60.00 116.00
Download Bookhungama App

कर्मयोगी धन्वंतरी - डॉ. सौ. मंदाकिनी सुधाकर पानसरे, डॉ. विजया मधुकर कर्वे

Description:

डॉ. व्यंकटेश शिवराम केळकर यांचे चरित्र.  दादा हे समाजाभिमुख होते. दारिद्र्याचे चटके त्यांनी सहन केले होते. स्वतःच्या मामांसारख्या सज्जनांनी त्यांना केलेली अमूल्य मदत त्यांनी मनापासून जाणली होती. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने रुग्णांचे होणारे हाल त्यांनी पाहिले होते आणि म्हणून त्यांचा वैद्यकीय व्यवसाय त्यांनी सांगोल्यासारख्या खेड्यात करायचा ठरवून तो तेथे चालू ठेवला व तोच उदात्त व्यवसाय त्यांच्या कर्तव्यदक्ष, मुलाने, कर्तबगार सुनेने, एवढेच नाही तर त्याहीपुढील पिढीने म्हणजे नातू व नातसुनेने त्याच भावनेने नुसताच चालू ठेवला नाही तर शाखा-प्रशाखांनी वाढवला आहे.

दादा समाजाचे ऋण मानणारे होते. समाजासाठी जगण्याचे भान त्यांना होते. महात्मा गांधीजींची काही मते त्यांच्यातील सैनिकाला पटत नव्हती, परंतु त्या थोर नेत्याबद्दल त्यांना आदर होता. ‘खेड्यामध्ये जा. खेडी सुधारतील तर भारत सुधारेल,’ हा महात्माजींचा संदेश त्यांनी अक्षरशः अंमलात आणला होता. त्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीत असताना ज्या गावातल्या दवाखान्याच्या सुधारणेसाठी अहोरात्र प्रयत्न केले होते, तीच त्यांनी आपली कर्मभूमी मानली. अशिक्षित समाज, दुष्काळी गाव, शाळा-कॉलेजची सोय नाही अशा सर्व बिकट परिस्थितीतही त्यांनी सांगोल्याची निवड केली. त्यांच्या समोर अर्थार्जनाबरोबर गावाला सुधारण्याचे, गावकऱ्यांचे गैरसमज दूर करून योग्य वैद्यकीय मदत देण्याचे आव्हान होते. आपल्या निधड्या छातीने, कणखर मनाने व प्रगल्भ बुद्धीने त्यांनी ते स्वीकारले, पेलले आणि त्यात ते यशस्वी झाले. उत्तम व्यवहारे कुणालाही न लुबाडता त्यांनी धन जोडले आणि तितकेच निःसंग मनाने उदास विचारे वाटूनही टाकले.

 

सांगोल्याच्या सामाजिक जीवनातही त्यांनी आपले तन-मन-धन खर्चिले. त्यांना प्रसिद्धीची हाव नव्हती. ते कधीही सवंग लोकप्रियतेच्या मागे नव्हते. त्यांच्या परखड आणि प्रांजळ मतांमुळे ती त्यांना मिळालीही नसती. परंतु ते तिथे लोकनेता झाले. सांगोल्यातील गुणी माणसांना त्यांनी राजकारणात व लोककारणात पुढे आणले. जरूर तेव्हाच आपली परखड मते, कदाचित कधीतरी तिखटही वाटतील अशी मांडली. दुष्काळी प्रदेशातील शेतीचे तुटपुंजे उत्पन्न जाणून, सूतगिरणी उभारण्यात पुढाकार घेऊन, अनेकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला. दुष्काळात आपली पाण्याची विहीर सर्वांना वापरण्यास मुभा दिली. अडाणी शेतकऱ्यांना कायद्याचे भान आणि ज्ञान दिले, तसेच त्या ज्ञानाचा त्यांना फायदाही करून दिला. अनेकांना त्यांनी अनेक प्रकारे उपकृत केले, पण त्याची जाणीवही कधी कुणाला करून दिली नाही.

अशा या लोकविलक्षण व्यक्तिमत्त्वाचा परिचय लोकांना व्हावा, खेड्यातही उत्तम सुधारक कसा होतो याचा प्रत्यय सर्वांना यावा, खेड्यातील समाजकार्य किती अवघड पण अजूनही जरूरीचे आहे याची जाणीव व्हावी, म्हणून आम्ही या पुस्तकाचा प्रपंच थाटला.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि