60 116
Download Bookhungama App

समय हीच संपत्ती - ह. अ. भावे

Description:

ओरिसन स्वेट मार्डेनच्या जीवनदायी व प्रेरणादायीविचार संकलित करून श्री. ह. अ. भावे यांनी सुंदर भावानुवाद केलेला आहे . वेळेचे महत्व पटवून देत त्यांनी वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन केलेले आहेप्रस्तावना ओरिसन स्वेट मार्डेनची सर्वच पुस्तके मला आवडतात. मराठीमध्ये आलेले 'पहिले स्वेट मार्डेन'चे पुस्तक 'पुशिंग टू द फ्रंट'. त्याचा अनुवाद श्री. यदुनाथ थत्ते यांनी केला होता. तो 1944 साली छापला गेला त्याचे नाव 'पुढे व्हा.' त्याला आता 5० वर्षे होऊन गेली. तेव्हा मी सध्याच्या वर्गाप्रमाणे 9 वीत होतो. त्यानंतर 'पुढे व्हा.' च्या या प्रती मी अनेकांना 'भेट' म्हणून दिल्या. म्हणजे, वयाच्या 12-1३ व्या वर्षांपासून मी, ओरिसन स्वेट मार्डेनच्या प्रेमातच पडलो होतो. त्याने लिहिलेली माझी आवडती पुस्तके मला 'तोंडपाठ' झाली होती. पुढे 1973 मध्ये मी प्रकाशक झालो. पण अनेक कारणांनी संपूर्ण स्वेट मार्डेन मराठीत आणण्याचे काम लांबणीवर पडत गेले. ते आता लवकरच पूर्ण होईल. ओरिसन स्वेट मार्डेनची भाषा तरुणांना मोहवणारी आहे, स्फुर्ती देणारी आहे. मला ज्या-ज्या वेळी आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घ्यायची वेळ आली त्या-त्या वेळी ओरिसन स्वेट मार्डेनचे मार्गदर्शन मी घेतले आहे. आणि त्याच्या विचारातून मला सापडलेला मार्ग नेहमीच यशाचा ठरला. कसा तो सांगण्याची ही जागा नाही. पण इतकेच सांगतो की, ओरिसन स्वेट मार्डेनच्या जीवनदायी व प्रेरणादायी विचारांचा काय सुंदर परिणाम होतो, याचा अनुभव घेऊनच मी ओरिसनच्या पुस्तकांचे भावानुवाद केले आहेत. थोडक्यात सांगायचे तर हे प्रचीतीचे बोलणे आहे. ते फोल जाणार नाही! आपल्या देशात बोलघेवडे पुढारी फार आहेत. 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' यामुळे कार्य होत नाही.आज देशाला फार न बोलता 'भारतरत्न अण्णासाहेब कर्वे' यांच्याप्रमाणे कार्य करत राहणाऱ्या कार्यकर्त्यांची जरुर आहे. त्यातूनच राष्ट्रउभारणीचे कार्य होईल. आपला भारत देश अमेरिकेतील संयुक्त संस्थानाप्रमाणेच (U.S.A.) सुजलामसुफलाम् आहे. 100 वर्षांपूर्वी ओरिसन स्वेट मार्डेनच्या काळात अमेरिका विकासोन्मुखं होती. विकासाची झेप घेण्याच्या तयारीत होती. त्यावेळी तेथे सगळीकडे नवे उद्योग निर्माण होत होते. नवे शोध लागत होते. खुली अर्थव्यवस्था होती. प्रस्थापित झालेल्या लोकशाहीने समाजातील सर्व गटात विकासाची समान संधी दिली होती आणि तशीच सामाजिक व राजकीय परिस्थिती सध्या भारतात आहे. स्वेट मार्डेनचे पुरुषार्थाला साद घालणारे, तेजस्वी विचार रुजायला भारताची भूमी अनुकूल आहे. अशा नेमक्या वेळी घात साधून उत्साह व प्रेरणा देणाऱ्या विचारांचे बीज या भूमीत पेरले पाहिजे. ओरिसन स्वेट मार्डेनने अमेरिकेत जे कार्य केले, तसेच कार्य ३०० वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी केले होते. समर्थ रामदासांनी आपल्या दासबोधातून व इतर लिखाणातून असाच प्रयत्नवाद सांगितला होता. त्यांनी सतत सांगितले, ''हडबडू गडबडू नका, तकवा धरा, यत्न तो देव जाणावा, अवघा हलकल्लोळ करावा. शिवरायांचे कैसे बोलणे, कैसे सलगी देणे'' अशी एक ना दोन, अशी हजारो अवतरणे त्यांच्या लेखनातून देता येतील. पण समर्थ रामदासांना त्यांच्या शिष्यांनी साधू बनवून ठेवले. 'रामदासाचा त्यांच्या शिष्यांनी केलेला पराभव' असा एक सुंदर लेख श्री.म. माटे यांनी लिहीला होता 'प्रपंच करावा नेटका' हे सांगणारा दासबोध आणि मनोबोध वृद्धांनी वाचण्याचा धार्मिक ग्रंथ होऊन बसला आहे. तरुण तो वाचतच नाहीत. म्हणूनच मला, ओरिसन स्वेट मार्डेनला इकडे आणावा लागला, रामसादांचाच उपदेश मला मार्डेनच्या बोंडल्यातून पाजावा लागत आहे. म्हणूनच या भावानुवादात जागोजागी समर्थांची अवतरणे दिलेली आहेत असे आढळेल. 'समय हीच संपत्ती' या नावाचे पुस्तक ओरिसन स्वेट मार्डेनने लिहिलेलेच नाही.पण ह्या पुस्तकातील शब्दन् शब्द (शेवटचे प्रकरण सोडल्यास) ओरिसन स्वेट मार्डेन चाच आहे. कारण 'समय' ह्या विषयावर स्वेट मार्डेनने लिहिलेली निरनिराळ्या 5 पुस्तकातील प्रकरणे येथे संकलित केली आहेत .


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)