Id SKU Name Cover Mp3
Shobhivant Matsyalay


30.00 64.00
Download Bookhungama App

शोभिवंत मत्स्यालय - ना. चिं. ओक

Description:

‘शोभिवंत मत्स्यालय’ हे छोटेसे पुस्तक आपल्या हाती देण्यास मला अतिशय आनंद होत आहे. या विषयावरील मराठी भाषेतील हे पहिलेच स्वतंत्र पुस्तक आहे, या विषयावर मराठीतून यापूर्वी काही वेळा वर्तमानपत्रांतून व साप्ताहिकांतून लेखमाला प्रकाशित झाल्या आहेत. त्याचप्रमाणे हे पुस्तक कोणत्याही भारतीय अथवा परदेशी पुस्तकाचा अनुवाद नाही.बऱ्याच जणांना कुत्रा, मांजर, पोपट ह्या सारखा एखादा प्राणी पाळावासा वाटतो; पण त्याचा त्रास शेजाऱ्यांना होईल म्हणून शहरात ते शक्य नसते व शहरात सर्वांना ते सहज जमेलच असेही नसते. याउलट शोभेचे मासे पाळणे त्या मानाने सोयीचे असल्यामुळे, आजकाल शहरातून पुष्कळ ठिकाणी शोभेची मत्स्यालये ठेवलेली दिसतात. त्यामुळे जागेची शोभा तर वाढतेच, शिवाय एक छंद म्हणूनही तो लाभदायक व आनंददायक असतो.

मत्स्यालयापासून ज्या प्रमाणात लाभ होतात किंवा आनंद मिळतो, त्या मानाने त्याला खर्च येत नाही. मासे कधी चावत नाहीत, आवाज करत नाहीत. त्यांची दुर्गंधी येत नाही, म्हणून शेजाऱ्यांना त्यांचा त्रास होत नाही. त्यांची हालचाल, पळापळ व बदलते रंग याकडे ते आपले लक्ष वेधून घेतात. रोज जरी त्यांचेकडे पाहात बसले तरी कंटाळा येणार नाही. उलट मनोरंजनामुळे बघणाऱ्याला स्वतःच्या प्रकृतीच्या बारीकसारीक तक्रारींचा विसर पडून आराम वाटतो. यामुळे दवाखाने, शुश्रूषागृहे, स्वागतस्थळे इत्यादी ठिकाणी मत्स्यालयांचा प्रसार झालेला आजकाल दिसतो.

तसे पाहिले तर मानवाला माशाचे आकर्षण फार पुरातन कालापासून आहे. त्यांच्या आकर्षक रंगामुळे व आकारामुळे जगातील बहुतेक सर्व देशातील कलाकारांनी त्यांचा उपयोग शिल्पाकृती, दागिने, नक्षीकाम इत्यादीत केलेला आढळतो.

मासे पाळण्याच्या छंदाचा इतिहास फार जुना आहे. आपल्याकडील बहुतेक सर्व जुन्या मंदिराचे आवारातील हौदातून मासे बाळगलेले दिसतात. काही ठिकाणी त्यांना पकडण्यावर बंदीही असते. माशावर प्रयोग करून नव्या जाती उत्पन्न केल्याचा उल्लेख आपल्याकडे कमी सापडतो. चिनी व जपानी लोकांनी चारशे वर्षांपूर्वीपासून या क्षेत्रात बरेच कार्य केले आहे. त्यांच्या प्रयोगामुळे आजचागोल्ड फिशतयार झाला आहे. पूर्वीचागोल्ड फिशकाळसर हिरव्या रंगाचा होता व त्याच्या पराचा आकार पण आजच्यापेक्षा निराळा होता. अशा प्रकारच्या प्रयोगामुळे व प्रयत्नामुळेच आज असंख्य संकरित जातीचे सुंदर मासे मिळू लागले आहेत.

या छंदाची सुरुवात युरोप व अमेरिकेत सन १८०० नंतर जरी झालेली असली तरी त्यांनी या क्षेत्रात फार प्रगती केलेली असून आता ते आघाडीवर आहेत. जगातील पहिले सार्वजनिक मत्स्यालय १८५३ साली लंडनमध्ये स्थापन झाले. भारतात सरकारी किंवा नगरपालिकेची मत्स्यालये प्रमुख शहरातून क्वचितच आढळतात. त्यामुळे आपल्याकडे बऱ्याच जातीचे शोभिवंत मासे असूनही शोभेच्या मत्स्यालयाचा छंद पाहिजे तितका वाढलेला नाही. आजकाल शोभेच्या माशांची आयात-निर्यात जगात हवाईमार्गे होते व त्यांना नेण्या-आणण्याच्या सोयी पण वाढलेल्या आहेत.

मत्स्यालय म्हणजे एक जिवंत प्रयोगशाळाच असते. ज्याचेकडे ते असेल, त्या घरातील लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला त्यांच्या निरीक्षणाची सवय लागते. या माशांना खाद्य द्यावयास घरातील सर्वांना आवडते. मुंबईसारख्या शहरातील लोकांना दिवसभराच्या श्रमानंतर करमणुकीसाठी बाहेर जावयास सवड नसते, अशा वेळी घरच्या मत्स्यालयामुळे त्यांची करमणूक होते.

 

मोकळ्या तलावातील माशांना खाद्य शोधासाठी, संरक्षणासाठी लांबपर्यंत कोठेही हवे तेथे जाता येते; पण घरात बाळगलेल्या माशांना असेल त्या परिस्थितीतच राहावे लागते. त्यांना ओरडता येत नसल्यामुळे ते दुसऱ्याचे लक्ष संकटसमयी आपल्याकडे ओढू शकत नाहीत. शिवाय त्यांना पाण्याबाहेर जाणे शक्यच नसते, म्हणून घरातील मत्स्यालय यशस्वी करण्यासाठी काय काय करावे लागते याची माहिती पुढील प्रकरणांतून दिली आहे. माहिती सहज समजावी म्हणून आकृत्यांचा भरपूर उपयोग केला आहे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि