60.00 116.00
Download Bookhungama App

समग्र ना. सी. फडके – खंड ३ [भाग १७] - संकलक : विजय नारायण फडके

Description:

समग्र ना. सी. फडके

खंड

भाग१७

(लघुकथावाङ्मय)

 

संकलक : विजय नारायण फडकेना. सी. फडके : अल्पचरित्र

प्राध्यापक नारायण सीताराम फडके यांचा जन्म ४ ऑगस्ट १८९४ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या गावी झाला. त्यांचे वडील सीताराम महादेव फडके हे आपल्या पिढीतील एक व्युत्पन्न पंडित म्हणून ओळखले जात. शासनाच्या महसूल खात्यात ते मामलेदार म्हणून काम करीत. एका गावाहून दुसऱ्या गावी अशा त्यांच्या सारख्या बदल्या होत, त्यामुळे फडक्यांचे प्राथमिक शिक्षण अनेक गावी झाले. मात्र १९०४ साली ही भ्रमंती संपली आणि फडके कुटुंब पुण्यात आले. फडक्यांचे दुय्यम आणि उच्च शिक्षण मग पुण्यात झाले आणि तत्त्वज्ञान हा विषय घेऊन ते १९१४ साली बी. . आणि १९१७ साली एम. . झाले. या दोन्ही परीक्षांत त्यांनी सुवर्णपदके मिळवली. तथापि एम. . होण्यापूर्वीच त्या वेळी नवीनच निघालेल्या न्यू पूना कॉलेज (आताच्या सर परशुरामभाऊ कॉलेज) मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि त्या संस्थेचे ते आजीव सदस्यही झाले. त्यांचा प्रथम विवाह १९१४ साली कु. सुंदरा गोखले यांच्याबरोबर झाला.

साऱ्या देशात विलक्षण राजकीय खळबळीचा आणि प्रक्षोभाचा असा हा काळ होता. महात्मा गांधींनी १९२० साली असहकारितेची चळवळ सुरू केली तेव्हा शाळा-कॉलेजावर बहिष्कार घालण्याची त्यांची हाक ऐकून न्यू पूना कॉलेजातल्या द. रा. घारपुरे आणि सी. पु. पटवर्धन यांच्याबरोबर फडक्यांनीही आपल्या प्राध्यापकीच्या सुखासीन नोकरीचा राजीनामा दिला आणि गांधींच्या चळवळीत ते सामील झाले. फडक्यांनी मग गावोगाव फिरून व्याख्याने दिली, गांधींचा संदेश घरोघर पोचवला. फडक्यांनी आपल्या वक्तृत्वाने सभा जिंकल्या, तरुण पिढीला भारून टाकले.

गंमत अशी की, फडके राजकारणात फारसे टिकलेच नाहीत. मुंबईत साम्यवादावर अलोट प्रेम करणाऱ्या लोटवाला शेटजींच्या प्रोत्साहनाने साम्यवादाचा अभ्यास करणारी डांगे, जोगळेकर, निमकर, इंदुलाल याज्ञिक प्रभृती जी तरुण मंडळी होती त्यांच्या सहवासात फडके आले आणिअॅडव्होकेट ऑफ इंडियाया नियतकालिकातही त्यांनी काही काळ काम केले, पण अखेर आपल्या आवडत्या शैक्षणिक क्षेत्राकडे ते परत आले. दिल्ली, हैद्राबाद (सिंध), नागपूर येथील कॉलेजांत मग त्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. मात्र अखेर ते १९२६ साली स्थिरावले ते कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात.

या काळात फडक्यांचे १९१२ सालापासून सुरू झालेले लेखन अव्याहतपणे सुरू होते. दादाभाई नौरोजी, टेरेन्स मॅकस्विनी, डी व्हलेरा यांची चरित्रे, अनेक मराठी नाटकांची समीक्षा यासारखे लेखन या काळात त्यांनी केलेच, पण १९२५ सालीकुलाब्याची दांडी’’ ही त्यांची पहिलीच स्वतंत्र कादंबरी प्रसिद्ध झाली, गाजली आणिनव्या पिढीचे कादंबरीकारम्हणून वाचकवर्ग त्यांना ओळखू लागला. यानंतर त्यांनीरत्नाकरनावाचे मासिक काढले आणि अल्पावधीतच ते नावारूपाला आणले, पण कोल्हापूरला आल्यानंतर त्यांच्या जीवनाची घडी नव्याने बसली आणि त्यांचे वाङ्मयीन जीवन येथेच मोहरले, बहरले, फुलाफळाला आले. त्यांच्याजादूगारआणिदौलतया कादंबऱ्या प्रकाशित झाल्यानंतर प्रथम श्रेणीच्या लोकप्रिय लेखकांत त्यांची गणना होऊ लागली. त्यांचेप्रतिभासाधनसारखे ग्रंथ मग कोल्हापुरातच जन्माला आले. निरनिराळ्या प्रांतिक साहित्य-संमेलनांची अध्यक्षपदे यथाकाल त्यांची वाट पुशीत त्यांच्याकडे चालत आली आणि १९४० साली रत्नागिरी येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. याच सुमारास त्यांनीझंकारनावाचे साप्ताहिक काढले आणि त्यातून त्यांच्या अनेक कादंबऱ्या व स्फुटलेखनही प्रकाशित झाले.

पण १९४२ साली प्रसिद्ध कथालेखिका कु. कमल दीक्षित यांच्याबरोबर त्यांचा द्वितीय विवाह झाला तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक नवेच वादळ उठले, पण कालांतराने ते शमलेही. फडक्यांनी साहित्यावरील आपली निष्ठा ढळू दिली नाही. सातत्याने ते लिहीत राहिले, लोकप्रियतेच्या आघाडीवर कायम राहिले. मग राजाराम कॉलेजातील सेवानिवृत्ती आली तसे ते १९५१ साली पुण्याला जाऊन स्थायिक झाले. तत्पूर्वीझंकारसाप्ताहिक बंद करून त्यांनीअंजलीनावाचे द्विवार्षिक सुरू केले, त्याचे वासंतिक आणि दिवाळी असे अंक मग वर्षानुवर्षे प्रसिद्ध होत राहिले. त्यातूनही त्यांच्या अनेक कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या कादंबऱ्यांची अनेक भाषांत भाषांतरेही झाली. जीवनाचा आस्वाद रसिकतेने घेत आणि कला, क्रीडा आणि साहित्य यांचा आनंद उपभोगीत फडक्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपविली आणि खऱ्या अर्थाने ते आनंदयात्री ठरले.

पुणे येथील आपल्यादौलतया निवासस्थानी दिनांक २२ ऑक्टोबर १९७८ रोजी दुपारी १ वाजता त्यांचे शांतपणे देहावसान झाले.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि