120.00 250.00
Download Bookhungama App

फाळणी : युगान्तापूर्वीचा काळोख - वि. ग. कानिटकर

Description:

इतिहास हे अखेर कालचे राजकारणच असते. या राजकारणाचा मागोवा विविध दृष्टीकोनातून घेतला जाणे, देशाच्या वैचारिक आरोग्याला हितकारक ठरते. फाळणीपूर्व काळातील अंधारात बरीच वर्षे अवगाहन केल्यानंतर आणि नंतरच्या चाळीस वर्षांची वाटचाल निरखल्यानंतर मला जे वाटते ते मी वाचकांपुढे ठेवले आहे. प्रत्येकाची विचारशक्ती त्याला वेगळ्या निष्कर्षाप्रत नेऊ शकते याची मला कल्पना आहे. काय घडले आणि कसे घडले हे नि:पक्षपातीपणाने सांगणे एवढाच ह्या माझ्या पुस्तकाचा प्रधान हेतू आहे.

- वि. ग. कानिटकर.१५ ऑगस्ट १९४७ ला देशाची फाळणी होऊन हिंदुस्थान स्वतंत्र झाला. या घटनेला आता पंचेचाळीस वर्षे पूर्ण होतील. या काळात स्वातंत्र्याचे अनेक इतिहास लिहिले गेले. या इतिहासातून बहुशः सर्व लेखकांनी, फाळणीचे जनकत्व महंमदअली जीना यांना दिलेले आढळले.

जीना हे एकेकाळी राष्ट्रसभेत होते, म्हणून जीनांच्या विचारातील वळणावळणांचा आढावा घेऊन, अनेकांनी जीनांमध्ये झालेल्या परिवर्तनाबद्दल राष्ट्रसभेच्या उदार नेतृत्वालाच दोषी धरलेले आहे. राष्ट्रसभेचा त्याग करून जीना लीगमध्ये का गेले? कुठल्या क्षणापर्यंत देश अखंड रहावा असे त्यांना वाटत होते? राष्ट्रसभेने युक्त प्रांतात १९३५ च्या कायद्यानुसार सरकार स्थापन करताना, मुस्लिम लीगबरोबर संमिश्र मंत्रिमंडळ न बनवण्यात केवढी घोडचूक केली? अशा घडामोडींची चर्चा बहुतेक लेखक करतात व जीनांनाच झुकते माप देतात. अशा उथळ रीतीने फाळणीची बीजे हुडकणे ही मला घोर आत्मवंचना वाटते. फाळणीची बीजे मुसलमानांच्या मानसिकतेतच खरे तर शोधावी लागतात. ही मानसिकता कित्येक शतकांची आहे आणि त्याचा संबंध इस्लाम धर्माच्या असहिष्णुतेशी आहे. १८५७ चा उठाव फसल्यापासूनच ही बीजे अंकुरू लागलेली दिसतात.

याच इतिहास लेखकांनी, पाकिस्तान तोडून दिल्याने, मुसलमानांचा प्रश्न सुटला असून, धर्मनिरपेक्षशासित हिंदुस्थानच्या उज्ज्वल अभ्युदयाचा मार्ग आता मोकळा झाला असल्याचा निर्वाळाही दिलेला आढळतो. ही अपेक्षाही भ्रममूलक ठरल्याचे आता पुरेसे स्पष्ट झाले आहे. धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव या कल्पना सर्वस्वी भिन्न आहेत. राजकारणी सोयीनुसार कधी धर्मनिरपेक्षतेचा तर कधी सर्वधर्मसमभावाचा येळकोट करीत असल्याचे दिसून येते. सर्व धर्म सारखे असतात हे म्हणणे देखील सत्याला धरून नाही. हिंदू धर्म इतर धर्मसंबंधात एक उदार व सहिष्णू असेल, परंतु सर्व बंदिस्त धर्म हे अन्य धर्मांबाबत अनुदार व असहिष्णू असल्याचे सतत प्रत्ययाला येते.

मी वाचलेल्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील या प्रकारच्या त्रुटी मला अस्वस्थ करत. फाळणी ही आमच्या पिढीने पाहिलेली सर्वात प्रक्षोभक घटना होती. मी विपुल लिहिले, परंतु ज्या कालखंडाचा मी एक सामान्य साक्षी होतो त्या कालखंडाविषयी माझेकडून पुस्तकरूपाने काही लिहिले गेले नाही, याची मला सतत खंत वाटे. गेल्या २५ - ३० वर्षात प्रसिद्ध झालेली फाळणीविषयक जवळजवळ सर्व पुस्तके वाचून आवश्यक ती टिपणे मी काढली होती. अनेक संदर्भ स्मृतीत गर्दी करून होते. पण प्रत्यक्ष लेखन होत नव्हते.

परंतु दोन वर्षांपूर्वी मोठीच मानसिक अशांती व शारीरिक क्षीणता वाट्याला आली. मी फाळणीवर पुस्तक लिहावे असा ज्याचा मला सतत आग्रह होता व ज्याच्याबरोबर ह्या विषयावर गेली बरीच वर्षे मी तासन्तास बोललो तो माझा भाऊ यशवंत पंचवीस जुलै १९९० रोजी रॉचेस्टर मुक्कामी अचानक हे जग सोडून गेला. आता जर मी हे पुस्तक लिहिले नाही तर माझे हातून ते कधीच लिहिले जाणार नाही अशा भीतीने मला घेरले. आणि या भीतीपोटी एका क्षणी या पुस्तकाच्या लेखनात स्वतःला गुंतवून घेतले. आता पुस्तक प्रसिद्ध होत आहे. पण माझा भाऊ ते पाहू शकणार नाही यामुळे मन उदासीन आहे. आम्ही दोघे शरीराने वेगळे होतो, परंतु आमचे भावनिक जीवन एकच होते.

इतिहासाचे पुस्तक हे कधीच सर्वथैव स्वतंत्र नसते. इतिहास तोच असतो. पूर्वी प्रसिद्ध झालेले ग्रंथ, पुस्तके, लेख, सर्व तपशील आणि संदर्भ पुरवतात. या तपशीलातून आपल्या मनोधारणेनुसार निवड करायचे स्वातंत्र्य काय ते निवेदकाला असते. तेवढे मी घेतले आहे.

 

- वि. . कानिटकर 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि