60 144
Download Bookhungama App

मुलांची जडण-घडण एक जबाबदारी - लीलावती भागवत

Description:

मुलांना वाढवण्याच्या बाबतीत. केवळ पालकत्व आलं म्हणजे आपसूकच मूल वाढवण्याचं कौशल्य किंवा ज्ञान येतं असं नव्हे; तर त्या बाबतीत विचार करून, माहिती प्राप्त करून, अनुभवाने येणारं शहाणपण अशा कामी उपयोगी पडतं.माझी भूमिका जात्यावर बसलं की ओवी सुचते, पाण्यात पडलं की पोहता येतं, चोच देईल तो चारा देईल ही सुभाषितं म्हणजे काय घडावं त्यासंबंधीच्या इच्छाकल्पना आहेत असंच म्हणायला हवं. कारण ओवी सुचायला नुसतं जातं पुरत नाही तर काव्यप्रतिभा असावी लागते, पोहायला न शिकता पाण्यात पडलं तर बुडण्याचाच धोका असतो आणि आयता चारा चोचीत मिळेल या आशेवर बसलं तर उपाशी राहाण्याचीच पाळी येईल. तसंच आहे मुलांना वाढवण्याच्या बाबतीत. केवळ पालकत्व आलं म्हणजे आपसूकच मूल वाढवण्याचं कौशल्य किंवा ज्ञान येतं असं नव्हे; तर त्या बाबतीत विचार करून, माहिती प्राप्त करून, अनुभवाने येणारं शहाणपण अशा कामी उपयोगी पडतं. हे पुस्तक मी एखादी मानसशास्त्रज्ञ म्हणून किंवा पालकांना उपदेश अगर मार्गदर्शन करणारी कुणी तज्ज्ञ म्हणून लिहिलेलं नाही. १९४४ च्या सुमारास मादाम माँटेसरी भारतात आल्या होत्या. त्यांनी पुण्यात ६ महिने त्यांच्या पद्धतीचा शिक्षणक्रम घेतला तेव्हा मी त्यांची एक विद्यार्थिनी होते. त्यांच्या शिकवण्याने, त्यांच्याशी सतत होणाऱ्या चर्चांमुळे, संवादांमुळे मुलांच्या मनात डोकावण्याची मला सवय लागली. पुढे माझी दोन मुलं वाढवताना आणि आसपासच्या वाढवलेली पाहताना माझ्या मनात कित्येक प्रश्न उभे राहिले. त्या त्या वेळी त्यांचं निराकरण झालं असं नाही. कदाचित एखाद्या बाबतीतले माझे विचार आणि आचार यांत त्यावेळी तफावतही पडली असण्याची शक्यता आहे. पण नंतर बऱ्याच वर्षांनी आता आसपासच्या बदललेल्या वातावरणाचा, मुलांच्या अंगच्या गुणांना वळण आणि आकार देण्याचा प्रश्न जेव्हा जेव्हा माझ्या मनात आला तेव्हा तेव्हा मी जास्त बारकाईने विचार करू लागले. काही जुने अनुभव पुन्हा नव्याने डोळ्यांसमोर आले. माझ्या मनाने आणि अनुभवाने मी काही दैनंदिन समस्यांबाबत निष्कर्ष काढले. काही बाबतीत ते योग्य आहेत असाही प्रत्यय येऊ लागला. काही उदाहरणं विचारात चपखल बसली होती त्यांचा पुनःप्रत्यय आला, विचारांना आणि निष्कर्षांना एक सुसंगती लाभली तेव्हा ते सूत्रबद्ध लेखरुपाने मी लिहून काढले. आणि मला हे माझे विचार माझ्याच सारख्या सर्वसामान्य साध्यासुध्या पालकांपुढे ठेवावे असं वाटू लागलं. खरं तर प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं. त्यांचे त्यांचे स्वतःचे प्रश्न, विचार, गुणक्षमता सर्व वेगळं असतं. तरीही मूल म्हणून सर्वांचं एक समान स्वरूपही असतं. आणि म्हणूनच काही सर्वसामान्य निष्कर्ष आधारभूत धरून आपण विचार करू शकतो, अंदाज बांधू शकतो. दुसऱ्याच्या समस्या अलिप्तपणे पाहिल्याने एक प्रकारच्या तटस्थ वृत्तीने स्वतःकडे आणि स्वतःच्या मुलाकडे पाहण्याची दृष्टी लाभू शकते. हे लक्षात घेऊनच हे लेख लिहिले आहेत. पालकांनी ते वाचावे, आपल्या कुटुंबात, आपल्या मुलांच्या बाबतीत ते ताडून पहावे आणि त्या अनुरोधाने स्वतःचे काही निष्कर्ष काढावे आणि मुलांना डोळसपणे घडवण्याची आवश्यकता त्यांना जाणवावी हा हेतू हे पुस्तक लिहिण्यामागे आहे. एवढं कार्य जरी याने साधलं तरी मला काही साधल्यासारखं वाटेल. असं काही लिहावंसं वाटलं आणि त्याच वेळी ‘तरुण भारत’च्या रविवारच्या अंकाचं काम पाहणाऱ्या श्रीमती शशिकला उपाध्ये यांनी एखादी लेखमाला मी लिहावी असा आग्रह केला. हा चांगला योग असंच म्हणायला हवं. कारण त्यामळेच हे लेख ताबडतोब लिहिले गेले, ‘तरुण भारत’ची मी या बाबतीत आभारी आहे. लेखमाला पुस्तकरूपाने प्रसिद्ध होण्यास मधे सहा-सात वर्षांचा काळ लोटला. लेखमाला आवडल्याचं काही वाचकांनी त्या वेळी मला कळवलं होते. या पुस्तकाचंही वाचकांकडून तसंच स्वागत होईल अशी मला आशा वाटते. - लीलावती भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि