Id SKU Name Cover Mp3
प्रतापी बाजीराव


80 184
Download Bookhungama App

प्रतापी बाजीराव - म. श्री. दीक्षित

Description:

श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे चरित्रलेखकाचे निवेदन (प्रथमावृत्ती) १९५६-५७ पासून मी चरित्रात्मक लेखन करीत आहे. आजवर माझी दहा-बारा लहानमोठी चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित झाली. आठ वर्षापूर्वी ‘नेपोलियन’ या पाश्चात्त्य वीराचे विस्तृत चरित्र ‘केसरी’ संस्थेने प्रसिद्ध केले. त्यानंतर एका भारतीय वीरशिरोमणीचे चरित्र लिहिण्याचा मी संकल्प सोडला. हा वीरपुरुष म्हणजे शिवाजीच्या खालोखाल समस्त जनांनी अभिमान धरावा असा प्रतापी बाजीराव. श्रीशाहूनृपतीचा दुसरा पेशवा बाजीराव बल्लाळ. सामान्यजन मस्तानीच्या संदर्भातच ज्याला ओळखतात तो बाजीराऊ. वास्तविक बाजीराव चरित्रात वीररस प्रधान आहे. शृंगाराचे माथी पाय देऊन तो उभा आहे. पण कवी, कादंबरीकार, नाटककार इत्यादींनी ‘राऊ-राया’ची प्रतिमा अधिक प्रमाणात उजळून दाखवल्यामुळे जनमानसी ‘बाजीराव-मस्तानी’चा जोडा अगदी खिळून बसला आहे. प्रस्तुत प्रकरणी भा. इ. सं. मंडळात मी एकदा अभ्यासपूर्ण निबंध वाचला होता. महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला मस्तानीविषयक तो निबंध थोडा दुरूस्त करून आणि भर घालून मी या चरित्राच्या शेवटी परिशिष्टात दिला आहे. चरित्रकथेत मस्तानीला अपरिहार्य झाल्याखेरीज मी डोकावू दिलेले नाही. चरित्रनायकाच्या इतिहासप्रसिद्ध वीररसात्मक मूर्तीचे मला रसरशीत, स्फूर्तिप्रद दर्शन सर्वसामान्य वाचकांस घडवायचे आहे. त्यासाठी हे चरित्र विशिष्ट पद्धतीने रचले व लिहिले. कालानुक्रमाचा धागा कुठे सोडला नाही. बाजीरावाच्या पुण्यातील पुतळ्याचे रेंगाळलेले काम आणि इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘रसभरित प्रासादिक साद्यंत’ चरित्राची व्यक्त केलेली अपेक्षा या दोन प्रेरणा माझ्या या चरित्राच्या मुळाशी आहेत. बाजीरावाने शनिवारवाडा बांधला तेव्हापासून (इ.स. १७३१) पुण्याला खरेखुरे महत्त्व आले व उत्तरोत्तर शहर विस्तारत गेले. बाजीराव न होता तर पेशवाईत, आंग्लाईत आणि आजच्या स्वराज्यात पुणे केवळ ‘कसबे-पुणे’ राहते किंवा फारतर निजामशाही अहमदनगरासारखे पसरट, खुरटलेले शहर अस्तित्वात येते. अवतीभवती डोंगरमाळांनी वेढलेली, मुबलक पाण्याची, समशीतोष्ण सुसह्य हवेची आणि देहू-आळंदीनजीकजी जागा राजधानीसाठी निवडणारा बाजीराव किती कल्पक असला पाहिजे! पुणेकरांवर त्याचे अनंत उपकार आहेत. परंतु ज्याने वीस वर्षे अविश्रांत घोडदौड करून, छत्रपतींच्या साऱ्या स्वकीय-परकीय शत्रूंचे पंख छाटले, छत्रपतींचे राज्य अविचल निष्ठेने राखले, विस्तारले, नव्हे मराठ्यांच्या पराक्रमाला नर्मदापार विस्तृत क्षेत्र मिळवून दिले त्या अजिंक्य सेनानीचा त्याच्याच पुण्यपत्तनात अश्वारूढ पुतळा नसावा ही केवढी लाजिरवाणी गोष्ट! बाजीराव केवळ भटकुलोत्पन्न म्हणून? सामान्य वाचकांना, विशेषतः इतर सर्व समाजातील नव्या सुशिक्षित पिढीला हा वामनभट कसा होता हे सांगण्यासाठी व त्यांनीच खरे तर या क्षात्रधर्मी प्रतापी पुरुषाचा पुतळा उभारण्यात पुढाकार घेण्यासाठी, निदान त्याच्यापासून स्फूर्ती घेण्यासाठी-मुख्यतः या चरित्राचा कष्टदायक किचकट उद्योग मी केला. माझ्यापुरते त्या पुरोगामी खऱ्या मर्दमराठ्याचे वाङ्मयीन स्मारक केले. बुद्धिजीवी संशोधक, अभ्यासक यांना बाजीरावाची थोरवी चांगली अवगत आहे. या पूर्वसूरींनी आजवर जे संशोधिले, त्या सर्व साधनांचा गेली पाच-सहा वर्षे मी अभ्यास केला आणि तत्कालीन काळाच्या पार्श्वभूमीवर बाजीरावाचे एक विस्तृत, तपशीलवार, उठावदार चरित्र लिहिले. बरोबर शंभर वर्षापूर्वी (जानेवारी १८७९) कै. नागेशराव बापट यांचे ‘श्रीमंत बाजीराव बल्लाळ ऊर्फ पहिले बाजीरावसाहेब पेशवे’ हे मराठीतील पहिले कादंबरीवजा चरित्र प्रकाशित झाले त्या चरित्राच्या १९२९ पर्यंत आठ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या. तदनंतर नावाजण्याजोगे चरित्र कै. ना. के. बेहेरे यांनी लिहिले त्यालाही पन्नास वर्षे होत आली. गेल्या तीस-चाळीस वर्षात मराठ्यांच्या इतिहासात जे विपुल नवे संशोधन झाले ते लक्षात घेता आता अशी जुनी चरित्रे अपूर्ण व स्थूल वाटू लागतात. सबब बाजीरावासंबंधी जेवढे म्हणून अद्ययावत नवे संशोधित साहित्य उपलब्ध झाले त्याचा उपयोग करून मी हे नवे चरित्र वाचकांपुढे ठेवीत आहे. चरित्र ऐतिहासिक असले तरी ते रसपूर्ण, वाचनीय करण्याचा यत्न केला आहे. निखळ सत्याचे दोहन करताना लालित्याची कास धरली तर ते सत्य सहजगत्या वाचकांचे पचनी पडते नि त्यामुळे लेखकास अपेक्षित असणारा परिणाम साधला जातो. कै. राजवाडे यांनी व्यक्तविलेल्या अपेक्षा या चरित्रामुळे कितपत सफल झाल्या हे वाचकांनी ठरवावे. श्री. पगडी, श्री. बाबा पुरंदरे, श्री. य. न. केळकर यांनी खरे तर हे काम अंगीकारावयाचे. कै. स. गो. बर्वे आणि कै. लालजी पेंडसे यांच्या मनालाही रायाचे वेध लागलेले होते. अखेर माझ्या हातून त्या प्रतापी पुरुषाची वीरगाथा लिहून घेण्याचे नियतीच्या मनी असावे हेच खरे. इतिहासप्रेमी चरित्रलेखक मित्र श्री. अरविंद ताटके गेली अनेक वर्षे ‘लिहा, लिहा, लवकर पूर्ण करा’ असा माझ्यामागे तगादा करीत होते. पूर्ण अभ्यास झाल्याशिवाय मांड ठोकायची नाही अशी सवय जडवून घेतल्यामुळे लेखनास विलंब होत गेला. दोन वर्षापूर्वी नर्मदातीरी रावेरखेडीस जाऊन बाजीरावाच्या स्मारकवृंदावनाचे भक्तिभावपूर्वक दर्शन घेतले आणि तिथून परतल्यावर लेखनास आरंभ केला. स्थळ, काळ आणि व्यक्ती यांचा शक्य तो अचूक वेध घेत घेत चरित्रनायकाची मूर्ती घडवायची असल्यामुळे, दौड अधूनमधून थांबवावी लागत होती. त्यातून इतिहासपंडित आणि सामान्य वाचक या उभयतांनी पसंतीची टाळी द्यावी अशी आकांक्षा धरल्यामुळे कष्ट आणि कसरत फार करावी लागली. पण ती केली. प्रामाणिकपणे केली. आता बाजीरावाच्या अनंत ऋणातून अंशतः मुक्त झालो आहे. माझे हे चरित्र ‘श्रीमंत थोरले बाजीराव चरित्र मंडळ’ या संस्थेच्या वतीने प्रकाशित होत आहे. तेव्हा या संस्थेच्या सर्व सभासदांचा, विशेषतः डॉ. वा.का. वाटवे यांचा मी फार आभारी आहे. मंडळाचे अध्यक्ष श्री. रघुनाथराव चितळे हे केवळ मिठाईवाले नाहीत, तर धिटाईचे, मर्दुमकीचे पूजक आहेत, हे मला या चरित्राच्या निमित्ताने अनुभवास आले. प्रा. द. श्री. तथा नाना जोग, डॉ. प. वि. वर्तक, कै. प्रि. रा. ना. केळकर, प्रा. वि. वि. पेशवा, डॉ. वाटवे यांना मी चार-पाच बैठकीत हे चरित्र आधी वाचून दाखविले. श्री. वि.पां. बोकील अधूनमधून आस्थेने चौकशी करीत होते. मी या सर्व प्रोत्साहकांचा आभारी आहे. कल्पना मुद्रणालयाचे श्री. चिंतामणी लाटकर यांचा हात फिरला की शुभ्र दाणेदार हलवा हाती येतो ऐसी सांप्रत ‘मराठीचिये नगरी’ स्थिती आहे. आभाराचे त्यांना आता खरोखर अजीर्ण झाले असावे. पण कर्तव्य म्हणून त्यांचे, त्यांच्या सहकाऱ्यांचे, चित्रकार श्री. अनंत सालकर यांचे आणि सुवाच्य मुद्रणप्रत सिद्ध करून देणाऱ्या सौ. इंदू गोखले यांचे मी मनापासून आभार मानतो ‘प्रतापी बाजीराव’ या पुस्तकाची ही द्वितीयावृत्ती एकोणीस वर्षांनी प्रसिद्ध होत आहे. प्रथमावृत्तीच्या प्रकाशकांचे निवेदन आणि त्यांच्या वतीने प्रसिद्ध झालेली सूचीनंतरची २४ पृष्ठे प्रस्तुत आवृत्तीतून गाळली आहेत. तसेच काही किरकोळ चुका दुरूस्त केल्या आहेत. जाहिरात, अभिप्रायार्थ भेटी आणि विक्रीव्यवस्था या तीन बाबतीत आवश्यक ती दक्षता न घेतल्याने द्वितीयावृत्ती निघण्यास एकोणीस वर्षे लोटली. आता प्रस्तुत आवृत्ती ‘उत्कर्ष’चे श्री. सु.वा. जोशी यांनी प्रसिद्ध केली याबद्दल त्यांचा मी फार आभारी आहे. - म. श्री. दीक्षित


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि