60 140
Download Bookhungama App

जगाला प्रेम अर्पावे - लीलावती भागवत

Description:

पूज्य साने गुरुजींनी ‘खरा तो एकची धर्म’ या काव्यातील प्रत्येक कडव्यात जे मौलिक असे मानवतावादी विचार मांडले आहेत त्या प्रत्येक विचारांवर एकेक कथा लीलावती भागवत यांनी लिहिली आहे.निवेदन ‘खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे’ ही सर्वव्यापी अशा खऱ्या धर्माची अत्यंत मौलिक व्याख्या पूज्य गुरुजींनी आपल्या ‘खरा धर्म’ या अमर काव्यात केली आहे. साने गुरुजी कथामाला हे गुरुजींच्या अनेक स्मारकांपैकी एक स्मारक १९५१ साली गुरुजींच्या जन्मदिनी सुरू झाले. कथामालेने ‘खरा तो एकची धर्म। जगाला प्रेम अर्पावे’ हे आपले ध्येयगीत ठरविले व ‘करी मनोरंजन जो मुलांचे। जडेल नाते प्रभुशी तयाचे’ ही आपली निष्ठा मानली. साने गुरुजी कथामालांच्या सर्व केंद्रांवर ‘खरा धर्म’ या समूहगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ होत असतो. साने गुरुजींबद्दल नितांत आदर बाळगणारे व मुलांचे लाडके संगीत दिग्दर्शक श्री. वसंतराव देसाई यांनी या गीताला अत्यंत सुरेल व भावपूर्ण चाल दिली व त्याबरहुकूम सर्वत्र हे गीत गायिले जाते. या ध्येयगीतात साने गुरुजींनी खऱ्या मानव्याला पोषक अशा विचारांची अत्यंत सोप्या भाषेत गुंफण केली आहे. माथेरान येथे पंधरा-वीस वर्षांपूर्वी कथामालेतर्फे कथानिवेदकांचे एक शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिराला सौ. मालतीबाई बेडेकर, सौ. कृष्णाबाई मोटे, श्री. भा. रा. भागवत, सौ. लीलावती भागवत, श्री. शिरूभाऊ लिमये, श्री. यदुनाथ थत्ते, श्री. राजाभाऊ मंगळवेढेकर आदि अधिकारी व्यक्तींनी मार्गदर्शन केले. त्या वेळी लीलावती भागवत यांनी आपल्या भाषणात पूज्य साने गुरुजींनी ‘खरा तो एकची धर्म’ या काव्यातील प्रत्येक कडव्यात जे मौलिक असे मानवतावादी विचार मांडले आहेत त्या प्रत्येक विचारांवर एकेक कथा लिहून त्यांचे जर मुलांच्यासमोर निवेदन झाले तर संस्काराचे दृष्टीने उपयुक्त कार्य होईल असे विचार मांडले. त्याच वेळी खाजगीत लीलाबाईंनीच ही जबाबदारी स्वीकारावी अशी मी त्यांना विनंती केली व त्यांनीही ती आनंदाने मान्य केली. तथापि त्यांचे अनेक व्याप व सर्वांचीच कामाची धांदल यामुळे तो विचार गेली वीस वर्षे कृतीत येऊ शकला नाही. चार महिन्यांपूर्वी आदरणीय मामा क्षीरसागर यांच्या चरित्राच्या जुळणीनिमित्त लीलाताईंची व माझी मुंबईला भेट झाली. मागची आठवण होतीच. लीलाताईंना त्याचे स्मरण करून दिले आणि त्यांनी तितक्याच तत्परतेने ‘जगाला प्रेम अर्पावे’ या कथा लिहून देण्याचे आश्वासन दिले व प्रत्यक्ष लिखाणास आरंभही केला. “या कथा लिहीत असताना मी एक निराळाच आनंद अनुभवीत आहे. त्याचबरोबर साने गुरुजींसारख्या असामान्य व्यक्तीच्या गीतावर आधारून काही लिहायचे म्हणजे केवढी जबाबदारी आहे याचीही जाणीव असल्याने ते कार्य पूर्ण झाल्यावर मला मनस्वी समाधान वाटले.” अशा आशयाचे लीलाताईंचे मला काही दिवसांपूर्वी जेव्हा पत्र आले, तेव्हा त्यांच्याबद्दलचा माझ्या ठिकाणी असलेला आदर द्विगुणित झाला. महाराष्ट्रात बालकांच्या विकासाची सक्रिय चिंता बाळगणाऱ्या ज्या व्यक्तींबद्दल मला विशेष आदर आहे त्यांत लीलाताई व भा. रा. भागवत यांचा क्रमांक वरचा आहे. त्यांनीच पदरमोड करून महाराष्ट्रातील मुलांना ‘बालमित्र’ मासिकाची भेट दिली. बालगीते, बालकथा, बालकादंबऱ्या, प्रहसने, नाट्यकथा आदि मार्गांनी बालकांशी मैत्री जोडली; आकाशवाणीवर मुलांमुलींना वारंवार बोलावून धिटुकले केले व महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राला अनेक बाल कलावंत मिळवून दिले. कथामालेशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध. कथामालेच्या अनेक केंद्रांतून त्यांचे कथानिवेदन झाले आहे. परिसंवादात मार्गदर्शन लाभले आहे. वार्षिक अधिवेशनात सक्रिय सहभाग मिळाला आहे व हे सर्व कर्तव्यभावनेने त्यांनी केले हे विशेष होय. साने गुरुजींच्या या ध्येय-गीतातील सुविचाराला लीलाताईंनीच कथारूप करावे ही आमची तीव्र इच्छा आज प्रत्यक्ष ‘जगाला प्रेम अर्पावे’ या कथासंग्रहाच्या स्वरूपात फलद्रूप होत आहे हे पाहून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. हा कथासंग्रह पूज्य साने गुरुजींच्या साधना मुद्रणालयातच छापला जावा अशी भावनिक तळमळ होती व त्याला अनेकविध कामे बाजूला सारून साधना मुद्रणालयाचे व्यवस्थापक व सेवक यांनी आत्मीयतेने प्रतिसाद दिला व आकर्षित स्वरूपात हा कथा-संग्रह बालकांच्या भेटीसाठी योग्य मुदतीत छापून दिला. त्याबद्दल अंतरीच्या प्रेमभावना व्यक्त करतो. या पुस्तकाला अत्यंत समर्थक अशी सजावट आमचे चित्रकार मित्र श्री. वसंत सहस्त्रबुद्धे यांनी करून दिली. त्याबद्दल त्यांचे आम्ही ऋणी आहोत. या कथासंग्रहाचे महाराष्ट्रातील बाळगोपाळ, शाळा, संग्रहालये व पालक मंडळी उत्स्फूर्तरीत्या स्वागत करतील व त्यामुळे अशा संस्कारकथा अधिकाधिक प्रकाशित करण्याची त्यातून प्रेरणा मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. - प्रकाश मोहाडीकर प्रस्तुत पुस्तकाची प्रथम आवृत्ती अ. भा. सानेगुरुजी कथामालेने प्रकाशित केली होती, त्यावेळची प्रस्तावना.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि