महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाच्या १९२० पूर्वीच्या पन्नास–पाऊणशे वर्षांच्या काळात, जी विविध क्षेत्रांत प्रसिद्ध माणसे वावरत होती, त्यांतले काही स्त्रीपुरुष या कथांतून वाचकांना भेटतील.
कथासंग्रहाला लेखकाच्या कसल्याही प्रास्ताविकाची खरे पाहता गरज असू नये. परंतु या माझ्या कथासंग्रहाचे प्रकाशक, श्री. मधुकाका कुलकर्णी यांचा आग्रह असा, की या कथांचे स्वरूप वेगळे आहे, तेव्हा लेखकानेच ते थोडे स्पष्ट करावे, त्याची गरज आहे. त्यांचे हे म्हणणे मला काहीसे बरोबर वाटले, म्हणून मी या चार ओळी लिहीत आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाच्या १९२० पूर्वीच्या पन्नास–पाऊणशे वर्षांच्या काळात, जी विविध क्षेत्रांत प्रसिद्ध माणसे वावरत होती, त्यांतले काही स्त्रीपुरुष या कथांतून वाचकांना भेटतील. अशा स्त्रीपुरुषांना त्यांच्या कर्तबगारीच्या क्षेत्रातील जीवनाइतकेच व्यक्तिगत भावजीवनही असते आणि ते उपेक्षित राहते. या स्त्रीपुरुषांची उपलब्ध चरित्रे, आत्मचरित्रे वा आठवणी वाचीत असताना, काही जागा मला अशा जाणवत गेल्या, की ज्या कथांचा विषय होऊ शकतील. या सर्व हाडामांसाच्याच व्यक्ती होत्या. त्यांना सामान्याप्रमाणेच, रागलोभ, मैत्रीसंबंध, या मैत्रीसंबंधाहून निर्माण होणारे चमत्कारिक ताण–तणाव, सुखदुःखे, मोह–मत्सरी क्षण, यांचा अनुभव घ्यावा लागलेला असणार. हे अनुभव घेत असताना, या माणसांच्या जीवनाला व कुटुंबियांच्या जीवनाला जे रंगरूप प्राप्त झाले, तो या कथांचा विषय आहे. मात्र हे लेखन कल्पनेने करताना, या व्यक्तींच्या चरित्रांतून, प्रत्यक्षाचे जे आधार मी घेतले त्यांत कथेचा विशेष परिणाम साधण्यासाठी विपर्यस्त बदल केलेला नाही, हे मला सांगितले पाहिजे. असा अधिकार ललितलेखकाला आहे, असे मला वाटत नाही.
गेल्या दहा वर्षांत मी या कशा लिहिल्या व त्या दिवाळी वार्षिकातून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या आहेत. श्रीविद्या प्रकाशनाने, संग्रहरूपाने त्या एकत्रितपणे वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी प्रकाशकांचा आभारी आहे.
वि. ग. कानिटकर