100 210
Download Bookhungama App

होरपळ - वि. ग. कानिटकर

Description:

महाराष्ट्र शासनाचे १९७४ चे ‘हरि नारायण आपटे’ पारितोषिक मिळालेली कादंबरीकादंबरीविषयी या कादंबरीतील सर्व प्रसंग काल्पनिक आहेत. नेहेमिया नीळकंठशास्त्री गोऱ्हे यांची व्यक्तिरेखा, या कादंबरीत आली आहे. ख्रिस्ती झालेला हा भारतातला पहिला विद्वान कर्मठ ब्राह्मण. परंतु ही कादंबरी चरित्रात्मक नाही. ख्रिस्तवासी गोऱ्हे यांच्या जीवनात, सी. ई. गार्डनर या त्यांच्या मिशनरी चरित्रकाराने नोंदलेल्या काही घटनांचा आधार मी घेतला आहे, इतकेच. ८ फेब्रुवारी १८२५ दिनी गोऱ्हेशास्त्रींचा जन्म. २९ ऑक्टोबर १८९५ या दिवशी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. एकंदर सत्तर वर्षांच्या त्यांच्या आयुष्यातील पहिल्या बत्तीस वर्षांचे जीवन, मी माझ्या कल्पनेप्रमाणे चित्रित केले आहे. ‘इंग्लिश चर्च’चा त्याग करून पुढे शास्त्रीबुवा ‘रोमन कॅथॉलिक’ झाले. फादर गोऱ्हे म्हणून ख्याती पावले. जुन्या पुस्तकांच्या दुकानात, चार वर्षांपूर्वी, गार्डनर यांनी लिहिलेले, १९०० साली प्रसिद्ध झालेले, फादर गोऱ्हे यांचेवरील पुस्तक मला दिसले. या पुस्तकात १८५५ ते ५७ या कालखंडाविषयी खालील वाक्ये मला आढळली- “Mutiny had begun. Beneras had to look away from Nehemiah. All persons had to take sides one way or the other. The little native Christian Community, knew too well, what side they had to take. They stood firm to the British Govt. to a man.” (पृ. १०३, १०५) (बंड सुरू झाले होते. बनारसला नेहेमियांचा विचार दृष्टीआड करायलाच हवा होता. सर्वांनाच कुठली तरी एक बाजू घ्यावी लागणार होती. ख्रिस्ती झालेल्या नेटिव्ह अल्पसंख्य लोकांना कुणाची बाजू घ्यायची, हे नेमके ठाऊक होते. ब्रिटिश सरकारच्या बाजूने सर्वजण एकदिलाने उभे राहिले.) १८५६-५७ या कालखंडाविषयी २४ ऑक्टोबर १८८९ या दिवशी फादर गोऱ्हे यांनी लिहिले आहे- ‘‘१८५६-५७ च्या सुमारास, माझ्या मनात येशूच्या देवत्वाविषयी (Divinity of Christ) शंका त्रास देऊ लागल्या. मला वाटले होते की यावर मी समाधानकारक उत्तरे मिळविली होती. परंतु आज ही उत्तरे मला पुन्हा असमाधानकारक वाटू लागली आहेत व शंकाकुशंका पुन्हा त्रास देऊ लागल्या आहेत.’’ म्हणजे निधनापूर्वी सहा वर्षे, फादर गोऱ्हे यांच्या मनात ५६-५७ या कालखंडात निर्माण झालेले संदेह पुन्हा निर्माण झाले होते. हे संदेह नेमके ५६-५७ या कालखंडातच का निर्माण झाले असावेत? ५७ च्या उठावणीमुळे या संदेहांना काही नवी क्षितिजे मिळाली असतील का? या प्रश्नांनी माझ्या मनात कादंबरीचे बीज वाढू लागले. या दृष्टीने तेव्हापासून मी अवांतर वाचून सुरू केले. कादंबरीत यासाठी वामन थत्ते, निरादबाबू, गणेश रामशास्त्री, मैना, सुरजितसिंग, ज्वालाप्रसाद अशी कमीअधिक महत्त्वाची पात्रे कल्पनेने आणावी लागली. या सर्वांच्या संबंधात कादंबरीत जे जे घडलेले दाखवले आहे, त्याला फादर गोऱ्हे यांच्यासंबंधीच्या उपलब्ध चरित्रात मुळीच आधार नाही. मला ही रचना, कादंबरी म्हणूनच वाचकांपुढे ठेवायची आहे. या दृष्टीने एवढा खुलासा पुरेसा वाटतो. कादंबरी लिहीत असताना, काही महत्त्वाच्या धर्मविषयक बाबींची चर्चा वेळोवेळी करावी लागत होती. माझे मित्र विद्याधर पुंडलिक यांनी यासाठी लेखन चालू असताना मला आपलेपणाने ही सोबत दिलेली आहे. - वि. ग. कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि