गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या साहित्यविषयक लेखनातील काही निवडक लेखांचा हा संग्रह.
गेल्या काही वर्षांत लिहिलेल्या साहित्यविषयक लेखनातील काही निवडक लेखांचा हा संग्रह.
या संग्रहातील लेखांची निवड, मांडणी व पुस्तकरूपाने प्रकाशनाची व्यवस्था माझे मॉडर्न महाविद्यालयातील सहकारी व जिव्हाळ्याचे स्नेही डॉ. दत्तात्रय दिनकर पुंडे यांनी केली आहे. त्यांनी आस्थेने धडपड केली नसती तर इतक्या चांगल्या रीतीने व अल्पावधीत हा संग्रह प्रसिद्ध झाला असता, असे मला वाटत नाही.
कोणत्याही समीक्षकाचे पुस्तक हाती घेतले की त्यावरून त्याला आवाहन करणारे ग्रंथकार व ग्रंथकृती कोणत्या हे तत्काळ लक्षात येते. या संग्रहातील डॉ. केतकरलिखित ‘ब्राह्मणकन्या’वरचा लेख मी विद्यार्थी असताना लिहिला आहे आणि ‘गंगाधर गाडगीळांची कथा’ हा लेख या वर्षी लिहिला आहे. सुमारे ३०-३१ वर्षांतील मला भावलेले हेच ग्रंथ आणि ग्रंथकार का, असे कोणी विचारल्यास ‘माझ्या मनाची विशिष्ट जडणघडण’ असे मी म्हटल्यास त्याने प्रश्नकर्त्याचे समाधान होण्यासारखे आहे. परंतु हे उत्तर म्हणजे पूर्ण सत्य आहे, असे नव्हे. कारण काही एक दृष्टी ठेवून लेखांची निवड केली गेली असल्याने यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या लेखांचा या पुस्तकात समावेश केला गेला नाही, इतकेच.
भीमराव कुलकर्णी