60 140
Download Bookhungama App

खजिन्याचा शोध - भा.रा.भागवत

Description:

गुप्त खजिन्याचे आकर्षण ज्याला नाही असा बाल-कुमार वाचक सापडणे दुर्मिळ! अशा साहसवीरांसाठी खास भा. रा. भागवत लिखित "खजिन्याचा शोध".खजिन्याचे रहस्य “ऐका मुलांनो! वाचून दाखवतो. आपल्या घराण्याच्या भाग्यलक्ष्मीची सनद आहे ही!” सर्जेरावांनी मोठ्या नाटकी सुरात हे शब्द उच्चारले खरे, पण त्या वेळी त्यांचा कंठ सदगतीत झाला होता आणि डोळ्यांना पाणी येण्याचे तेवढे बाकी राहिले होते. कारण ज्यासाठी वर्षांनुवर्षे त्यांनी जिवाचे रान केले; हेटाळणीची, दोषारोपाची पर्वा केली नाही आणि ज्यावर अंधश्रद्धा ठेवून त्यांनी अफाट कर्ज करून ठेवले, ते महत्त्वाचे कागद आज त्याच्या हातांत पडले होते. त्या कागदांमुळे रहस्याचा पूर्ण उलगडा जरी झाला नव्हता, तरी त्यावर थोडा प्रकाश पडला होता हे नक्की. दंतकथेची आता सत्यकथा बनली होती. नुसतेच जे पुसट प्रतिबिंब होते, त्याची निगेटिव्ह तयार झाली होती. आता तिच्यावर संस्कार करून तिची पॉझिटिव्ह प्लेट बनवणे हे त्यांच्या हुशारीला एक आव्हान होते. दरम्यान क्षेत्र मर्यादित झाले हे काय थोडे झाले? सर्जेरावांनी कुठेतरी वाचलेले Elimination is half Culmination हे सुभाषित त्यांना आठवले. त्यांचे हात आनंदातिशयाने कापू लागले. किती मळके नि जीर्ण होते ते कागद! जरा धक्का लागला तर भुकटी होईल की काय अशी त्यांना भीती वाटत होती. ते वाचून दाखवताना त्यांचे मन भावनावश झाले नसते तरच नवल! सर्जेरावांच्या दोघा मुलांवर मात्र या नाटकी प्रसंगाने फार वेगवेगळा परिणाम केला होता. मोठा पदवीधर मुलगा जो अरुण त्याने हे प्रास्ताविक भाष्य ऐकून ओठ मुडपले आणि उपहासाचा ‘हूं:’ असा उद्गार काढून वडिलांकडे पाठ फिरवली. जणू काही त्याला या विषयात काहीसुद्धा गम्य नव्हते. उलट धाकटा चौदा वर्षांचा मुलगा उदय त्यांच्या प्रस्तावनेने ओढला जाऊन बैठकीवर त्यांच्या शेजारी जाऊन बसला. त्याने उत्सुकतेने वडिलांच्या हातांतल्या कागदाकडे पाहिले. पण त्या जुन्या पद्धतीच्या धावत्या मोडी लिपीतले अक्षरही त्याला लागण्यासारखे नसल्यामुळे आपले काळेभोर डोळे वडिलांच्या मुखाकडे लावून तो अधीरपणे म्हणाला, “वाचा ना बाबा, लवकर!’’


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि