आपल्या जीवनातील आलेले विविध विलक्षण अनुभव लिहावेत, त्याचे छोटेसे पुस्तक रिटायरमेंटच्या वेळी प्रकाशित करावे... आणि ज्या-ज्या व्यक्तींनी, मित्रांनी, आप्तेष्टांनी जीवनामध्ये अनमोल मदत केली, आनंद दिला, प्रेम दिले; त्यांना ते कृतज्ञतापूर्वक अर्पण करावे.
आज श्रीराम नवमी. गेली अनेक वर्षं मनामध्ये एक विचार येत होता की आपल्या जीवनातील आलेले विविध विलक्षण अनुभव लिहावेत, त्याचे छोटेसे पुस्तक रिटायरमेंटच्या वेळी प्रकाशित करावे... आणि ज्या-ज्या व्यक्तींनी, मित्रांनी, आप्तेष्टांनी जीवनामध्ये अनमोल मदत केली, आनंद दिला, प्रेम दिले; त्यांना ते कृतज्ञतापूर्वक अर्पण करावे.
परंतु मुहूर्त सापडत नव्हता.
सुरुवात होत नव्हती.
सुरुवात कोठून करावी, हे सुचत नव्हते.
का सुचत नव्हते?
कारणही तसेच होते.
कारण अनुभव खूप होते आणि मध्यमवर्गीय जीवनशैलीच्या विपरीत होते.
डोक्यात विचारांचे काहूर माजलेच होते. आणि विचार करता-करता अचानक आजच्या श्रीराम नवमीच्या मंगल दिवशी लिहिण्याचा श्री गणेशा करण्याचा बेत मनात आला आणि योगायोग पाहा...
माझ्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या मुंबईतील चित्रनगरीतल्या प्रवेशाच्या दिवशी ‘राम-बलराम’ सिनेमाचा सेट लागला होता आणि माझ्यासमोर चित्रीकरणामध्ये व्यग्र होते साक्षात अमिताभजी आणि धर्मेंद्रजी!
राम-बलराम!
चला, सुरुवात तर छान झाली लिहायला.
जीवनातील समृद्ध अनुभव,
विविध गमती-जमती...
अनोळखी अनेक व्यक्तींचा लाभलेला स्नेह...
सगळं-सगळं तुम्हाला सांगायला मन खूप आतूर झाले आहे.
पाहू या जमते का!
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या माझ्या वाट्याला आलेले अनेक कटु-गोड प्रसंग (कटु कमी, पण गोड अनुभव मात्र खूप-खूप), आठवणी, गमती-जमती क्वचितच कोणाच्या वाट्याला आले असतील.
जीवाभावाच्या माणसांना, मित्रांना हे प्रसंग सांगताना वेळचे भान कोणालाच राहत नसे. ना मला, ना ऐकणाऱ्यांना.
सतत सांगितल्याने ते प्रसंग, अनुभव जसेच्या तसे डोळ्यांसमोर अजूनही उभे राहतात.
मित्रांनी, आप्तेष्टांनी बऱ्याच वेळा सांगितले की- अरे, तू हे सगळे लिही.
वर्षभरापूर्वी ओळखीच्या एका मावशींनी जिद्दीने लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला गेलो असता- त्यांच्या लिखाणाच्या प्रेरणेमुळेच मनाने निश्चय केला आणि जीवनात ज्या-ज्या परिसांनी आयुष्याचे सोने केले, त्या सर्वांना कृतज्ञतेची भेट द्यावी- अशा नम्र भावनेने अतिशय उत्साहाने... आनंदाने लिहायला सुरुवात केली.