क्रिकेट क्षेत्रात श्रेष्ठत्व पावलेल्या गेल्या शंभर वर्षांतील प्रभावशाली व्यक्ती
मनोगत
क्रिकेट लेखक श्री. अरविंद ताटके मला फार पूर्वी म्हणाले होते की, “तुम्ही जॉन मॉईसप्रमाणे शंभर क्रिकेटरांचा परिचय लिहा.” दरवेळी भेटले की ते हेच सांगायचे!
त्यांचा लकडा लागला होता खरा, पण एवढा अभ्यास आपल्या हातून कसा होणार, पुरेसा वेळ मिळणार का वगैरे अनेक प्रश्न त्या वेळी भेडसावत होते. त्यामुळे हे ‘शतक’ आपल्या हातून काढले जाणार नाही असेच वाटत होते. पुढे केव्हा तरी हे शतक काढले गेलेच तर त्याला जॉनी मॉईसची सर कधीच येणार नाही हेही मी पक्के जाणून जातो. त्यामुळे धीर होत नव्हता.
मध्यंतरीचा बराच काळ लोटला. ताटक्यांचा आग्रहही विसरला गेला. कुणी प्रकाशकही पुढे येत नव्हता.
पण एवढ्यात श्री. सुधाकरराव जोशी यांनी १०१ क्रिकेटपटूंची कल्पना माझ्यासमोर मांडली. मागचा पुढचा विचार न करता मी चटकन् पुस्तक लिहिण्याचे मान्य केले.
प्रथम जॉनी मॉईस वाचून काढला, पण त्यात बऱ्याच जुन्या खेळाडूंचा परिचय आहे. त्यांपैकी काही तर आज पूर्णपणे विसरले गेलेत. त्यांच्यावर लिहून काही उपयोग नव्हता. जॉन मॉईसचे पुस्तक जुने असल्याने त्यात अर्थातच नवे खेळाडू नाहीत.
जुन्यांपैकी जे गाजलेले आहेत व ज्यांची नावं आजही घेतली जातात अशा खेळाडूंबरोबर जर गेल्या २० - २५ वर्षांतले नावाजलेले खेळाडूही निवडले आणि त्यांच्यावर लिहिले तर ते वाचकांना आवडेल असा विचार करून मी निवडीच्या कामाला लागलो.
पण हे काम वाटते तितके सोपे नाही हे लगेच लक्षात आले. अमक्याला का निवडायचे आणि तमक्याला का निवडायचे नाही हे ठरवणे अवघड होते.
क्रिकेट-इतिहासातील ११२ वर्षांचा अथांग सागर पुढे पसरलेला. आजवर आठ देशांतील खेळाडू बाराशे टेस्टसमध्ये आपली हजेरी लावून गेलेले. त्यांतले बरेच जण एकापेक्षा एक पराक्रम गाजवणारे. काहींनी शतकांची मालिका रचलेली तर काहींनी शेकडो विकेटस् घेतलेल्या. काहींनी यष्टीरक्षणात नाव कमावलेले.
शेवटी एक यादी तयार केली.
ती बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवली- इंग्रज लेखक नेहमीच भारतीय खेळाडूंवर अन्याय करतात. स्वतःच्या परिचयात्मक पुस्तकात इंग्रज खेळाडूंचाच भरणा करतात. त्याखालोखाल त्यांना ऑस्ट्रेलियन् क्रिकेटर्स प्यारे! नंतर वे. इंडिजचा नंबर. आणि सगळ्यात शेवटचा नंबर भारतीय खेळाडूंचा! ती संख्या अत्यल्प!
जॉनी मॉईसच्या पुस्तकात इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडूच जास्त आहेत, आणि भारतीय कमी.
हा अन्याय दूर करण्यासाठी आपल्या पुस्तकात भारतीय खेळाडूंचा नंबर इतर देशांपेक्षा जास्त ठेवायचा, असे मी ठरवले. त्याखालोखाल इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वे. इंडिज, द. आफ्रिका, न्युझीलंड, पाकिस्तान व श्रीलंका असे क्रम मी लावले.
क्रम पक्के झाले तरी निवडीचे काम जिकीरीचेच होते. लेकर का ठेवायचा, लॉक का नको? ट्रेव्हर बेलीला का वगळायचे? निस्सर, अमरसिंग, दत्तू फडकर, रमाकांत देसाई हे का निवडायचे नाहीत? मजीदखान, सलीम मलिक, असिफ इक्बाल किंवा इंतिखाब आलम् यांची निवड का करायची नाही? माझे आवडते खेळाडू रंगा सोहोनी, मुस्ताक अली, अब्बास अली, आर्थर मॉरीस, टॉम ग्रेव्हनी, जेफ स्टॉलमेयर यांना बाजूला का ठेवायचे?
पण रंगा सोहोनीसारख्याला घ्यायचे म्हणजे कोणाच्या जागेवर घ्यायचे हा प्रश्न महत्त्वाचा असल्याने माझा नाइलाज झाला. खेळाडू अनेक पण मर्यादा मात्र शंभराचीच! त्यामुळे आवडते खेळाडूही वगळणे भाग पडले.
यासाठी ज्यांनी क्रिकेटच्या इतिहासावर आपला ठसा उमटवलाय त्यांचाच इथे मी विचार केलाय. चाळीस चाळीस टेस्टस् खेळणारा एखादा खेळाडू असतो. पण त्याने स्वदेशातील क्रिकेटवर ठसा उमटवलेला नसतो. या उलट दहा टेस्टस् खेळणारा विजय मर्चंटसारखा खेळाडू मात्र ठसा उमटवून गेलेला असतो. कारण गावसकरची तुलना मर्चंटबरोबरच केली जाते. त्या चाळीस टेस्टस् खेळणाऱ्या खेळाडूबरोबर नाही! यामुळे मर्चंटसारख्यांचा मी पुस्तकात आवर्जून समावेश केलाय.
याशिवाय निवड करताना खेळाडूचे विक्रम, पराक्रम, निराळे वैशिष्ट्य, अफलातून गुण वगैरे निकष मी लावलेत. त्याचमुळे विक्रमी गावसकरबरोबर एकनाथ सोळकरसारख्या एका गुणी खेळाडूचाही परिचय करून देणे मला अगत्याचे वाटले.
जेव्हा बरेच खेळाडू समान दर्जाचे असतात, किंवा ज्यांची कामगिरी समपातळीची असते अशा वेळी सर्वांची निवड न करता त्या वर्गाचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्यापैकी एकाचीच निवड केली आहे.
पाकिस्तानमध्ये यष्टीरक्षक बरेच झाले. पण त्या सर्वात दीर्घ काळ खेळलेला, कप्तान झालेला, जास्तीत जास्त विकेटस् घेणारा एकच वासिम बारी होऊन गेला. त्यामुळे इथे त्याचीच निवड केलेली आहे. इतरांचा विचार करणे आवश्यक वाटलेले नाही.
क्रिकेटची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली. त्यामुळे त्या देशाचे खेळाडू निवडताना जे क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाची स्थित्यंतरं घडवू शकले त्यांचाही इथे मी मुद्दाम विचार केलेला आहे. हेतू हा की, त्यांचा परिचय करून घेता घेता क्रिकेटच्या इतिहासात कसा कसा बदल होत गेला हे तुम्हाला कळावे. म्हणूनच सुरुवात डॉ. डब्ल्यू. जी. ग्रेस, रणजी, व जॅक हॉब्ज यांचेपासून केली आहे.
हे सगळे असले तरी अमूक खेळाडू का निवडला नाही अशी कुणाकुणाची तक्रार राहाणारच. पण त्याला माझा इलाज नाही.
त्यांनी आपली तक्रार जरूर श्री. सुधाकरराव जोशी यांचेकडे गुदरावी म्हणजे, दुसरे शतक काढण्यासाठी ते मला ‘स्टॅण्ड’ देतील!
‘दुसरे शतक’ होईल तेव्हा होवो. पण शंभर चांगल्या खेळाडूंचा अभ्यास करण्याची संधी दिल्याबद्दल मी श्री. सुधाकररावांचा व उत्कर्ष प्रकाशनचा अत्यंत आभारी आहे.
खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा व प्रत्येक खेळाडू हा शक्यतो एक दोन पानातच बसवावा ही दुसरी मर्यादा. या मर्यादेत राहून पुस्तक लिहिणे थोडे कठीणच. तरीही इथे जो प्रयत्न केलाय तो वाचकांना आवडावा.
- बाळ ज. पंडित