60 116
Download Bookhungama App

फास्टर फेणेच्या गळ्यात माळ - भा.रा.भागवत

Description:

भा रा. भागवत यांच्या फास्टर फेणेच्या साहसकथा मालिकेतील आणखी एक साहस कथा‘‘ चल- जरा खाली जाऊन येऊ. ’’ बनेश ऊर्फ फास्टर फेणेची ही सूचना सुभाष देसाईने मानली. लगेच दोघांनी सायकलीवरून उड्या टाकल्या आणि वाहने हातात धरून ते त्या उताररस्त्यावरून नदी किनाऱ्याकडे निघाले. दोन दिवस धो धो कोसळत असलेला पाऊस थांबून आज चांगले स्वच्छ ऊन पडले होते. संगमावरच्या त्या लहानशा दगडी घाटावर फारशी माणसे दिसत नव्हती. फक्त पाच-सहा पुरुष; आणि तेही आता परतायला निघाले होते. त्यांच्या अंगावरची धूतवस्त्रे नि खांद्यावरचे पंचे यावरून ही मंडळी कुणातरी आप्ताचे बारावे उरकायला आली असावीत ही गोष्ट स्पष्ट दिसत होती. रक्षाविसर्जन करण्यासाठी ज्या होडीत बसून हे नदीच्या पात्रात अंमळ दूर जाऊन आले होते, तिचेही काम आता उरकले होते. होडीवाल्याच्या दृष्टिपथात दुसरे गिऱ्हाईक नव्हते- ही सायकलवाली कार्टी थोडीच कुणाची हाडं बोळवायला आली असणार ? त्यांना फक्त आईबापांची नि मास्तरांची हाडं घुसळणं एवढंच माहीत !- त्यामुळं नावाडीदादांनी केव्हाच होडी काठापासून दूर हटवली होती. घाट आता संपूर्ण मोकळा होता. पण आमच्या या बालवीरांना पेन्शनरांसारखे घाटावर जाऊन बसायचे नव्हते. त्यांना नदीकाठच्या पावसाळी रानातून सैर करायची होती. ‘‘ आपल्या सायकली लॉक करून इथेच ठेवू अन् जाऊन येऊ चांगले फर्लांगभर दूर ! ’’ फास्टर फेणे म्हणाला आणि त्याप्रमाणे ते सायकलींना टाळी ठोकताहेत तोच त्या निर्जन वाटणाऱ्या नदीकाठाकडून त्याच्या कानांवर काही शब्द येऊन आदळले - ‘‘ गेले का मेले एकदाचे पाण्यात राख शिंपून ! ’’ ‘‘ गेले बरं ! आता तुला मनसोक्त पाण्यात डुंबायला हरकत नाही. आणि ते तिकडे घाटावर होते, तुला काय करणार होते ते ? पण मला तरी सालं राहून राहून नवलं वाटतयं, की तुला ही नदीस्नानाची अवदसा कुठून आठवली ? आणि मुहूर्त तरी बरा शोधायचास ? आज आहे गटारी अमावस्या !


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि