30 110
Download Bookhungama App

साखर सोंड्या आणि दुसऱ्याही काही मजेदार लोककथा - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या या कथासंग्रहात साखरसोंड्याची गोष्ट, तीन मूर्खांच्या तीन तऱ्हा, जुन्या जोड्यांची अजोड कथा, जॉन राजाचे तीन प्रश्न???, पाच अंड्यांची गोष्ट, चक्रम सावकार चक्रावला याशिवाय आणखीही कथा आहेत.साखरसोंड्याची गोष्ट “वेण्या घातलेले मुलगे!... म्हणजे हे चिरंजीव चिनी माका दिसतात!” छोटी मोना बिपिनच्या गळ्यात पडून म्हणाली, “ए बिपिनबाबू, आम्हाला सांग ना या चिनी माकांची गोष्ट!” त्याच्या पुढ्यातला चित्रमय पुस्तकाकडे ती टकामाका पाहात होती. “सांगेन - सांगेन!” गुदमरलेला बिपिन कसाबसा बोलला, “पण माझा गळा सोड आधी.” आता विजूचेही लक्ष इकडे वेधले. तो एखाद्या व्याख्यात्याच्या थाटात गळा साफ करीत आपल्या बहिणीला म्हणाला, “म्हटलं - मंडळी, आता चिनी मुलगे सुधारले आहेत ते बायकांसारखे वेण्या घालीत नाहीत. आमच्यासारखे क्रॉप ठेवतात!” “बरं-बरं!” मोना म्हणाली, “तुझा तो क्रॉप कर ड्रॉप! बिपिनबाबूला मी मोकळा केलाय. ते बघ त्याने गोष्ट सांगण्यासाठी तोंड उघडलं.” “ऐका!” बिपिनने गळ्यावरून हात फिरवीत सुरुवात केली, “गोष्ट आहे खूप जुन्या काळातली. त्या काळी चिनी मुलांची वेणी चांगली दोन हात लांब असे.” आणि मोना म्हणाली, “डोक्यावरची टोपी म्हणजे दिव्याची शेड असे.” “ड्रॉप कर तुझी ती शेड!” आता टोमणा हाणण्याची पाळी विजूची होती. “गोष्ट ऐक -” आणि बिपिनबाबू गुरगुरत गोष्ट सांगू लागला – चीन देशात फार पूर्वी दोन भाऊ राहत असत. थोरल्याचं नाव लाओ ता आणि धाकट्याचं लाओ अऱ्ह. (अर्रर्र विजू मधेच म्हणतो, “ही कसली नावं?” त्यापेक्षा बिपिनबाबू- तू आपल्या थोरल्याला थोरला म्हण अन् धाकल्याला धाकला म्हण.” “म्हणतो” बिपिन डोळे वटारत म्हणाला, “पण आता यापुढे मधे मधे सूचना करणं बंद!”) तर काय सांगत होतो... या दोन मुलांच्या वडिलांनी थोडीफार माया केली होती. पण ते वारल्यावर थोरल्याने सारी इस्टेट गडप केली. धाकटा भाऊ उघडा पडला. पण त्याने कधी तक्रार केली नाही. तो फार मेहनती नि सज्जन मुलगा होतं. खूप कष्ट करून तो पोटापुरते पैसे मिळवीत असे. दुसऱ्यांची कोणतीही कामं करायला तो हमखास तयार असायचा. एक दिवस त्याला एका शेजाऱ्याने हाक मारून म्हटले, “इकडे ये रे जरा, लाओ अऱ्ह- या दोन मोठ्या कडीच्या बरण्या डोंगराच्या पलीकडे चँग वांगच्या दुकानात पोचवायच्या आहेत. करशील तू हे काम?” “करीन की!” धाकटा म्हणाला, “काय आहे त्या बरण्यांत?” “साखरेचा पाक आहे. जपून न्यायला हवा. बरण्या फुटता कामा नयेत. पाक सांडता कामा नये.” “फुलासारखा जपून नेईन.” धाकला म्हणाला आणि दोन हातांत दोन बरण्या घेऊन निघाला. अर्धा डोंगर चढून झाला नाही तोच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दगडा-कपारीवर निसरडं झालं. धाकट्याचा पाय घसरला आणि तो गडगडत गेला तो एका खड्ड्यात जाऊन पडला. दोन्ही बरण्यांतला पाक सांडला आणि त्यात धाकटा गडबडा लोळला. त्याच्या सगळ्या अंगाला पाकाची पुटं चढली आणि त्याच साखरेचं मुटकुळं बनलं. हातपाय दिसत नाहीत, नाकतोंड दिसत नाही अशी त्याची दशा झाली. साखरेची चित्रं मिळतात ना, तसा तो एक साखरेचा खूप मोठा भावला बनला. मनुष्याच्या आकाराचा भावला. मनुष्य, पण साखरेचा, हालचाल नाही, काही नाही. चुपचाप पडून राहिला.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि