80 160
Download Bookhungama App

राजा - डॉ. बा. मो. कानिटकर

Description:

भारतीय राज्यशास्त्राचा मेरुमणी असलेला ‘कौटिलीय अर्थशास्त्र' हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथाइतकेच मॅकिव्हिलीच्या ‘प्रिन्स' ह्या ग्रंथाचे महत्त्व युरोपात आहे व मॅकिव्हिलीच्या तत्त्वानुसार युरोपातील संरजामशाही राज्यव्यवस्था 500 वर्षे चालत होती.या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. बा. मो. कानिटकर यांनी केलेला आहे.प्रस्तावना इटालीतील फ्लॉरेन्सच्या लोकशाही नगरराज्यात सोळाव्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेलेला सुप्रसिद्ध मुत्सद्दी आणि राज्यशास्त्रज्ञ निकोलो मॅक्यॅव्हिली याचे 'प्रिन्स' ( राजा ) या नावाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. बा. मो. कानिटकर यांनी केलेला आहे. राज्यशास्त्राच्या इतिहासात निकोलो मॅक्यॅव्हिली याच्या त्या पुस्तकास बरेच महत्त्व आहे. मॅक्यॅव्हिलीचा जन्म इटालीतील फ्लॉरेन्स नगर राज्यात इसवी सन 1469 च्या 3 मे रोजी झाला. आणि तो इसवी सन 1527 च्या 22 जूनला निधन पावला. इ. स. 1498 पासून इ. स. 1512 पर्यंत फ्लॉरेन्सच्या लोकशाही राज्यात तो सेक्रेटरी व परराष्ट्रीय वकील या नात्याने अधिकारावर होता. व्यवहारदक्ष मुत्सद्दी, इतिहासकार आणि राज्यशास्त्रज्ञ या तीन दृष्टींनी त्याची ख्याती झालेली आहे. मध्ययुगात राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांच्यावर धर्मशास्त्राचे व नीतिशास्त्राचे प्रभुत्व होते. म्हणजे राजकीय आणि आर्थिक व्यवहारात धर्माची व नीतीची बंधने असावीत ही विचारसरणी त्यावेळी सर्वमान्य होती. राज्यशास्त्राचा व अर्थशास्त्राचा विचार करणारे तत्त्वज्ञ राजकीय व आर्थिक व्यवहार कसे चालले आहेत अथवा कसे चालतात, याचा उलगडा अथवा पृथक्करण करण्यावर व त्यासंबंधी उपदेश करण्यावरच सर्व भर देत असत. पण एवढ्याने राजकीय व्यवहार करणाऱ्या मुत्सद्यांचे कार्य भागत नाही. मनुष्याने कसे वागावे याचा निर्णय करताना इतर लोक आपणाशी कसे वागतात, याचाही विचार मनुष्याला करावा लागतो. सर्वच लोक सज्जन असतील तर आपणही त्यांच्याशी सौजन्यानेच वागावे हे तत्त्व सामान्यत: तात्त्विक दृष्टीने सर्व लोक मान्य करतात. अर्थात् सभोवारचे सर्व लोक सज्जन असतील तर त्यांच्याशी आपणही सौजन्याने वागावे हा सिद्धांत तत्त्वदृष्ट्या मान्य करणारे लोकही प्रत्यक्ष व्यवहारात सज्जन मनुष्याशीही नेहमीच सौजन्याने वागतील अशी हमी देता येत नाही. तथापि तत्त्वदृष्टीने वरील सिद्धांत बहुतेक लोक मान्य करतात. जगात आपल्या स्वत:वाचून इतर व्यक्तींतील सौजन्य किंवा सद्गुण पारखणारे, जाणणारे वा तो मान्य करणारे लोकही फार थोडे आहेत. दुसऱ्यांना दुर्जन व दुष्ट समजणारेच लोक अधिक असतात. अशा लोकांनी केवळ दुष्टांशी दुष्टपणाने वागावे असे म्हटले तरी त्यांचा बहुतेक व्यवहार बहुतेकांशी दुष्टपणाने वागण्याचाच होत असतो. तथापि जे स्वत: सज्जन आहेत आणि ज्यांना इतरांच्या सौजन्याचीही जाणीव व पारख होऊ शकते त्यांच्यापुढेही इतरांच्या दुष्टपणास व दुर्जनत्वास तोंड कसे द्यावे असा एक अत्यंत बिकट आणि कूट प्रश्न नीतिशास्त्रात आणि राज्यशास्त्रात उद्‌भवत असतो. केवळ आदर्श नीतिशास्त्राच्या दृष्टीने दुष्टाशीही दुष्ट होऊ नये, दुसरा आपल्यावर रागावला तर त्याचा क्रोध स्वतःच्या अक्रोधानेच शमन करावा, दुसऱ्याच्या असत्यावर आपल्या सत्यनिष्ठेने विजय मिळवावा आणि दुसऱ्याच्या द्वेषाला प्रेमाने जिंकावे, असे म्हणता येते व खरी नीती तीच होय. तथापि सर्व परिस्थितीत या सर्वश्रेष्ठ नीतीचे आचरण करण्यास लागणारे नैतिक बल फारच थोड्यांच्या अंगी असल्याने या सर्वश्रेष्ठ नीतितत्त्वास अनेक आपत्कालीन अपवाद नीतिशास्त्रज्ञांना व राज्यशास्त्रज्ञांना मान्य करावे लागतात, या मान्यतेतूनच नीतिशास्त्रात वास्तववादी विचारसरणीचा एक संप्रदाय निघत असतो मॅक्यॅव्हिली हा स्वतःस अशा वास्तववादी विचारसरणीचाच पुरस्कर्ता मानतो. आधुनिक काळातील राज्यशास्त्र, नीतिशास्त्र आणि मानसशास्त्र यातील वास्तववादी विचारसरणीचे लोक आपल्या शास्त्रीय विचारांचा उगम मॅक्यॅव्हिलीच्या विचारात आढळतो असे मान्य करतात. त्याचप्रमाणे सामाजिक शास्त्रांचे कार्य सामाजिक व्यवहार कसे घडावेत हे सांगण्याचे नसून ते व्यवहार कसे होत असतात याचे वर्णन व पृथक्करण करणे आणि त्या व्यवहाराच्या कार्यकारणभावाचा शोध लावणे एवढेच आहे असे मानणाऱ्या राज्यशास्त्रीय व समाजशास्त्रीय विचारसंप्रदायांचा धागा मॅक्यॅव्हिलीच्या ग्रंथापर्यंत जाऊन पोहोचतो. याच दृष्टीने राज्यशास्त्रावरील नीतिशास्त्राचे व धर्मशास्त्राचे बंधन व प्रभुत्व उघडपणे झुगारून देऊन केवळ वास्तववादी दृष्टीने राज्यशास्त्राची मांडणी करणारा मॅक्यॅव्हिली हाच पहिला समाजशास्त्रज्ञ होय असे मानले जाते.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)