60.00 116.00
Download Bookhungama App

श्रीक्षेत्र पंढरपुरातील मठांचा इतिहास - वा. ल. मंजूळ

Description:

श्रीक्षेत्र पंढरपुरातील मठांचा इतिहास : फड आणि दिंड्यांसहपंढरपूरातील मठांचा आणि फडांचा इतिहासअसा एक संशोधनात्मक प्रकल्प पुणे विद्यापीठाच्यासेंटर फॉर सोशल सायन्सेसमार्फत विद्यापीठ अनुदान मंडळ यांच्याकडे अनुदानासाठी वर्ष २००५-२००६ या काळात सादर केला. तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे हे या सेंटरचे समन्वयक होते. त्यांन हा शोध प्रकल्प खूप आवडला. आणि या प्रकल्पाला मार्गदर्शन करण्याचेही त्यांनी मान्य केले. या कार्याच्या खर्चासाठी विद्यापीठ अनुदान मंडळाने रुपये पस्तीस हजार मंजूर केले. त्यामध्ये प्रवासखर्च, साहित्याची खरेदी आणि ग्रंथप्रकाशनाचा खर्च याची तरतूद होती. हा प्रकल्प तीन वर्षे आम्ही पाठपुरावा करून पूर्ण केला. काही त्रुटी, अपूर्णता राहिली होती. ती नंतरच्या दोन वर्षांत पूर्ण केली. आणि आता लेखन पूर्ण होऊन आपल्या हाती ग्रंथ देण्यास आम्हास आनंद होत आहे. ग्रंथ प्रकाशनाचा खर्च मठपती व भक्त मंडळी उचलतीलच.

वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात तेराव्या शतकापासून अस्तित्वामध्ये आहे. या संप्रदायात अनेक विख्यात संतमहंत होऊन गेले. हा वारकरी संप्रदाय मधल्या काळात भागवत संप्रदाय म्हणून ओळखला जाऊ लागला. अलीकडे दीड-दोनशे वर्षांत संतांचा पालखी सोहळा सुरू झाल्याने अतिशय प्रगत स्वरूपात याची वाढ झाली. आणि त्यानंतरच्या काळात क्षेत्र पंढरपूरातील भक्ती कार्यासाठी अनेक संतसत्पुरुषांनी आपल्या अनुयायांसाठी मठ आणि फड यांची स्थापना केली. प्रामुख्याने मठामध्ये श्रीविठ्ठलभक्ती चातुर्मासात (आषाढ ते कार्तिक) आपल्या शिष्यगणांसह कीर्तन, भजन, प्रवचन, पुराण आदी स्वरूपात साजरा करण्याचा प्रघात पडला, ती संतमंडळी मठाधिपती झाली. त्यांचे क्षेत्रमठम्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामध्ये सर्वश्री - वासकर, सातारकर, तनपुरे, मनमाडकर, कैकाडी, देहूकर, तुकाविप्र, अंमळनेरकर, चोपडकर, बनवसकर, देगलूरकर असे मठ लोकप्रिय झाले. तर केवळ पालखी सोहळ्यात अनुयायांसह क्षेत्र पंढरपूरी जाऊन विठ्ठलदर्शन घेण्याचे व एरव्ही आपल्याच गावी उपासना करण्याचे काम जी संत मंडळी आपल्या शिष्यगणांसह करीत असत ती मंडळी वारकरी संप्रदायाचीफडकरीठरली. त्यामध्ये औसेकर, देहूकर, पैठणकर अशी संतमंडळी नामवंत झाली. तसे मठपती आणि फडकरी यांच्यातील भेद वर्णन करणे अवघड आहे. परंतु माझ्या ज्ञानानुसार मी इथे भेद मांडला आहे.

 

- वा. . मंजूळ


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि