60.00 116.00
Download Bookhungama App

प्रत्यावर्त - प्रा. सौ. कला आराध्ये

Description:

कविता कालातीत असते हे खरं, तिला स्थलकालाची बंधनं नसतात. मात्र या व्यक्तिसापेक्ष आविष्काराला कवीच्या व्यक्तिमत्त्वाचं बंधन मात्र असतेच. आणि कोणत्याही चांगल्या कवितेत अशी एक ऊर्जा असते की वयात आल्यावर ती प्रत्यक्ष श्रीकृष्णाप्रमाणे आपल्या जन्मदात्यांना बंधनातून मुक्त करते.

 प्रत्यावर्तासंबंधी

मानवी जीवनव्यवहारामधल्या दोन मनोज्ञ गोष्टींच्यामध्ये मला एक विलक्षण साधर्म्य आढळत आलेले आहे. त्या दोन गोष्टी म्हणजे स्त्रीपुरुषांमधील नैसर्गिक, निकोप असे परस्परांवर प्रेम आणि दुसरी कविता. - प्रा. सौ. कला आराध्ये यांच्या या संग्रहामधल्या बव्हंशी कविता आणि सगळ्याच चांगल्या कविता या स्त्रीपुरूष प्रेम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या इतर प्रेमछटा यांच्याशी संबंधित आहेत, म्हणून केवळ हे म्हणत नाही, तर -

मानवी जीवनाच्या आदिम अवस्थेपासून हे प्रेम आणि शब्दांच्या उगमापासून काव्य या दोन सुंदर गोष्टी आस्तित्वात आहेत. आणि त्या दोन्ही अशा जुन्यात जुन्या असूनही प्रत्येक पिढीबरोबर त्या नित्यनूतन होत जातात. परस्पर प्रेमात पडलेल्या प्रत्येक नवीन युगुलाला वाटते कीआमच्याएवढं प्रेम आजवर या जगात कुणीच कुणावर केलं नसेल.’ कवि-कवयित्रींना देखील आपल्या कवितेबद्दल असंच वाटत असेल, तर ते स्वाभाविक आहेच, पण माझ्या मते चांगलंही आहे.

आणि यामुळेच मला वाटतं की जातिवंत रसिकांनी या किंवा कोणत्याही नव्या कवितेकडे प्रथम प्रेमाने पाहायला शिकलं पाहिजे. इतर गोष्टी नंतरच्या.

इंग्रजीत एक छान म्हण आहे, ‘ऑल वर्ल्ड लव्हज् अ लव्हर.’ वास्तवात दुर्दैवाने सर्वच प्रेमिकांच्या नशिबी हे असलं काही येत नाही, पण निदान कवितेला तरी हे भाग्य मिळावं. संगीतरसिकाग्रणी श्रीराम पुजारी म्हणतात, ‘गाणे होऊन गाणे ऐकावेतशीच काव्यरसिकानेकविता होऊन कविता वाचावी.’

मी या संग्रहातील कविता तशी वाचली आणि हिरवळी उतारावर मध्येच उमललेल्या टवटवीत रानफुलांसारख्या कितीक मनोरम ओळी मला दिसून गेल्या...

अधीरया कवितेतल्या

शांत परिसर स्तब्ध पाणी

अबोल तू, उर्मिल मी

माझ्या मनात उठतायत् तरंग

तुझ्यापर्यंत ते पोहोचतायत का?

 किंवाआवेगमधल्या

तुझ्या पाण्याच्या ओढीने

माझं हृदयच वाहून नेलं होतं

आता मी वाट पाहाते

तुफानी पावसाची

ग्रीष्मात तापलेली काया

शमवणाऱ्या सरींची

तशाच सर्वात आवडल्या त्यातू असलास कीया कवितेतल्या अखेरच्या चार ओळी-

नेमाने उगवणाऱ्या सूर्यासारखा

तू न चुकता सूर्य मावळल्यावर येत जा

आणि माझ्या नदीच्या पात्रात

त्रिपुरीचे दिवे सोडून जात जा

या चार ओळींमधली अभिसारिकावृत्ती आणि त्याचबरोबरत्रिपुरी पौर्णिमेच्या वाहात जाणाऱ्या दिव्यांची विदग्ध प्रतिमा कवितेला मोठेपण देऊन जातात.

पण तरी शेवटी प्रेम गुलाबपुष्पासारखेच असते. हा गुलाब काट्यासकट दोघांनाही स्वीकारायचा असतो. तेव्हातिला’ ‘त्याच्याबद्दल जे काही वाटते तेही जेव्हातीलिहिते ती देखील माझ्या मते प्रेमकविताच असते. (नाही तरी अखेरीस हीलव्ह हेट रिलेशनशिपच की!)

अशाच ओळी भेटतातहाककवितेत -

प्रेमाने दिलेल्या चांदीच्या तोड्यांच्या

आता मणामणाच्या बेड्या झाल्यात

आणिकोळी कवितेत

न वाचलेल्या पुस्तकांची

नावं तुला पाठ होती

........................

आता मात्र मला तुझा कंटाळा आलाय्

परत परत ऐकलेल्या रेकॉर्डसारखा

या सगळ्याच ओळींमधून जाणवते ती एका कवयित्रीची तरल प्रतिभा. या साऱ्या कवितांमधून तिने स्त्रीत्व हे एक जिवापाड जपलेल जीवनसत्त्व वाटतं. या स्त्रीत्वाच्या सफलतेतून आलेल्या मातृत्वानेही ही कविता आत्ममग्न होऊन म्हणते -

वैश्विक शक्तीचा कण

हा माझ्या आश्रयाला

ठेवीन जाणीव ह्याला ग जपताना

अशा ओवीसदृश्य सुंदर - आणि इतरही काही भोळ्याभाबड्या - याही प्रेमकविताच.

या प्रेमाच्याच प्रेमात पडलेल्या कवितेलाही जेव्हा अधूनमधून बाहेरचं जग दिसतं तेव्हा त्यातून कधीभोलाराम’, ‘लाल पाखरं,’ सारखी अनुभवचित्रं कधीसाक्षात्कारसारखी निसर्गचित्रं आणि कधीअर्धा पेलाया कवितेतल्या

ज्यांच्या पेल्याच्या तळालाच भोक आहे

त्यांच्याकडे बघ

अशा चांगल्या तत्त्वचिंतनात्मक ओळी किंवा

पिकलेल्या फळाचं

पाण्यात पडणं

थोडा आवाज, थोडे तरंग

क्षणात सारं शांत

शेवटी एक म्हणावसं वाटतं. कविता कालातीत असते हे खरं, तिला स्थलकालाची बंधनं नसतात. मात्र या व्यक्तिसापेक्ष आविष्काराला कवीच्या व्यक्तिमत्त्वाचं बंधन मात्र असतेच.

आणि कोणत्याही चांगल्या कवितेत अशी एक ऊर्जा असते की वयात आल्यावर ती प्रत्यक्ष श्रीकृष्णाप्रमाणे आपल्या जन्मदात्यांना बंधनातून मुक्त करते.

ही कविताही यथावकाश हे करील याची मला पूर्ण आशा आहे.

 

रवीन्द्र सुर्वे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि