही अपणासही कधीतरी कुठेतरी पटलेली असते. उदाहरणार्थ अेकेकाचे हुनर या लेखाच्या शेवटी लेखक म्हणतो, ‘ असे बहुविध हुनर असले की सर्वसाधारणपणे कोणताही विषय चटकन कळतो, नजर व विचार अेककल्ली होत नाहीत एखाद्या गोष्टीकडे अनेक बाजूने बघण्याची सवय लागते. ’ तसेच निसर्गाची देणगीत लेखक म्हणतो, ‘ निसर्गाच्या देणग्या नियंत्रित तोच करतो व संतुलितही तोच करतो. ’ हे कोणासही पटण्यासारखेच आहे. पृथ्वी प्रदक्षिणा या लेखातले, तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्वीच्याकाळी असलेली अेखादी अवघड गोष्ट काळ किती सोपी करून टाकतो नाही ? हे शेवटचे वाक्य किती समर्पक वाटते ! संमोहनविद्या या लेखाची सुरूवात त्या लेखाकडे वाचकाला आपसूकच जायला लावते. तसेच पश्चिमेचा वारा या लेखाची सुरूवात अएकदम सुसूत्र आहे. याच लेखाच्या शेवटी लेखक म्हणतो, ‘ पृथ्वीवरचा वारा हा सहसा पश्चिमेचा असतो. यावर कोणी असे का विचारले तर सरळ मॅरीआॅटेचा दाखला द्यावा व सांगावे की त्याचे कारण पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्यात आहे. यालाही पुरावा हवा असल्यास फुकोचा लंबक पहावा. डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे हे कधीकधी त्यांचे लेखन ललित वाटेल अशी वाक्येही पेरताना दिसतात. मनन करण्याचे महत्व या लेखात ते लिहीतात, ‘ वस्तु जमविणे, मांडणे त्याचा अभ्यास करणे हा अेक नाद आहे. अेक छंद आहे, आनंद आहे ’, क्रांतिकारी लेखात तंबाखू विषयी त्यांनी केलेली वाक्यरचना पहा, ‘ आयुष्याला आरोग्याला घातक असून, धूम्रपानासाठी तंबाखूचा वापर होऊ लागला. कर रूपात करोडोंनी पैसा मिळतो म्हणून त्याला विरोध झाला नाही. केवळ पैसा या क्षणभंगूर गोष्टीसाठी आरोग्य कमी महत्वाचे ठरले. येथूनच वैयक्तिक व सामाजिक ऱ्हासास सुरवात झाली. आजही आपण किरट्या अक्षरात लिहिलेल्या वैधानिक इशाऱ्यावर खूश आहोत. ’ लेखकाचा तंत्रज्ञानाची किमया हा लेखही अेकसंधपणासाठी मुळातून वाचण्यासारखा आहे. उदाहरणांची यादी मी वाढवीत नाही. शोधाचा प्रवास कंटाळवाणा होणार नाही अशी खबरदारी लेखकाने घेतली आहे असे मला वाटते. शोध व शोधक यांना साधणारा काळाचा धागा समान असला तरी प्रत्येक लेख स्वतंत्र आहे व तसा तुम्ही वाचू शकता, तो लेख तुमचे मनोरंजन करेल आणि गमतीदार माहितीही देईल. शिकविणे म्हणजे माहिती देणे व समजावून सांगणे एवढेच नाही तर त्या माहितीचा नियम प्रक्रिया, गुणधर्म वगैरे शोधताना त्या संशोधकांच्या ज्या प्रेरणा होत्या, जी जिद्द होती, व त्यासह त्या शोधताना त्यांना मिळणारा आनंद विद्यार्थ्यांच्यात संक्रमित करणे म्हणजेच खरे शिकणे व शिकविणे ! डॉ. चंद्रकांत सहस्त्रबुद्धे यांनी हा लिखाणाचा छंद जपला व त्यातून सर्वांना उपयुक्त साहित्य, विज्ञानसाहित्य सादर केले याबददल त्यांचे अभिनंदन ! शिक्षक व विद्यार्थी या दोघांनाही अध्ययनात व अध्यापनात हा प्रवास उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. डॉ. राम ताकवले प्राध्यापक, सल्लागार नेत्रा, पुणे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि