60.00 116.00
Download Bookhungama App

मेघावळ - सी. एल. कुलकर्णी

Description:

मेघावळ! मेघांची प्रभावळ. मेघ म्हणजे आशा. मेघ म्हणजे दिशा. मेघ म्हणजे अभिलाषा. मेघ निराशाही. मेघ एक दाटलेलं सूक्त. कधी करुणायुक्त कधी दुष्काळभुक्त.मनोगत

मेघावळ काव्यललित

मेघावळ! मेघांची प्रभावळ. मेघ म्हणजे आशा. मेघ म्हणजे दिशा. मेघ म्हणजे अभिलाषा. मेघ निराशाही. मेघ एक दाटलेलं सूक्त. कधी करुणायुक्त कधी दुष्काळभुक्त.

ग्रीष्मात निथळलेला प्रत्येकजण आतूर. वारा मेघांना फितूर. आला तर धुवाधार नाहीतर पिरपिर रटाळ.

मेघ जीवनाचा आधार. इंद्राचा अवतार. सृजनाचा दातार. सृष्टीचा पाऊस बेभान. पाऊस निष्काम. पाऊस अस्वस्थ. पाऊस बदनाम. पावसात चिखल. चिखलात कमळ. शेतात बीज. बीजांकुरांची हिरवळ. बीजात सत्त्व. जगण्या-जगवण्याचे तत्त्व. समृद्ध चाहूल तरीही छुप्या दुष्काळाची हूल.

अतृप्त हा प्रवास सदाही. आपल्याच मनातलं खोलवर साचलेलं अचानक प्रवाही. निमित्ताने...... निमित्ताशिवायही.

निमित्त सहवासाचं, निमित्त हव्यासाचं, निमित्त हरवल्याचं, निमित्त आठवल्याचं. एकांत-एकटेपण हेही निमित्त आणि अवास्तव आसक्ती हेही पण निमित्तच!

मन हा मेघच. वाऱ्यासोबत दिशाहीन भटकणारा. वारा थांबला की जडत्वात जाणारा. पिंजून पिंजून धुकं पिसणारा. हळव्या स्पर्शानं दैवात विरघळणारा. उन्हात लपणारा, उन्हाला झाकणारा, पण पहाडाच्या छातीवर विसावून मनसोक्त ढळणारा. विरही-आरोही-अवरोही. सर्वांसोबत असूनही एकटा एकटाच.

मेघ-माणूस-पाऊस, स्वभाव साधर्म्य. त्याचं अवखळणं, माणसाचं खळणं. तो पाणी हा शब्द. त्याचा प्रवाह; त्याचं काव्य. त्याचं संचित ह्याचं ललित.

मेघावळनिसर्गाचं ललित्य, मानवाचं साहित्य.........!!

मेघावळअज्ञाताचं काव्य-ललित

अज्ञाताचं दायित्व..............

संसारातल्या उभ्या आडव्या धाग्यांच्या स्वभावधर्मांचं खट्याळ औचित्य. कधीतरी तोंडलावणीला किंचित पांडित्य!!.......

अस्तित्त्व, संपर्क, संबंध, नातं, संस्मरण, आठवण, अनुभव, कृतकृत्य, अध्ययन अध्यापन, अनुभव, गुरु-शिष्य, कृतज्ञ समर्पण हे जीवनाचे समृद्ध आशय आणि विषय. माणसाला तृप्त जगण्यासाठी अनुभव आणि स्वानुभव ह्यात, स्वानुभव शहीद तर अनुभव चतुर चतुरस्त्र राज्यकर्ता. स्वानुभवाची किंमत मोठी तर अनुभवाची जहागीर मोठी. स्वानुभवात थेट चटके तर अनुभवात चटक्यांची झळ. आयुष्य म्हणजे खेळ. कधी हार कधी जीत. शेवट रिकामाच. निष्पन्न शून्य. मात्र भावनांशी चाळा हा निष्ठावंत विरंगुळा.

जगातल्या प्रत्येक माणसात वावरणाऱ्या रसरंगाच्या शब्दबद्ध कुप्या म्हणजे कविता, कथा, कादंबऱ्या, मरणाचा, सरणाचा, दफनाचा आणि त्यानंतरचा प्रवास स्वानुभवातून कसा लिहिणार? परकाया प्रवेश! सहवासातून एकरूप झालेल्या ह्या अनुभवसिद्ध सत्य संवेदना. हरवत गेलेला एकेक क्षण सापडवताना उमललेले रोमांकित मन. हसता हसता पाकळ्यांना बिलगलेले परागकण. गहिवरलेल्या कंठामुळे, हृदयातून मुकेच मिळालेले भावुक शब्दांचे आंदण.

खेळलेली रास. मखराची आरास. श्वासांच्या सोबतीने आलेले काही निश्वास. कधी भास कधी आभास. सारे काही उपलब्ध असूनही झालेला एकांताचा प्रवास.

मांडून ठेवलंय, रांधलेलं एकाच थाळीत, आपल्या आस्वादासाठी. बाह्यप्रेरणेनं अंकित झालेलं ललित आणि हरवलेल्या अवस्थेत गवसलेलं काव्य, ह्यांच्या अवस्था वेगवेगळ्या असल्या तरी भाष्याचा संकेत एकच आहे.

विविध पदार्थ विविध चवी. उद्देश एकच तृप्ती - समाधान - आनंद - संजीवन.

 

- सी. एल. कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि