60 144

कथा कल्पतरू ०९ - दा. सा. यंदे

Description:

कथा कल्पतरूची १४ स्तबके/भाग वाचून भाविक लोकांना आनंद तर होईलच. त्याचबरोबर मनाची करमणूक होऊन आध्यात्मिक बोधही होईल, वेद, पुराणे, रामायण, महाभारत यातील कथा या कल्पतरूत आहेत.कथा कल्पतरू १४ स्तबके/भाग ३ खंडांची प्रस्तावना कथा कल्पतरूची १४ स्तबके/भाग वाचून भाविक लोकांना आनंद तर होईलच. त्याचबरोबर मनाची करमणूक होऊन आध्यात्मिक बोधही होईल, वेद, पुराणे, रामायण, महाभारत यातील कथा या कल्पतरूत आहेत. पण त्याबरोबरच धर्म विचार व व्रतवैकल्ये यांचेही ज्ञान होण्यासारखे आहे. या कथा वाचल्याने योग्य विचारातून उद्‌भवणारी धर्मश्रद्धाही वाचकाच्या मनात निर्माण होणार आहे व त्या धर्मश्रद्धेचीच उणीव आज भासत आहे. इतिहासकाळात या कथा एक वाचक वाचायचा व हजारो श्रोते ऐकायचे. ती पद्धत नाहीशी होत चालल्याने आता वाचनातूनच बहुश्रुतपणा येणार आहे. वेद, पुराणे, महाभारत वगैरे सर्व प्राचीन ग्रंथीचे साररूप असलेल्या कथाकल्पतरू या ओवीबद्ध ग्रंथाचे सरळ व सोप्या गद्यरूपात समग्र ग्रंथ येथे सादर केला आहे. कथाकल्पतरू हा साथ कृष्ण याज्ञवल्की आणि कवी मधुकर हा त्यांचा शिष्य या दोघांनी निम्मा-निम्मा म्हणजे ७-७ स्तबके लिहिला आहे. संपूर्ण ग्रंथाची ओवीसंख्या ३८७६८ असून त्या सर्व ओव्याचे गद्य भाषांतर येथे दिले आहे. ऐकलेल्या व वाचलेल्या सर्व कथा एकत्रित करून हा महाग्रंथ सिद्ध केला आहे. या दोन्ही लेखकांनी संस्कृत ग्रंथाचा अभ्यास केला होताच, त्याबरोबर त्याकाळी प्राकृतात म्हणजे मराठीत व तेलगू भाषेत असलेले अनेक ग्रंथ मिळून त्यातील कथांचा समावेश कथाकल्पतरूत केला आहे. हा ग्रंथ फार विस्तृत असून त्यामध्ये वेद, उपनिषदे, पुराणे यातील कथा, धर्मज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, सृष्टी चमत्कार असे अनेक प्रकार आढळतात. २१ व्या शतकाच्या या नव्या समाजात विज्ञानाचा प्रसार खूप झाला आहे. त्यांना पुराणकथा या भाकडकथा वाटतील. परंतु या प्राचीन ग्रंथात हजारो वर्षांचा सामाजिक इतिहास भरलेला आहे. पुराणकथांतील चमत्कारांप्रमाणे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज याच्या चरित्रातही चमत्कार घडलेले दाखवण्यात येतात. मानवी समाजाची हजारो वर्षे लेखनकलेशिवाय गेलेली आहेत. मानवजातीचा ज्ञात व लिखित इतिहास चार-पाच हजार वर्षांपुरताच मर्यादित आहे. या कथाकल्पतरूत दिलेल्या ७३९ कथांपैकी अनेक कथा मानवी समाजात हजारो वर्षे आढळून येतात, माणूस बोलू-चालू लागला. त्याला आता ३५ लाख वर्षे झाली आहेत. मानव सुधारित ग्रामामध्ये राहण्यापूर्वी वनातच राहात होता, पण त्या वन्य-मानवात सुद्धा कथाकथक होते व लिपीचा शोध लागला तरी या कथाकथनाची परंपरा हजारो वर्षे चालू राहिली. त्याच कथा सर्व भारतीय प्राचीन साहित्यात लिखित स्वरूपात एकत्रित केल्या गेल्या. यातील अनेक कथांचे मूळ हजारो वर्ष मागे नेता येते. पक्षी-प्राणी बोलतात असा पक्का विश्वास वन्य मानवाला वाटत असे. शिवाय मानवी मनाला अद्‌भुताचे वेड आहेच. म्हणून कथाकल्पतरूतील या कथांत प्राचीन इतिहास संग्रहीत झाला आहे. हे मत ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी कथा-कल्पतरू आणि कथासरित्सागर या दोन ग्रंथांतील कथांच्या आधारे भारतीय युद्धापासून ते शकारंभापर्यंतच्या चार-पाच हजार वर्षांचा इतिहास तयार केला आहे व तो संपूर्ण इतिहास आपल्या प्राचीन महाराष्ट्र या ७००-८०० पानी ग्रंथात लिहून ठेवला आहे. फार जुन्या काळच्या इतिहासाची साधने मुळीच मिळत नाहीत. त्यामुळे लेणी वगैरे शिल्पे आणि लोकसाहित्यातील पारंपरिक कथा यातूनच त्या प्राचीन इतिहासाचे दुवे जोडावे लागतात. या दृष्टीने कथाकल्पतरू या ग्रंथाचे महत्त्व अपार आहे. आधुनिक मानवशास्त्रज्ञ शिल्लक राहिलेल्या वन्य मानव समाजाकडून त्यांच्या पुराणकथा व रूढी, परंपरा गोळा करतात व त्यांचा ऐतिहासिक अर्थ लावतात. कथा कल्पतरूमध्ये अनेक वेळा यज्ञ व कर्मकांडे यांचा उल्लेख येतो. पण असा यज्ञ व अशी कर्मकांडे जगभरच्या मानवी समाजात आढळतात. बायबलच्या 'जुना करार' (ओल्ड टेस्टामेंट) या ग्रंथात यज्ञ, यज्ञातील बलिदान यांचे अनेकवेळा उल्लेख आलेले आहेत. भारतातील यज्ञात अश्वमेध म्हणजे अश्व बळी देत असत तर जपानमधील ऐनू जमातीत अस्वलयज्ञ २० व्या शतकापर्यंत होत होता. अमेरिकेतील रेड इंडियनसुद्धा समाजाच्या कल्याणासाठी लाकडे पेटवून एक प्रकारचा यज्ञच करीत असत; समग्र मानवजातीचा इतिहास आदीकालापासून अजून लिहिला गेलेला नाही. त्या प्राचीन इतिहासाची साधने म्हणून ऑस्ट्रेलियातील आदिवासी जपानमधील ऐनू जमात, उत्तरेकडील एस्किमो समाज यांच्यात प्रचलित असलेल्या पुराणकथा प्रयत्नपूर्वक गोळा करण्याचा प्रयत्न मानववंशशास्त्रज्ञ करीत आहेत. भारतात मात्र अशा सर्व कथा कथाकल्पतरूसारख्या महाग्रंथात पूर्वीच एकत्र केल्या आहेत, हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे. या कथांतील चमत्कार, शाप, वरदान वगैरे गोष्टींचा अन्वयार्थ चालू २१ व्या शतकाशी संबंध ठेवून लावता कामा नये. कारण या कथा जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा तत्कालीन प्राचीन समाजाला या सर्व गोष्टी खऱ्या वाटत असत, आफ्रिकेतल्या कलहरीच्या वाळवंटात २० व्या शतकापर्यंत अस्तित्वात राहिलेल्या प्राचीन वन्यसमाजात पक्षी प्राणी त्यांच्या भाषेत बोलतात यावर सर्व समाजाचा पूर्ण विश्वास असल्याचे मानववंशशास्त्रज्ञांना आढळले आहे. म्हणून मानववंशशास्त्राच्या नजरेनेच या कथांकडे पाहिले म्हणजे त्याचे महत्त्व समजून येणार आहे. या कथेतून धर्मज्ञान व त्यातील तत्त्वज्ञान याचा परिचय वाचकांना होण्यासारखा आहे. म्हणून आधुनिक विचारसरणीलाही या ग्रंथाचे महत्त्व पटण्यासारखे आहे. ज्या लोकांना चिकित्सकदृष्टीने विचार करायचा नसेल त्यांनाही या कथा मनोरंजक वाटतील. भाविकांना तर कथाकल्पतरू हा ग्रंथ अमृताप्रमाणे शांतिदायक व ईश्वर भक्तीची प्रेरणा देणारा स्फूर्तिदायक ठरेल. १४ वा सर्ग संपल्यानंतर उपसंहारात कथाकल्पतरूचे महत्त्व विस्ताराने सांगितले आहे ते जिज्ञासू वाचकानी जरुर वाचावे. - ह. अ. भावे


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)