200 800
Download Bookhungama App

ओव्हरलोड - ऑर्थर हॅली

Description:

किमान आता तरी आत्मचिंतन व्हावं, झालेल्या चुका झाल्या गेल्या म्हणून सोडून देऊन, नव्या जगाला सामोर जाण्यासाठी एक हिंमत आपल्यात यावी, असा आत्माशोध व्हावा, हीच ओव्हरलोडच्या अनुवादामागची प्रेरणा आणि समकालीन प्रस्तुतता!थोडं लेखकाविषयी आणि कादंबरीविषयी... ऑर्थर हॅली हे इंग्लिश कादंबरीकार १९३९ ते १९४७ अशी आठ वर्षे रॉयल एअर फोर्समध्ये होते. तिथून ते कॅनडाला गेले. अनेक लहान मोठ्या नोकऱ्या केल्यावर आणि लेखनाचे अनुभव घेतल्यावर त्यांना पूर्णवेळ लेखक व्हावंसं वाटलं. रन वे झिरो एट ही त्यांची ५८ सालची पहिली कथा. ५९ सालची द फायनल डायग्नोसिस, ६० सालची इन हाय प्लेसेस आणि ६५ सालची हॉटेल या कादंबऱ्या इतक्या गाजल्या की, हॅली कॅलिफोर्नियाला स्थायिक झाले. पण चारच वर्षांत कॅनडा आणि अमेरिकेच्या इन्समटॅक्सवाल्यांना कंटाळून त्यांनी थेट बहामा गाठलं. हॅलींच्या अनेक कादंबऱ्यांनी न्यूयॉर्कच्या बेस्ट सेलर यादीत स्थान मिळवलं. त्यांच्या कादंबऱ्यांच्या १७ कोटीहून अधिक प्रति खपल्या. चाळीसेक भाषांमध्ये त्यांची भाषांतर झाली. हॅली हे कॅनडाचे नागरिक. त्यांची मुलं कॅनडा आणि कॅलिफोर्नियात स्थायिक झालेली, पण त्यांनी मात्र निवडलं, ते न्यू प्रॉव्हिडंस आयलंडवरचं लिफोर्ड केमधलं रिसॉर्ट. शीला या आपल्या दुसऱ्या पत्नीसोबत त्यांवा मुक्काम तिथंच असायचा. २००४ साली त्यांचं तिथंच बहामामध्ये निधन झालं. १९७८ साली त्यांनी लिहिलेली ओव्हरलोड ही एक कादंबरी. नेहमीप्रमाणेच बेस्ट सेलर्सच्या यादीत नाव कमावलेली आहे. ही कादंबरी वाचताना कदाचित ती एक कादंबरीतील घटना आहे, असं त्यावेळेसच्या, १९७८ सालातल्या भारतीयांना वाटलं असलं, तरी आजची परिस्थिती मात्र पार वेगळी आहे. ७८ साली वाटणारी एक कल्पना आजच्या भारतातील, किमान महाराष्ट्रातील जनतेसमोरचे एक भयानक वास्तव आहे. कादंबरी वाचताना लेखक हा केवळ कथानक रंगवणारा बोरुबहा-र न राहता एक द्रष्टा होता, याची जाण सुजाण वाचकाला येऊ लागते. लोडशेडिंग हा विषय तसा आपल्याला नवा अजिबातच नाही. गेले काही वर्ष आपण लोडशेडिंगच्या संकटाला तोंड देत आहोतच. वाढत जाणारी प्रचंड लोकसंख्या, त्याचसोबत वाढत जाणाऱ्या वसाहती, उद्योगधंदे, कारखाने, प्रचंड प्रमाणात होणारी जंगलतोड, त्यामुळे सततच घसरत जाणारी नैसर्गिक साधनसंपत्ती, सततच कमी प्रमाणात पडत जाणारा पाऊस, वाढणारं तपमान, सततच ऐशआरामात जीवन जगण्याची आधुनिक जीवनशैली, त्यानुसार वाढत जाणरी फ्रिज, एअर कंडिशन्स, टेलिव्हिजन्स, काम्पुटर्स, फॅन्स, इतर अनेक दैनंदिन जीवनावश्यक यंत्रांची गरज व काही बेजबाबदार सवयींमुळे आपण वीजेच्या वापराचे गुलामच बनलेलो आहोत. वीजेचा पुरवठा नाही, तो दिवस लोडशेडिंगचा, तो ही मोठ्या कष्टाने आपल्याला घालवावा लागतो. कारण केवळ मानवी बळावर चालेल, आणि कमी पैशात उपलब्ध होईल, अशी कुठलीही सेवा आपण कुठल्याही यंत्रामार्फत घेऊ शकत नाही. एक वेळ आपले माणसाविना भागेल, पण यंत्रांशिवाय जगता येईल की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जी परिस्थिती यंत्राधिनतेची झाली आहे, तीच परिस्थिती ऊर्जेच्या सर्व क्षेत्रात झाली आहे, असे समजायला हरकत नाही. पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहे, डिझेलही त्याच्यासोबत स्पर्धा करीत आहे. तरी अनावश्यक गाड्यांचा वापर टाळणे, आपल्याला शक्य होत नाहीये. तेलउत्पादक देश आपल्याला त्यांच्या तालावर नाचवत आहेत, त्याखेरीज देशी व्यापाऱ्यांनीही लुटायला सुरूवात केली आहे. डॉलर्सच्या तुलनेत रोजच घसरत जाणारा रुपया आणि जुगार हारल्यावर रस्तावर यावं, तसं रस्तावर आणणारं शेयरमार्केट या दोन गोष्टी आता ग्रामीण जीवनातही शिरल्या आहेत. जगण्याची शैली आणि राहणीमान उंचावलं असं वाटत असतानाच आता जगावं तर कसं जगावं, हा ही प्रश्न समोर उपस्थित होत आहे. एकंदर केवळ उच्च आणि आधुनिक जीवनमान असलं, म्हणजे जगणं चांगलं आणि सुखमय असतं, या विचाराला एका बाजूने तडा जात आहे. सततच वाढत जाणाऱ्या ऊर्जेच्या, वीजेच्या आणि इंधनतेलाच्या मागणीमुळे अनेक प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. इंधनतेलाचे नैसर्गिक स्त्रोत आटत चालले आहे. तो दिवस फार लांब नाही, ज्या दिवशी दारात उभी असलेली मोटार लोखंडाच्या भावात विकावी लागेल. दारातील गाडीला किक मारून लगेच हवं तिथं जाणं, एक ऐतिहासिक बाब असेल, इतिहासातील एक मिथ ही ठरेल. सायकलखेरीज कुठलंच वाहन काळाच्या कठोर परीक्षेला उतरणार नाही. वीजेच्या वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी आपण उपाय खरंतर तेव्हाच सुरू करायला हवे होते, जेव्हा अमेरिकेत ऑर्थर हॅली हा लेखक याच वीजप्रश्नावर आधारित ओव्हरलोड या कादंबरीची जुळवाजुळव करीत होता. १९७८ साली ही कादंबरी प्रकाशित झाली तेव्हाच तिचं वितरण जागतिक स्तरावर झालं. तेव्हा जर कुणा भारतीयाने, मराठी माणसाने ही कादंबरी मराठीत अनुवादित केली असती, तर इथल्या शासनव्यवस्थेला कदाचित संभाव्य संकटाची चाहूल लागली ही असती. या द्रष्ट्या लेखकाने केलेली ही भविष्यवाणी आपल्यासाठीच आहे, हे जरी समजून घेतले असते, तर कदाचित काही प्रमाणात का होईना, उपाययोजनेच्या दिशेने आपले पाऊल पुढे पडले असते. कदाचितच... असं म्हणण्याचं कारण एवढचं की, कुठलाही साहित्यप्रकार हा जी भविष्यवाणी करतो, ती फक्त मनोरंजनासाठी नसते, तर अंतर्मुख होऊन त्यासाठी काही उपाययोजना करण्यासाठी असते हे समजून घेण्याची संवेदनशीलता आपल्या नेत्यांत आणि सत्ताधाऱ्यात आहे की नाही, हा ही एक संशोधनाचा विषय आहे. साहित्यप्रकाराला रंजनापलिकडे काही मूल्य असते, हा विचार फारच कमी भारतीयांपर्यन्त पोहोचला आहे. वीजकपात अर्थात लोडशडिंगमुळे येऊ शकणारं संकट शेवटी आपल्यावर येऊन कोसळलंच. मला तरी चांगलं आठवतं, ज्या काळात ऑर्थर हॅली ओव्हरलोडच्या शेवटच्या खर्ड्यावर हात फिरवत असावेत, त्याच काळात महाराष्ट्रात लोडशेडिंगच्या संकटाची चाहूल आणि चुणूक सुरू झाली होती. आजच्या एवढा नाही, तरी काही प्रमाणात का होईना, लोडशेडिंगचा त्रास सुरू झाला होता. आजाराची काही चिन्ह बाहेर दिसायला सुरूवात झाली होती. त्याचवेळी हा आजार पुढे मागे भयानक स्वरुप धारण करणार आणि काही वर्ष का होईना, त्यावर उपाययोजना करण्यात जातील, ही कल्पना काही जणांना निश्चितच आली असणार त्यावेळेसच काही प्रमाणात का होईना, उपाययोजना करणे आणि वीज निर्मितीचे इतर पर्याय वापरून पाहणे गरजेचे होते. काही प्रमाणात त्या दिशेने प्रयत्न झाले असले, तरी ही ते तितकेसे जोरकस नव्हते, किमान संभाव्य धोका टाळण्यासाठी केलेले ते जोरदार प्रयत्न होते, असं आजच्या लोडशेडिंगच्या दिवसावरुन तरी वाटत नाही. - वसू भारद्वाज


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि