Id SKU Name Cover Mp3
Maza Desh Aani Maze Lok


60.00 116.00
Download Bookhungama App

माझा देश आणि माझे लोक - संकलन: डेव्हिड हॉवर्थ

Description:

माझा देश आणि माझे लोक - तिबेटचे दलाई लामा यांचे आत्मवृत्त

संकलन: डेव्हिड हॉवर्थ

मराठी अनुवाद: भा. रा. भागवत१९५० साली जेव्हा चिनी कम्युनिस्ट फौजा तिबेटवर चालून गेल्या आणि त्यांनी देशाचा पूर्वभाग व्यापला, तेव्हा माझी व माझ्या लोकांची परिस्थिती असहाय नि जवळजवळ हताश बनली. जगातल्या कित्येक प्रमुख देशांकडे व संयुक्त राष्ट्रांकडे आमच्या वतीने मध्यस्थी करण्याची आम्ही याचना केली. पण आमच्या विनंत्यांना नकार मिळाला. लष्करी सत्तेच्या दृष्टीने तिबेटचे महत्त्व अनेक शतकांपूर्वीच संपलेले होते. कारण आमची शांततेच्या मार्गावर श्रद्धा आहे आणि हजार वर्षांपूर्वी भगवान बुद्धाचे सुविचारधन भारतातून आमच्याकडे आणले गेले तेव्हापासून आम्ही तो शांतिमार्ग चोखाळण्याचा प्रयत्न करीत आलो आहो. आमचे राष्ट्रीय जीवनच मुळी धर्माला वाहिलेले असल्यामुळे आमची ऐहिक साधनसंपत्ती नेहमीच तुटपुंजी राहिली. अतएव इतर राष्ट्रांनी साहाय्य नाकारल्याबरोबर चीनच्या लष्करी सामर्थ्याकडून आमचा देश पादाक्रान्त व्हायला वेळ लागला नाही. काहीतरी सन्माननीय समेट होईल या आशेने आम्ही पेकिंगला शिष्टमंडळ पाठवले; पण त्यांना जरब दाखवून आमच्या सार्वभौमत्वाची वाट लावणाऱ्या करारावर त्यांच्या सक्तीने सह्या घेण्यात आल्या. हा जो करार आमच्यावर लादण्यात आला त्याला आमच्या सरकारने कधीच मंजुरी दिलेली नाही; पण आम्ही जर करार फेटाळला तर आणखी रक्तपात व संहार अटळ आहे ही गोष्ट आम्हाला सर्वांनाच स्पष्ट दिसत होती. तेव्हा ते घोर अरिष्ट टळावे म्हणून, करार अन्याय्य असूनही तो पाळण्याचा प्रयत्न मी व माझ्या सरकारने केला. पण कराराअन्वये दिलेले प्रत्येक वचन चिन्यांनी मात्र मोडले!

नंतर तिबेटमध्ये जी कराल शोकांतिका घडून आली तिचे तपशीलवार वृत्त कायदेपंडितांच्या आंतरराष्ट्रीय मंडळाने आपल्या अहवालात दिलेले आहेच या पुस्तकात मी तिबेटमधल्या आमच्या जीवनाचा आणि ते जीवन सांप्रत तरी संपुष्टात आणणाऱ्या अनेक दुःखदायी घटनांचा जास्त व्यक्तिगत वृत्तान्त देण्याचा प्रयत्न केला आहे. बुद्ध धर्माच्या काही मुलतत्त्वांचा आणि यातनांपासून सौख्याप्रत नेणाऱ्या धर्ममार्गाचाही मी निर्देश केलेला आहे. कारण आमचा धर्म ज्याला समजलेला नाही तो तिबेट समजू शकणार नाही.

अहिंसेच्या तत्त्वाचा मी पक्का अनुयायी आहे. या तत्त्वाचा प्रथम पुरस्कार भगवान बुद्धाने [ज्याच्या दिव्य दृष्टीला जीवनाच्या स्वरूपाचे ज्ञान झाले] आपल्या शिकवणीत केला; आणि वर्तमान युगात या तत्त्वाचे आचरण भारताचे महान संत नेते महात्मा गांधी यांनी केले. त्यामुळे, आपले गमावलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी साधन म्हणून शस्त्रबळाचा वापर करावा या गोष्टीला माझा प्रथमपासूनच तीव्र विरोध होता. चीनशी शांततामय व न्याय्य तडजोड घडवून आणता येईल की नाही याचा शोध घेण्यात ही अनेक वर्षे मी घालवली. अत्याचाराला उत्तेजन मिळू नये म्हणून स्वतःच्या प्रजेचा रोष पत्करूनही मी सतत प्रयत्न केले. जे लोक अजूनही तिबेट सरकारच्या हुकमतीखाली होते, त्यांनी चीनच्या जुलूमशाहीविरुद्ध शस्त्र उपसू नये म्हणून तीन वर्षे मी त्यांची मने वळविली. का? तर तो मार्ग अनीतीचा आहे आणि त्यात दोन्ही पक्षांकडे नाश होणार आहे अशी माझी श्रद्धा होती, म्हणून. पण आमच्या देशाच्या पूर्व भागात- जिथे आधीच आक्रमण झालेले होते तिथे- दळणवळणाच्या अभावी मला किंवा माझ्या सरकारला प्रभाव पाडता आला नाही आणि तिथली जनता चिन्यांविरुद्ध बंड करून उठली. आक्रमकांनी देशभर चालवलेले जुलूम अखेरीस असह्य झाले; माझ्या लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाला.

ही सर्व कहाणी कोणालाही समजेल अशा प्रकारे सांगण्याचा मी माझ्याकडून आटोकाट प्रयत्न केलेला आहे; आणि त्यावरून वाचकांनी आपापला काय तो निर्णय काढावा यातच मला समाधान आहे. पण एवढे मात्र मला पुनश्च इथे नमूद करावेसे वाटते, की चीनच्या महान जनतेविरुद्ध आजही आम्हा तिबेटी लोकांच्या मनात यत्किंचित द्वेषभाव नाही- त्या जनतेच्या वर्तमान प्रतिनिधींनी आम्हाला कितीही पाशवी पद्धतीने वागवले असले तरी आमची आकांक्षा एकच आहे- आमचे जीवन शांततेच्या मार्गाने आम्हाला जगायला मिळावे; चिन्यांसकट सर्व शेजाऱ्यांशी आम्हाला स्नेहभावाने राहायला मिळावे. पण एवढ्यासाठीच सहिष्णुता व सौम्यता यांचे ज्यांना ज्यांना म्हणून मोल वाटते अशा, जगातल्या सर्व स्त्रीपुरुषांना आम्हाला आज आवाहन करावे लागत आहे.

हे पुस्तक तयार करण्याच्या कामी ज्यांची ज्यांची मदत झाली त्या सर्वांचा, आणि विशेषकरून डेव्हिड हॉवर्थ यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल त्यांचा व सोनाम तोपगे काझी यांनी दुभाषी म्हणून प्रगट केलेल्या नैपुण्याबद्दल त्यांचा मला कृतज्ञतेने निर्देश करावासा वाटतो.

 

दलाई लामा


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि