60 116
Download Bookhungama App

संगीत शारदा - कै. गोविंद बल्लाळ देवल

Description:

‘शारदा नाटक’ हें अशा प्रकारच्या हेतूनेंच कवींने लिहिलें आहे. ज्यांचा विषय लौकिक नाहीं अशा शाकुंतलादि नाटकांप्रमाणे शृंगारवीरादि नवरसांचे अत्यंत उदात्त स्वरुप किंवा अद्भूत प्रसंगांनी खचिल्याकारणानें वाचकांची जिज्ञासा सदैव जागृत ठेवणारे प्रवेश या नाटकांत नाहींत ही गोष्ट खरी, परंतु सौंदर्याची परिसीमा उदात्तपणांत मात्र होते, आणि सौम्यपणांत होत नाही, उदात्त रुप तेवढेंच मात्र रमणीयतेंचें स्वरुप आणि सौम्य रुप तें रमणीयतेंचें स्वरुप नव्हे, असें कोण म्हणेल?प्रस्तावना शारदा नाटकाचा विषय आणि आजपर्यंतच्या संगीत नाटकांचे विषय हे एकमेकांपासून भिन्नभिन्न आहेत. शारदा नाटकाचा विषय लौकिकी– अर्थात् प्रचलित– विषयांपैकीं होय. तेव्हां त्याचे प्रयोग पाहून किंवा तें वाचून त्याजबद्दल चर्चा सुरुं होणारच होणार असें, रा. देवल यांनी कृपा करून मला आपलें लेखी पुस्तक वाचण्यास दिलें तेव्हांच वाटले. अशा विषयांवर संगीत नाटक लिहिलें कीं, हा विषय संगीतास योग्य आहे किंवा नाही येथपासूनच आक्षेपांस सुरुवात होते. परंतु पक्ष्यांच्या पंखांस भराऱ्या मारण्यास केवळ आकाश मात्र उपयोगी, तशी कवीच्या प्रतिभारुप पंखांची गोष्ट नव्हे, तिला अगम्य किंवा अगाध असें कांहींच नाहीं. अमुक एक विषय कवीनें कल्पनाचित्र रेखाटण्यास योग्य आणि अमुक एक नाहीं, असें कोण म्हणेल! जें नसेल तें कल्पनेनें आस्तित्वांत आणून त्याला चिरस्थायित्व आणणें व नांव देणें एवढेंच कवीचें कार्य नव्हे; तर, जें अस्तित्वांत आहे, परंतु ज्या विषयांचें महत्त्व साधारण जनांस कळत नाहीं किंवा कळलें तरी तें जाणून त्यांचे मन त्या संबंधात जसें वळावे तसें वळत नाही, अशा विषयाचेंसुद्धां चित्र रेखाटून, पाहणारास थक्क करून सोडणे हेंहि कवीच्या प्रतिभेचेंच एक लक्षण होय. त्यांतहि सृष्टिसुंदरीचें रुप बरोबर प्रतिबिंबित होईल अशा रीतीनें आदर्श धरणें हें जें नाटकाचें लक्षण तें मनांत आणलें म्हणजे नाटककाराच्या प्रतिभेचा प्रदेश किती सार्वत्रिक आहे, हें सहज कोणाच्याही लक्षांत येणार आहे. नाटक लिहिण्यास अमुक एक विषय योग्य आणि अमुक अगदीं अयोग्य असें ह्मणणें म्हणजे शुद्ध कोत्या बुद्धीचें लक्षण होय. वस्तुतः पाहतां आपला हा सर्व संसार– सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, मासारंभापासून मासान्तापर्यंत, वर्षाच्या सुरुवातीपासून अखेरीपर्यंत, किंबहुना या जगांत आपण प्रवेश केल्यापासून निष्क्रमण करीपर्यंत, हा आपला आयुष्यक्रम म्हणजे एक विविध प्रसंगांनी भरलेलें अद्भुत नाटकच होय. आपल्या पुरतें पाहतां, या नाटकांतील नायक आपण व आपल्या अनुषंगाने असणारी इतर मंडळी इतर पात्रें होत. तथापि रंगभूमीवर असतांना, चाललेल्या प्रसंगांशी तादात्म्य झाल्याकारणानें, आपलें खरें स्वरुप विसरुन जाणाऱ्या उत्तम नटाप्रमाणें आपली स्थिती झालेली असते. यामुळें त्या नाटकांतहि आपलें बनविलेलें रुप पाहण्यास आपल्यास आरसा लागतो. तो आरसा आपल्यापुढें धरल्यानेंच आपलें कुठें काय चुकतें, हें आपणास समजणार आहे. हा आरसा कवि व नाटककार आपल्यापुढे धरतात. ‘शारदा नाटक’ हें अशा प्रकारच्या हेतूनेंच कवींने लिहिलें आहे. ज्यांचा विषय लौकिक नाहीं अशा शाकुंतलादि नाटकांप्रमाणे शृंगारवीरादि नवरसांचे अत्यंत उदात्त स्वरुप किंवा अद्भूत प्रसंगांनी खचिल्याकारणानें वाचकांची जिज्ञासा सदैव जागृत ठेवणारे प्रवेश या नाटकांत नाहींत ही गोष्ट खरी, परंतु सौंदर्याची परिसीमा उदात्तपणांत मात्र होते, आणि सौम्यपणांत होत नाही, उदात्त रुप तेवढेंच मात्र रमणीयतेंचें स्वरुप आणि सौम्य रुप तें रमणीयतेंचें स्वरुप नव्हे, असें कोण म्हणेल? अघोरघंटाच्या हातून मालतीस किंवा केशी दानवाच्या हातून उर्वशीस सोडविणाऱ्या माधवाचे व पुरुरव्याचें साहस एका दृष्टीनें वीररसमय, तर अन्यदृष्टीनें पाहतां निष्ठूर व मांगहृदयी बापानें विक्रय करून प्रेताशी आजन्म जखडून टाकण्याच्या बेतांत आणलेल्या शारदेला ऐन प्रसंगी सोडविणाऱ्या कोदंडाचेंहि साहस आमच्या तोंडून शाबास ह्मणवून घेतल्याखेरीज राहतें काय? सर्वथा ज्याचा तिला द्वेष, अशा दुर्योधनाशी आतां आपला विवाह होणार म्हणून विव्हल होऊन आपल्याशींच आक्रोश करणाऱ्या सुभद्रेचा करुणामय शोक जर कंठ दाटून आणतो, तर ज्याची आपण नात शोभूं अशा व बहात्तर रोगांनी ग्रासल्याकारणाने एक पाय घरांत आणि दुसरा स्मशानांत पडलेल्या भुजंगनाथाशीं लग्न होऊन आपल्या जन्माचें मातेरें होणार असें वाटून फोडलेली शारदेची हृदयभेदक किंकाळी डोळ्यांतून घळघळां पाणी आणण्यास सोडील काय? म्हातारा इतका न। अवघे पाऊणशें वयमान। लग्ना अजुनि लहान असें वल्लरी आणि जान्हवी यांनी तिच्या भावी पतीचें वर्णन करून शारदेचा मर्मभेदी विनोद चालविला असतां जरी आपणास हंसूं आलें, तरी बिचाऱ्या शारदेच्या आधींच सचिंत अशा मुखावर दर शब्दागणिक अधिकाधिक येत चाललेला म्लानपणा पाहून मन अतिशय उद्विग्न झाल्याखेरीज राहतें काय? तिच्या बापाच्या मनांत असावयास पाहिजे, परंतु नाहीं, ती वत्सलता आपल्या मनांत उत्पन्न होत नाहीं असें कोण म्हणेल? भुजंगनाथाचा पावलोपावली नजरेस येणारा मूर्खपणा, प्रातःकाले शिवं दृष्ट्वा निशीपापं विनश्यति। असें म्हणून आपल्या पापास मनाआड करणाऱ्या दांभिक व रुद्राक्षकुंडलधारी भद्रेश्वराची नीच स्वार्थदृष्टि; दिल्या तरुणां तरि होति किती रंडा। असें म्हणून अंगावर शहारे आणणाऱ्या कांचनभटाची आत्यंतिक द्रव्यलोभदृष्टी, सुवर्णशास्त्री वगैरे मंडळींचा तोंडपुजेपणा, इत्यादि प्रकार पाहून केव्हां परमावधीचें हंसूं येतें, केव्हां संतापाचा अतिरेक होतो, केव्हां तिरस्काराचा कडेलोट होतो, आणि शेवटीं त्या सर्वांस आपापल्या कर्माप्रमाणें फळें मिळालेली पाहून फार संतोष होतो, यांत तिळमात्र संदेह नाही. केवळ मनोरंजन हाच कांही नाटक–काव्य–कथा इत्यादिकांचा हेतू नव्हे, तर वस्तुस्थितीचें हुबेहूब चित्र दाखविणें व लोकमत शिक्षित करणें हा एक हेतू होय. तो हेतू एका विषयासंबंधानें शारदा नाटकांत सर्वथा साधला आहे याबद्दल मतद्वैत असण्याचा संभवच नाहीं. या नाटकांतील कथानक रोजच्या अनुभवांतले असून त्यास कवीनें चित्ताकर्षक स्वरुप दिलें आहे. चंद्रापीड आणि कादंबरी, पुंडरीक आणि महाश्वेता यांच्या प्रेमाच्या परिपाकाचें चित्र काढण्यासाठी केव्हां केव्हां पृथ्वीवरून स्वर्गात जाऊन तल्लीन झालेल्या कवीनें, शारदेसारख्या दीन गाईस, भद्रेश्वरासारख्या दुष्टांच्या थापांस भुलून गेलेल्या कांचनभटासारख्या निष्ठूरानें, कसायास विकली असतां सोडविण्याकरितां तिकडे धांव घेतली, हें खरोखर फार अभिनंदनीय होय. प्रस्तुत नाटक रंगभूमीवर वारंवार होत गेल्यानें फार चांगला परिणाम होईल यांत शंका नाहीं. आणि तो होतो हें स्वतः हा लेख लिहिणारानें पाहिलें आहे. पन्नाशीची झुळूक लागली, बाइल दुसरी करूं नको. ही दसलाखाची गोष्ट कोणाच्या मनांत ठसणार नाहीं! नाटकांतील कित्येक पद्यें प्रासादगुणानें इतकी भरलीं आहेत कीं, ती लवकरच ज्याच्या त्याच्या तोंडी होतील याबद्दल संशयच वाटत नाहीं. मुंबईस दोनच प्रयोगांनी तो परिणाम झालेला प्रत्यक्ष पाहण्यांत आला आहे. तेव्हां सरतेशेवटच्या भरतवाक्यांत कवीनें दर्शित केलेली इच्छा लोकांकडून पूर्ण होवो असें इच्छून ही प्रस्तावना पुरी करतों. 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि