30.00 58.00
Download Bookhungama App

महाभारतातील अलक्षित कथा - श्री. र. भिडे

Description:

लोकप्रिय कथां इतक्याच क्वचित त्याहूनही अधिक सुंदर अनेक कथा महाभारतात आहेत, परंतु त्यांच्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेलेले दिसत नाही आणि म्हणूनच हा महाभारतातील ‘अलक्षित कथां’चा प्रपंच आहे.महाभारत हा ग्रंथ म्हणजे कथांचा महार्णव. या ग्रंथातील अनेक कथा चिरायू झाल्या आहेत. शेकडो वर्षे या कथांनी वाचकांचे रंजन केले आहे. महाभारताची रचना मुख्यत: प्रश्नोत्तररूपी असल्याने गोष्टीवेल्हाळाला त्यात भरपूर अवसर आहे. एखादा मुद्दा श्रोत्यांच्या मनावर ठसवण्यास कथाकथन हे हमखास यशस्वी साधन असते. व्यासादिकांनी महाभारताचे भरजरी महावस्त्र विणताना कथांची पखरण अशी मार्मिकपणे केली आहे की त्यामुळे ग्रंथांचे आणि कथांचे आकर्षण वृद्धिंगत झाले आहे. प्रत्येक कथेला स्वतःचे असे वैशिष्ट्य आणि सौंदर्य आहेच, परंतु त्यांची योजना दृष्टान्त, रूपक, उपकथानकादींसाठी केल्याने या कथांना एक वेगळे परिमाण लाभले आहे.

महाभारतातील कथांत वैचित्र्य आणि वैविध्य आहे. धर्म, धर्मशास्त्र, नीती, नीतिशास्त्र, राजकारण, राज्यकारभार, राज्यशास्त्र, कौटुंबिक व सामाजिक जीवनपद्धती, स्त्री - पुरुष संबंध, मानवी स्वभावाच्या असंख्य छटा यांचे विलोभनीय दर्शन महाभारतात जागोजागी आढळते. या कथा वाचताना वाचकाला आपलेच प्रतिबिंब आपण पाहात आहोत असा वारंवार भास होतो. या कथांविषयीचे सर्वसामान्यांचे आकर्षण अद्यापही कमी झालेले नाही. त्यांची गोडी अवीट आहे.

परंतु महाभारताचा एकूण विस्तार अतिविशाल असल्याने संपूर्ण महाभारताचे वाचन फारसे केले जात नाही. केवळ काही थोडे अभ्यासकच संपूर्ण महाभारताचे सूक्ष्मपणे वाचन करतात. सर्वसामान्यांचे महाभारताचे वाचन हे संक्षिप्त आवृत्त्यांपुरतेच सीमित असते, त्यामुळे महाभारतातील अनेक सुंदर कथा वाचनात येत नाहीत. अशा कित्येक कथा संक्षिप्त आवृत्त्यांतून अभावानेच असतात. महाभारताचे वाचन करीत असता मला ही गोष्ट सातत्याने जाणवली. लोकप्रिय कथांइतक्याच क्वचित त्याहूनही अधिक सुंदर अनेक कथा महाभारतात आहेत, परंतु त्यांच्याकडे फारसे कुणाचे लक्ष गेलेले दिसत नाही. मला ज्या कथांनी आपल्या सौंदर्याने भुरळ घातली त्या अन्य वाचकांनाही निश्चितच आकर्षित करतील असे वाटले आणि म्हणूनच मी हा महाभारतातील ‘अलक्षित कथां’चा प्रपंच करीत आहे.

शाप-वर हे प्राचीन साहित्यातील एक विलोभनीय अंग आहे आणि मला त्याचे जबरदस्त आकर्षण आहे. त्यामुळे कथांची निवड करताना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे शाप-वर यांच्याशी संबंध असलेल्याच कथांना मी ह्या संग्रहात स्थान दिले आहे. शाप-वरांशी संबंध नसलेल्या अनेक सुंदर परंतु अलक्षित कथा महाभारतात निश्चितच आहेत, मात्र मी त्यांची निवड केलेली नाही. मी एक विशिष्ट मर्यादा आखून घेतल्याने मला त्या येथे अंतर्भूत करता आलेल्या नाहीत. निवड ही व्यक्तिनिष्ठ असल्याने मतभेदाला अवकाश असतो तसा तो येथेही आहे हे मी जाणून आहे.

काही ‘अलक्षित कथां’कडे वाचकांचे लक्ष वेधणे एवढाच माझा माफक उद्देश आहे.

श्री. र. भिडे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि