150.00 450.00
Download Bookhungama App

महाभारत : पहिला इतिहास - वि. ग. कानिटकर

Description:

महाभारतातील धर्मविचार मूल्यामूल्य विवेक हा संपूर्णपणे बुद्धिवादी वस्तुनिष्ठ दिसत नाही. परलोक, पुनर्जन्म, कर्मविपाक, अवतार, पाप-पुण्य, शाप-उःशाप, स्वर्ग-नरक इत्यादी गोष्टींची या ग्रंथात रेलचेल आढळते. तीर्थयात्रा, एकादशी आदी व्रते, उद्यापने, दाने, गाईचा महिमा हे सर्व यात येतात.प्रयोजन

महाभारताचा मुख्य विषय, भरतकुलाचा व विशेष करून कौरव-पांडवांचा इतिहास हाच आहे. भारतीय-युद्धाचा काल विद्वान संशोधकांनी इसवी सन पूर्व ३१०१ हा ठरवला आहे. इसवी सन पूर्व २५० वर्षे व्यासांनी हा इतिहास लिहिला असे अनुमान झालेले आहे. लहानपणापासून अनेक कथांच्या साखळीतून ऐकलेला, हा सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास, एकदा मूळ स्वरूपात संपूर्ण वाचावा असे मनात होते. मूळ संस्कृतात असलेला हा सुमारे १,००,००० श्लोकांचा इतिहास मुळातून वाचायचा, तर नुसते संस्कृत कळून उपयोग नाही, संस्कृत भाषेचे व्याकरणशुद्ध ज्ञान हवे, जे माझेपाशी नाही. परंतु अनेक नामवंत संस्कृत तज्ज्ञांनी, महाभारत हा ग्रंथ मराठी भाषेत उपलब्ध केलेला असल्याने, मी सुमारे पाच वर्षांपूर्वी हा इतिहास सलग-अखंडितपणे वाचायला सुरुवात केली. महाभारत ही वाङ्मयीन कृती एकापेक्षा अधिकांनी रचलेली असल्याने, काहीशी पाल्हाळिक व ओबडधोबड झालेली आहे. तरीही स्वामी विवेकानंदांनी वर्णन केल्याप्रमाणे, ‘हा एक विश्वकोश आहे. प्राचीन आर्यांचे जीवन आणि व्यावहारिक तत्त्वज्ञान यांचे उद्बोधक वर्णन यात आहे. मानवतेने अजूनही जिच्या स्थापनेची इच्छा बाळगावी, अशा उदात्त संस्कृतीचे चित्रण यात आहे.’ हा इतिहास सर्वसंग्राहक आहे. राजकीय इतिहास, धर्मशास्त्राचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास, सामाजिक इतिहास, भौगोलिक इतिहास, वांशिक इतिहास, भाषिक इतिहास, हा सर्वच यात ग्रंथित असल्याने, हा ग्रंथ अवाढव्य झालेला आहे. असे जरी असले तरी, गंभीर, उदात्त कल्पनांबरोबरच काही उथळ, पोरकट गोष्टी व पौराणिक भाकडकथा याची फोलपटेही यात विपुल आढळतात.

हिंदुधर्माचे जे प्रमाणग्रंथ मानले जातात, त्यात वेद, उपनिषदे, यांच्याप्रमाणेच, महाभारताचाही समावेश होतो. गीता ही महाभारतातच अवतरलेली आहे. महाभारतात असलेला धर्मविचार, हा संपूर्णपणे मानवी बुद्धिवादावर आधारलेला असाही यात प्रगट होतो. इतिहासाची बुद्धीला पटणारी उपपत्ती भीष्माचार्य सांगतात, ‘राज्यसंस्था उत्तम असली म्हणजे प्रगती होते, राजा चांगला नसला तर अवनती ठेवलेली आहे. समाजाच्या उत्कर्षाला व अपकर्षाला राज्यसंस्थाच संपूर्णपणे जबाबदार आहे. राजा कालस्य कारणम्.’

परंतु याचबरोबर दैवी उपपत्तीही महाभारतात सांगितलेली आहे. ‘ईश्वर अवतार घेतो व मानवांना आणि सज्जनांना मुक्त करतो. समाजाचे भवितव्य, अवतार, विभूती, अलौकिक शक्ती, काल, यावर अवलंबून असते. माणूस हा पराधीन आहे. आता अशी ही दैवी कारणमीमांसा, ज्यू, पारशी, ख्रिश्चन, मुसलमान, या सर्व इतर धर्मातही आहे. आज ख्रिश्चनांच्या मते येशू व मुसलमानांच्या मते महमंद हा शेवटचा अवतार! यापुढे अवतारांना त्यांच्या लेखी वाव नाही. अवतार संपलेले नाहीत ही हिंदूची भावना आहे.

म्हणूनच महाभारतातील धर्मविवेचनात अधूनमधून का होईना, स्पष्ट दिसणारा बुद्धिवाद आपल्याला चकित करतो. शांतिपर्वात सत्य, अहिंसा या निरपवाद वाटणाऱ्या तत्त्वांनाही मुरड घातलेली आढळते. असत्य वचन व हिंसा ही अनेक वेळा योग्य ठरते, ही गोष्ट मानवी अनुभवाच्या आधारे तर्कशुद्धपणे सांगितलेली आहे.

जगातील लोक-व्यवहार नीट चालावा म्हणून धर्माचा नियम केला आहे, हा व्यासांचा विचार महाभारत व्यापून आहे. मानवी जीवनाच्या मर्यादा महाभारतात स्पष्ट सांगितलेल्या आहेत. काहीतरी चमत्कार व्हावा, कोणीतरी प्रसन्न होऊन कृपा करावी व वाईटाचे एकदम चांगले व्हावे असा प्रकार आढळत नाही. सत्त्वपरीक्षा देऊन अपार हालअपेष्टा भोगूनही, अंती जे काही मिळते, ते सुखदायक ठरतेच असे होत नाही. व्यासांची इतिहास लेखनातील वस्तुनिष्ठताही सतत प्रत्ययाला येते. पतीच्या अनुमतीने किंवा पती अपत्यक्षम नसल्यास अथवा मृत असल्यास, विवाहित स्त्रीने, अन्य पुरुषांशी शरीरसंबंध करावा व अपत्यप्राप्ती करून घ्यावी, अशी जी तत्कालीन धर्ममान्य चाल भारतीय आर्यात महाभारत पूर्वकालात होती, त्याचा स्पष्ट निर्देश या इतिहासात आहे. पुत्रप्राप्तीच्या या मार्गाला नियोग म्हणत. नियोग म्हणजे आज्ञा, वडिलधाऱ्यांची आज्ञा. ही प्राप्त झाली तर स्त्रीला या नियोगमार्गाने, अपत्यप्राप्ती करून घेता येत असे. इतकेच नव्हे तर ते अपत्य आईच्याच वर्णाचे मानले जाईल, असे ठरवण्यात आले होते. लोक-व्यवहार चालू रहावा, राज्याला सातत्य रहावे, म्हणून राणीला पुत्र हवा. पुत्र प्राप्त करून घेण्याची आज्ञा राजमाता सत्यवती आपल्या सुनांना करते, व या मार्गाने धृतराष्ट्र आणि पांडू जन्माला येतात. धृतराष्ट्र व पांडू हे क्षत्रियच मानले जातात ते या नियोगसंबंधी नियमामुळे. एकदा अपत्यप्राप्ती झाली की हा परपुरुष संबंध तत्काळ संपत असे. पातिव्रत्य कल्पनेला तडा देणारा, नियोग चालीचा महाभारतातील स्पष्ट निर्देश पाहून व्यासांची इतिहास-लेखनातील तत्त्वनिष्ठता ध्यानात येते.

तरीही महाभारतातील धर्मविचार व मूल्यामूल्य विवेक हा संपूर्णपणे बुद्धिवादी व वस्तुनिष्ठ दिसत नाही. परलोक, पुनर्जन्म, कर्मविपाक, अवतार, पाप-पुण्य, शाप-उःशाप, स्वर्ग-नरक इत्यादी गोष्टींची या ग्रंथात रेलचेल आढळते. तीर्थयात्रा, एकादशी आदी व्रते, उद्यापने, दाने, गाईचा महिमा हे सर्व यात येतात.

महाभारताचे हे सर्वसमावेशकपणच कदाचित् त्याच्या जागतिक मोहिनीचे रहस्य नसेल ना? कारण निखळ बुद्धिवाद हा धर्माचा आधार नसतो. धर्माचा आधार श्रद्धा, आणि श्रद्धा विविध प्रकारच्या असल्याने, त्यात कल्पनेचा अतर्क्य खेळ भरपूर असतो. अशा या खेळाचे आकर्षण सर्वच मानव समूहात दिसून येते.

महाभारताची लोकप्रियता म्हणूनच हिंदुस्थानच्या चतुःसीमेपुरती मर्यादित नाही. इसवी सनापूर्वीपासून साधुसंतांनी, विद्वानांनी, कवींनी, नाटककारांनी या इतिहासातून संदर्भ घेतले आहेत. इसवी सनाच्या सहाव्या शतकातच तुर्क व मंगोलियन कवींनी, महाभारतातील प्रसंगांची आपापल्या भाषेत रूपांतरे केलेली आढळतात. दहाव्या शतकात जावा बेटात या ग्रंथाचे संपूर्ण भाषांतर उपलब्ध केले गेले. अकबराचा मंत्री अबुफजल याने महाभारताचे फारसी भाषांतर केले. चालू शतकात अमेरिकेत व रशियात या ग्रंथाचा ओढा सतत वाढतो आहे.

असा हा आपला पहिला इतिहास, रसहानी न करता शक्य तो पाल्हाळ कमी करून अनावश्यक संदर्भ गाळून, निवदेन करण्याचा मोह अनेकांना होतो, होत राहाणार. मराठीत अशी पुस्तके झाली आहेत. इंग्रजी भाषेत राजगोपालचारी, रंगराव दिवाकर, कन्हयालाल मुन्शी, स्वामी चिद्भवानंद अशा मान्यवरांनी अशी पुस्तके लिहिली आहेत. महाभारतकथेचा आटोपशीर असा आस्वाद देऊ शकणारे पुस्तक तयार करण्याचा मोह, मलाही झाला. कथानकाचा प्रवाह ओघवता राहून मूळ ग्रंथाच्या सर्वसमावेशक स्वरूपाचाही वाचकांना विसर पडू नये, ही माझी या लेखनामागील भूमिका आहे. मी अभ्यासक आहे. पंडित नाही. पूर्वजांनी लिहिलेले जे मी वाचले तेच मी पुनः शब्दबद्ध केले आहे. इतके सांगितल्यावर वाचकांनी आता हे ठरवावे की पुस्तक बाजूला ठेवायचे की पुढची पाने वाचायची.

 

वि. . कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि