60 116
Download Bookhungama App

फास्टर फेणेची काश्मिरी करामत - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या फास्टर फेणे मालिकेतील आणखी एक साहसकथा.‘‘ ब-ब-ब-ब-बन्या, ऊठ ! तुझी खिंड आली ! ’’ मालीने दिलेल्या कोपरखळीने बनेश ऊर्फ फास्टर फेणे खडबडून जागा झाला. ‘‘ माले, कशाला गं एवढ्या काळोख्या रात्री उठवलंस मला ? ’’ तो कुरकुरला. ‘‘ काळोखी रात्र ? ’’ माली म्हणाली. ‘‘ डोळे उघड. बाहेर चांगलं उजाडलंय बघ. ’’ बन्याने डोळे चोळीत पाहिले. बाहेर बर्फाच्छादित डोंगरांच्या कडा चमचम करीत होत्या खऱ्या. पूर्व क्षितिजाला गुलाबी छटा चढलेली होती. फिकीच, पण बर्फाला चकाकी द्यायला ती पुरेशी होती. बन्या आता चांगलाच जागा झाला होता. तो म्हणाला, ‘‘ माझी खिंड काय म्हणालीस ? ’’ ‘‘ तुझीच ! ’’ मालीने हसून उत्तर दिले. ‘‘ बन्याल खिंडीत आलोत आपण. ’’ ‘‘ वा रे ज्योक ! ’’ बन्या पुटपुटला, ‘‘ आणि खरं नाव मुळी बनिहाल आहे. ’’ माली हसली. बन्याचीच खिंड, कारण फास्टर फेणे ती गाजवणार आहे, असे वेडेवाकडे भाकीत तर त्या पोरीला जाणवले नव्हते ? किडकिडीत पण तुडतुडीत फास्टर फेणेची ओळख तुम्हाला नव्याने करून द्यायला नकोच. ही माली म्हणजे फास्टर फेणेची मामेबहीण. पुण्यात कसबा पेठेत राहणारे बन्याचे एक गुलहौशी मामा तुम्हाला ऐकून माहीत आहेत; त्यांची मुलगी. मामा-मामींनी ही काश्मीर ट्रिप काढली तेव्हा बन्यालाही त्यांनी बरोबर घेतले होते; पण एका अटीवर ‘‘ तिथं नॉर्मल मुलासारखं वागायचं. रणगाडे, चिनी हेर अन् पॅराशूटच्या गोष्टी करायच्या नाहीत. ’’ माली म्हणाली होती, ‘‘ बाबा, युद्ध केव्हाच संपलं. आता रणगाडा नि पॅराशूटच्या गोष्टी कशाला हव्यात ? ’’ गंमत अशी की, युद्ध संपले तरी हेरगिरी संपत नसते; त्याला बन्या काय करणार ? आणि रणगाडे, पॅराशूट म्हणाल तर त्यातल्या फिफटी पर्सेंट गोष्टी टळणार नाहीत असा जर विधिसंकेतच असेल, तर त्याला तरी बन्या काय करणार ? बन्याचा तुम्ही हात धराल एक वेळ - नाही, दहा वेळ - पण ब्रह्मदेवाचा हात कुणी धरला आहे ? म्हणून मामाच्या अटीवर फास्टर फेणेने नुसते ओठ उघडून ‘ ट्टॉक ’ केले. तो काहीच बोलला नाही, तेव्हा मौनं संमतिलक्षणम् म्हणून मामांना त्याचा तो होकार मानणे भाग पाडले होते. शिवाय मालीनेही आपल्याकडून एक अट घातली होती. ती म्हणजे ‘ बन्या इज ए मस्ट. ’ तिच्या मते बन्या नाही तर ती ट्रिप कसली ? मामा त्यावर गंभीर तोंडाने म्हणाले होते, ‘‘ खरं आहे तुझं म्हणणं. हा बन्या प्रत्येक ट्रिप सार्थ करतो यात शंका नाही. तुला ‘ टु ट्रिप ’ या क्रियापदाचा अर्थ माहीत आहे माले ? ’’ ‘‘ नाही. ’’ ‘‘ कशाला तरी अडखळून पडणं. ’’ मामा गालांतल्या गालांत हसून म्हणाले. ‘‘ हा पोरगा बरोबर असला की, आपण कुठेतरी ठेचा खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं ! ’’ मग जरा थांबून ते पुढे म्हणाले होते, ‘‘ ठीक आहे, बन्याला घेऊ आपण बरोबर. कारण मेजवानीत काय किंवा सफरीत काय, ठेचा खाणं इज ए मस्ट. त्याशिवाय मजा नाही ! क्यों ? ’’ आणि मामासाहेबांच्या ढिसाळ ज्योकवर मामींनी नाक मुरडले असले तरी माली मनमुराद हसली होती. एवढंच, बन्या ऊर्फ फास्टर फेणे सहलीत सामील झाला होता. वाचा पुढे काय होतं...


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि