60 140
Download Bookhungama App

गीत ये न ते जुळून - डॉ.सुनील अणावकर

Description:

अमेरिकेत वास्तव्य असलेले डॉ सुनील अणावकर आपल्या कन्सल्टन्सी व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून लेखन करतात. त्यांच्या कथा विविध मासिके / पत्रिकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या "मीनाकुमारीच्या शोधात" या कथासंग्रहाबरोबरच त्यांचे "गीत ये ते ने जुळुनी" हे दोन अंकी मराठी नाटक आम्ही प्रकाशित करीत आहोत.. या नाटकाची कल्पना ए.आर. गर्नी यांच्या "लव लेटर्स " आणि जावेद सिद्दिकी यांच्या "तुम्हारी अमृता" या दोन नाटकांपासून सुचली आहे.अंक पहिला मकरंद - “हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डियर लीसा, हॅपी बर्थडे टू यू!” फार मजा आली तुझ्या वाढदिवसाला. खूप एंजॉय केली मी तुझी पार्टी. केक पण अगदी मस्त होता. तुला खरं सांगू का? मी आयुष्यात पहिल्यांदाच केक खाल्ला. खूप आवडला मला. तुझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनी म्हटलेली गाणी, नाच - सगळं काही खूप खूप आवडलं मला. तुझ्या मम्मीनेही हिंदी सिनेमातलं ते “बार बार दिन ये आये” हे बर्थडेचं गाणं किती छान म्हटलं! ते गाणं सारखं रेडियोवर लागतं. खूप लोकप्रिय झालंय. मलाही पाठ झालंय. वाढदिवस अशा पद्धतीनेही साजरा करतात ते मला ठाऊकच नव्हतं. आमच्या घरी वाढदिवस वेगळ्याच पद्धतीने साजरे होतात. माझ्या वाढदिवसाला माझी आई चांदीच्या ताटात वरण-भात, तूप, एक दोन माझ्या आवडीच्या भाज्या, पुरणपोळी किंवा श्रीखंड वगैरे प्रकार वाढते. ताटाभोवती एक सुंदर रांगोळी काढते. “हॅपी बर्थडे”चं गाणं नाही, डान्स नाहीत आणि केक तर नाहीच. म्हणजे अगदी मराठी चित्रपटासारखं. तुझा बर्थडे हिंदी पिक्चर सारखा झाला. काही महिन्यांपूर्वीच माझा वाढदिवस झाला. तेरा वर्षे पूर्ण झाली. तुझं तेरावं वर्ष आता सुरू झालं ना? जपून रहा हं. मुलींच्या बाबतीत ‘तेरावं वरीस धोक्याचं’ असं म्हणतात ना? एक गाणं पण आहे तसं. खरं म्हणजे मला माझी आई तुला प्रत्यक्षात भेटून तुझे आभार मान म्हणून सांगत होती. पण मला हिम्मत नाही झाली. म्हणून मी हे पत्र सुगंधाताई म्हणजे माझ्या बाबांच्या कपौंडरच्या बायकोबरोबर पाठवतोय. ती आमच्या घरचीही कामं करते अधून मधून. आणि तुला ती ओळखते म्हणे. ती तुला हे पत्र लपवून आणून देईल. इतर कोणालाही कळणार नाही. मी तिला अख्खा रुपया दिलाय या कामासाठी. तेव्हा तुला तिला आणखी वेगळं काही देण्याची गरज नाही. तुला उत्तर लिहावंसं वाटलंच तर तेही तिच्याकडेच दे. आणि हो. तुझ्या वाढदिवसाला मला बोलावल्याबद्दल तुझ्या आजीलाही माझे थँक्स दे!


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि