Id SKU Name Cover Mp3
Karkhandar Kasa Zalo?


100.00 350.00
Download Bookhungama App

कारखानदार कसा झालो? - उद्योगरत्न वि. रा. वेलणकर

Description:

अडचण वा संकट आले की ते ज्ञान देऊन जाते”, हे श्री. दादासाहेब यांचे आवडते सूत्र आहे. म्हणून आजवर आलेल्या अनेक आपत्तीशी झगडा करून महान अग्निदिव्यातून ते सहज पार पडले; एखादा सामान्य कारखानदार दिङ्मूढ कर्तव्यपराङ्मुख झाला असता; पण या घोर प्रसंगी स्थिरचित्त राहून कारखान्याचे पुनरुज्जीवन त्यांनी केले यावरून त्यांची थोर योग्यता प्रत्ययास येते. या आत्मचरित्राचा भारतीय तरुणांनी उदयोन्मुख कारखानदारांनी सूक्ष्म अभ्यास करावा अशी या पुस्तकाची थोर योग्यता आहेप्रस्तावना

दयाळू वाचकहो!

आपल्या करकमलामध्ये माझ्या जीवनवृत्तांताचे हे पुस्तक ठेवताना मला अत्यानंद होत आहे. या वृत्तांताच्या कल्पनेला प्रारंभ कधीपासुन झाला तेहि पाहण्याजोगे आहे. १९०८ साली अवघ्या ५०० रु. भांडवलवर तीन लाकडी हातमागांचे स्वरूपात श्री गजानन मिलचा जन्म झाला. त्यानंतर अनेक संकटांना तोंड देत देत यशाचे मार्गाला लागून २० यांत्रिक मागापर्यंत ही गिरणी वाढून स्वतःच्या इमारतीत १९२५ साली स्थानापन्न झाली व मला त्याकामी यश मिळाले.

त्यावेळेपासून माझे अनेक स्नेही माझे आत्मवृत्त मी लिहावे असे सुचवू लागले. आपला वृत्तांत स्वतः लिहिणे म्हणजे आत्मश्लाघेचे पातक करणे असे त्यावेळी मला वाटे. मनुष्य जर उत्तम असेल तर त्याच्या मृत्यू नंतर लोक आपोआपच त्याचे चरित्र लिहितात व हाच खरा मार्ग, अशी माझी समजूत त्यावेळी होती. पण त्यानंतर अनेकांचे जीवन-वृत्तांत प्रसिद्ध झाले. आपल्या जीवनात ज्या इष्टानिष्ट गोष्टी घडल्या, त्यावेळी आपण कसे वागलो, ते तरुणांनी वाचल्यामुळे त्यांचे ज्ञानात भरीव भर पडते; तेव्हा हे परोपकाराचे काम आहे व आपल्या जन्मात आपणास आलेले अमोल अनुभव अगर आपणास माहीत असलेली उत्तमोत्तम गुणकारी औषधे लोकांना ज्ञात न करता मरणे, म्हणजे जनतेचे अज्ञान वाढविण्याचे पाप करण्याजोगी गोष्ट आहे. अशाच गोष्टी आजवर आपल्या पूर्वजांचे हातून घडल्यामुळे भारत मागे पडला; पण या उलट पाश्चिमात्यांनी आपले अनुभव आत्मवृत्तद्वारा जनतेला सांगितल्यामुळे ते लोक पुढे गेले. याहि गोष्टी हळू हळू मला पटू लागल्या.

आत्मवृत्त लिहावे हे तत्त्व जरी पटले, तरी तसे करण्याला माझी योग्यता आहे, असे मला वाटेना. याचे कारण माझ्या व्यक्तिपुरता मी यशस्वी असलो तरी कारखान्यालामिलहे मोठे नांव प्रथमपासून असल्याने व भारतातल्या प्रचंड गिरण्यांच्या वर्गात मी बसलो असल्याने, त्यांचा प्रचंड व्याप, त्यांचे प्रचंड साहस व त्यांनी  मिळविलेले प्रचंड यश पाहिले म्हणजे आपली ४०-५० मागांची गिरणी, मोठ्या गिरण्यांचे कडोसरीला बसेल येवढी बारकी असल्याने, या बाहुलीच्या लग्नाची वरात, आपण गावातील मोठ्या सडकेने काढू लागलो तर ते कसे शोभेल? निव्वळ वृत्तांताच्या खर्चापुरते पैसे खिशात असणाऱ्या प्रत्येकाने तो लिहिणे हे न्यायाचे ठरेल का? हाच प्रश्न मनात येऊन वृत्तांत लिहिण्याकडे हात वळेना.

पुढे १९३५ साली जपानचा प्रवास झाला; त्यानंतर मागांची संख्याहि वाढत वाढत ३०० वर गेली. १९४० साली सूतकताईचे खाते सुरू होऊन कापसापासून कापडाच्या गाठी बांधीपर्यंत सर्व कामे गिरणीत होऊ लागल्यामुळे कारखान्याला मिल हे नांवहि शोभू लागले व पूर्णत्वहि बरेच आले. नंतर १९४७ साली सुवर्णतुलेचे महादान घडले व वयहि ६० चे पुढे गेले व मग आत्मवृत्त लिहावे असा विचार नक्की झाला. पण त्यात किती अडचणी आल्या ते पाहा.

मी आजवर जरी ४-५ पुस्तके लिहिली तथापि आत्मवृत्त लिहिण्याची गोष्ट दिसते तशी सोपी तर नाहीच पण उलट फार अवघड आहे. कसे ते पाहा!

()     आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी नानाक्षेत्रात घडतात, व अनेक व्यक्तींचे बरे वाईट संबंध येतात, त्याकडे सरन्यायाधीशाच्या निःपक्षपाती वृत्तीने पाहाण्याची कला साधली पाहिजे व सत्य तेच दिले पाहिजे. तसे नसेल तर अपराध एकाचा असून त्याचा दोष दुसऱ्याला देण्याची वेळ यावयाची.

()     सरन्यायाधीशाकडे भक्कम पुरावा असतो म्हणून त्यांना नागडे सत्य दाखविणे सोपे जाते पण आत्मवृत्तवाल्याला नागडे सत्यहि दाखविता येत नाही कारण तसे दाखविले तर कोर्ट कचेऱ्या होण्याची वेळ यावयाची म्हणून सावरून सावरून लिहावे लागते. आणि अशा कचाट्यात सापडल्याने लेखन अवघड होऊन बसते.

()     कामाचा व्याप फार झाल्याने फार पूर्वीच्या आठवणी शोधून काढणे म्हणजे जमीन खोदून वस्तू प्राप्त करून घेण्यासारखे अवघड काम आहे.

()     गत गोष्टी आठवल्या व त्या अगदी सत्य असल्या तरी तरुण वाचकांना हितकर कोणत्या त्याच दिल्या पाहिजेत, व तसे झाले तरच  पुस्तकास उपयुक्तता प्राप्त होईल.

()     वृत्तांत वाचताना वाचकांना शीण न यावा, उलट वाचताना उत्साह वाटावा यासाठी, तो अनेक छोट्या छोट्या १९५ भागामध्ये दिला असून त्यातील कोणताहि अंक वाचला की एक पुरी कल्पना वाचकाचे पदरी पडावी असे केले पाहिजे.

()     शास्त्रीय विषय पुष्कळ द्यावा तर वाचक कंटाळतील. बरे अजिबात न दिला तर मग वृत्तांताचे वैशिष्ट्यच नाहीसे होईल यासाठी लोकांना सहज समजावा असा सोपा व थोडा व तोहि जागोजागी असा दिला तरच बरे म्हणून तसाच देणेचे ठरून लेखन केले पाहिजे.

()     वृत्तांताला मोठ्या निबंधाचे स्वरूप दिल्यास कंटाळवाणे वाटते. तो सुरस व्हावा यासाठी वक्ता व श्रोत्याची जोडणी केली पाहिजे.

()     शास्त्रीय ज्ञान देताना आमचा मनोदय वाचकांना कळावा म्हणून बोधचित्रे देण्याचे ठरले, व मग सर्वच व्यक्तींची चित्रे देऊन सौंदर्य वाढवावे व अनेक अनुभवहि द्यावेत असे ठरवले.

()     वृत्तांत किती पृष्ठांचा व्हावा? १००-२०० पृष्ठांचा केल्यास जमेल का? याची शहानिशा फार झाली व अखेर चित्रांचे ठसे व माहिती बरीच असल्याने ७०० पानापर्यंत गेला तरी करावा असे ठरून तसे लेखन करीत जावे असे ठरले.

(१०)   या पुस्तकाला नांव काय द्यावे? असा प्रश्न निर्माण झाला तेव्हां मुळची व्यापारी परंपरा नसताना टक्के टोणपे खाऊन व धके चपेटे सोसूनकारखानदार कसा झालो?” हेच नाव सर्वांना आवडले. शिवाय ते जगात वागावे कसे? यासारखे प्रश्नार्थक व तीन शब्दाचे असल्याने तेच ठेवावे असे ठरले.

(११)   इतर भाषिकांना मराठी भाषा सोपी वाटावी यासाठी अनुच्चारित अनुस्वाराचे लोढणे जर मराठी भाषेच्या गळ्यातील काढले तर पुष्कळ आराम होईल ही आमची कल्पना असल्याने या सबंध ग्रंथात अनुच्चारित अनुस्वार टाळले आहेत. या बद्दल दुमत असलेल्या वाचकांनी क्षमा करावी असे मी विनवितो.

दयाळू वाचकहो!

इतक्या गोष्टी ध्यानात घेऊन ग्रंथरचना करावी लागली.

लेखनाचा सराव नसावा व लेखनाची इच्छा मात्र असावी अशांचे लेखन योग्य शब्द न आठवल्यामुळे किती वेळा चुकत असेल याची कल्पना सराइत लेखकाला येणार नाही. तथापिइच्छा तेथे फलया न्यायाने या ग्रंथाची रचना केली व वृत्तांत तीनदा लिहून काढला तेव्हा जमला.

पुस्तक लिहून झाल्यावर आनंद झाला. आत्मवृत्ताचे काम असल्यामुळे ते चांगले व्हावे या इच्छेने कागद उत्तम आणला व छपाई उत्तम व्हावी यादृष्टीने पाहू लागताच येथील प्रभा प्रेसचे मालक श्री. . . महाबळ यांनी उत्सुकता दर्शविली व १६ पानांचे फॉर्मास वाजवी दरापेक्षा २ रुपये जास्त दिल्यास काम फक्कड करून देईन असे म्हणाले. चांगले काम व्हावे असे आम्हासहि वाटत असल्यानें आम्ही जादा भाव मान्य केला व पैसेहि आगाऊ मागतील तसे आजवर देत आलो. या प्रमाणे काम चालू होऊन १९५३ अखेर प्रकाशनाची शक्यता दिसू लागली. पण ते पुस्तकाच्या सर्व प्रतींचे बायडिंगचे काम माझ्याकडे द्याल तरच छापलेली मुद्रिते देईन असा हेका धरून बसले. त्यानंतर १-२ महिने आम्ही गप्प  बसलो. गोड बोलूनहि पाहिले. पण ते मुद्रिते परत करीनात. या कारणास्तव या ग्रंथाचे प्रकाशन २ वर्षे लांबवणे भाग पडले.

मग नाईलाजाने निवाड्यासाठी कोर्टात काम दिले. शेकडा ९० वेळा पैसा हे कलहाचे कारण असते. पण महाबळांचे बाबीत जादा भाव व पैसे आगाऊ देऊनहि त्यांनी  बांधा घातला:-

()     पैसे आगाऊ व जादा भाव घेऊनहि मुद्रिते अडकवून ठेवणे.

()     नवे बायडिंगचे काम मिळविण्यासाठी विनंति करून ते मिळविण्या ऐवजी ग्राहकाला अडचणीत गाठून ते मिळवू पाहाणे.

()     ग्राहकाचा पैसा हातात आल्यावर, प्रकाशन लवकर व्हावे या दुःखात ग्राहक असता ते बघत बसण्याची वृत्ती असणे, असल्या सगळ्या गोष्टी सिद्ध झाल्यामुळेआम्हास मुद्रिते त्वरीत द्यावीत व आमचा सर्व कोर्टखर्च महाबळांनी द्यावाया अर्थाचा कोर्टाचा हुकूम १९५५ अखेर झाला. त्यामुळे २ वर्षे प्रकाशनाला उशीर झाला. पुस्तक छापल्यावर छापखानेवाल्याचे आभार मानण्याची प्रथा असते पण आभार मानण्या ऐवजी हा मजकूर आम्हाला लिहावा लागावा हे आमचे दुर्दैव होय.

पुस्तकाच्या शेवटचे थोडेसे काम, प्रस्तावना व अनुक्रमणिका दुसऱ्या छापखान्यातून छापून घेतल्यावर मग हे काम पुरे झाले.

या कामी, मुद्रिते वाचून, मी केलेली ग्रंथाची मांडणी चांगली आहे असे प्रोत्साहन देण्याचे काम आमचे फार जुने स्नेही श्री. बाबूराव गोखले, माजी संपादक, केसरी, यांनी करुन, मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे आमच्या कार्याचे कौतुक करणारे डॉक्टरसाहेब श्री. ना. भि. परुळेकर, संपादक, सकाळ, यांनीप्रारंभ जसा सुंदर तसाच शेवटहि गमतीदार कराअशीहि सूचना केली व प्रोत्साहन दिले. त्यांचा मी ऋणी आहे.

माझ्या लेखनाचे स्पष्ट लेखन करणे व मुद्रिते तपासणे ही कार्ये चि. वि. व्यं. तथा भाऊराव वैद्य B.A. माजी व्यवस्थापक श्रीगजानन मिल्स यांनी आनंदाने केले. त्याच प्रमाणे श्री. शिवराम यशवंत वाळिंबे B.A. . मॅनेजर श्री. . मिल्स यांनी बारक्या बारक्या सुधारणा सुचवून मदत केली. सन्आर्ट स्टुडिओचे मालक श्री. जप्तीवाले यांनी ठसे तत्परतेने करून दिल्याबद्दल या सर्वांचे अंतःकरणपूर्वक आभार मानणे माझे कर्तव्यच आहे.

शेवटच्या प्रकरणात लक्ष्मीच्या आरतीचा मजकूर आम्ही दिल्यावर त्या मजकुराला शोभेलशी काव्यरचना करून दिल्याबद्दल आमचे स्नेही, धेनुदास डोळेमास्तर यांचेही मी आभार मानतो. या आरतीचा सारांश ध्यानी घेऊन लक्षुमबाईला मराठे आळवू लागले तर सधनता नक्की प्राप्त होईल.

या ग्रंथांतील माहितीमुळे, महाराष्ट्रीय तरुणांना किती प्रमाणात लाभ होईल हे आज सांगता येणार नाही. पण लेखकाला मात्र पहिल्या पंचविशीतल्या घटना वाचताना बालपणातील तो आनंद जणू आपण भोगून राहिलो आहोत अशा संवेदना मनाला होऊन डोळ्यातून आनंदाश्रूंचा सडा पडतो हा लाभ काय थोडा आहे?

महाराष्ट्रीय व्यापारी व कारखानदारांना माझे अनुभव समजल्यामुळे त्यांचे अडथळे टळावे व त्यांना  सुख व्हावे याच एका प्रबल इच्छेन हे श्रम केले आहेत व आत्मवृत्त दिले आहे. तथापि त्यामुळे काही व्यक्तींचे मन दुखावले असे त्यांना  वाटल्यास त्यांनी  मला क्षमा करावी अशी विनंति आहे.

ज्या कार्याच्या वाटाघाटीला प्रारंभ ३० वर्षांपूर्वी झाला व प्रत्यक्ष कार्याला प्रारंभ ७-८ वर्षापूर्वी झाला ते कार्य ईश्वरकृपेने माझ्या वयाच्या ७० वे वर्षी पुरे होत आहे. तोच दयाळू भगवान, या पुस्तकाचे वाचनाने, महाराष्ट्रीय तरुणांना, भाग्यवान, श्रीमान, कीर्तिवान व पराक्रमी बनवो असे अभिष्ट चिंतून ही प्रस्तावना पुरी करतो.

. नम्र सेवक

 

वि. रा. वेलणकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि