Id SKU Name Cover Mp3
इदं न मम


60 138
Download Bookhungama App

इदं न मम - अनुताई भागवत

Description:

प्रत्यक्ष रुग्णांनी जिद्दीने प्रयत्न केल्याशिवाय कुष्ठसमस्या सुटू शकणार नाहीत. ही खात्री झाल्याने सुरवातीपासून कुष्ठरोग्यांना प्रयत्नशील करण्याचा प्रयत्न तपोवनाने सतत केला. म्हणूनच प्रथमपासून ज्यांनी तपोवनकार्यात सहकार्य केले त्यांच्याच कथनांचे हे शब्दांकन.प्रस्तावना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांनी राष्ट्रपित्याच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीचे-कुष्ठनिवारणाचे काम हातात घेतले. स्वातंत्र्यापूर्वी वा नंतर, ध्येयवाद व त्यासाठी साधना या जीवनक्रमात फरक पडला नाही. स्वरूप बदलले असेल, पण निष्ठा, तळमळ व तपश्चर्या तीच होती. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी केलेल्या त्यागाचा मोबदला मिळण्याचा काळ आला असूनही, त्याचा मोह होऊ न देणाऱ्या वेड्या देशभक्तांच्या रांगेमध्ये दाजीसाहेब आघाडीवर होते. त्यामुळे स्वातंत्र्यापूर्वी वा नंतर, कारणे बदलली तरी त्यागाचे स्वरूप बदलण्याचे कारण नव्हते. त्यांनी यज्ञ विझू दिला नाही. तो त्यांनतरही पेटतच राहिला. उलट त्यानंतरच्या क्षेत्राची व्याप्ती मोठी होती, व जोखीमही आणि त्यासाठी स्वातंत्र्यापेक्षा त्याग, तितिक्षा व कष्टांची आवश्यकता होती. हा एकदम प्रज्वलित होऊन व जगाचे डोळे दिपवून विझून जाणारा जाळ नव्हता, तर ‘भातारेवीण’ करावा लागणारा नित्यनवा अग्निप्रवेश होता. हे अग्निदिव्य दाजीसाहेबांनी जुन्या झपाटलेपणाने सहकुटुंब पत्करले व तपोवनाची स्थापना झाली. तपोवनाची स्थापना ते त्याचा त्याग; हा ३७ वर्षाचा कालखंड श्रीमती अनुताई भागवत ह्यांच्या प्रस्तुत पुस्तकात शब्दांकित झाला आहे. या कालखंडाबद्दल बाहेरच्या जगाला कुतूहल होतेच. ते जगावेगळे, जगाला भयप्रद वाटणारे व घृणास्पद ठरलेले काम दाजीसाहेबांनी पत्करणे हे त्या काळी एक न उलगडणारे साहस होते. ख्रिस्ती मिशनरी, गांधीजी, मनोहरजी दिवाण यांनी आतापर्यंत ही वेगळी वाट तुडवण्याचे साहस केले होते. या वाटेवर अडचणी वा आपत्ती मळवाटेपेक्षा अर्थातच अधिक असणार. या वाटेवर आपले पहिले पाऊल ठेवताना दाजीसाहेबांनी जी बंधने स्वतःवर घालून घेतली, त्यामुळे अडचणींची संख्या व रौद्रता अधिकच वाढली. पण त्यातूनच जिद्द वाढली. परिणामी काम वाढले, कामाची अंगोपांगे वाढली. प्रतिसादही वाढला. उपलब्ध ओहळांची अनुकूलता लाभली नाही, तरी अकल्पित कातळातील झरे गावले. रुग्णांचे व्याधिनिवारण, त्यांना दिलासा या मार्गाने त्यांचा गाजलेला पुरुषार्थ जागृत करून त्यांना निर्वाहाच्या बाबतीत स्वावलंबी बनवणे, त्यांची आत्मनिर्भरता व आत्मप्रत्यय वाढवणे, त्यांचे सामाजिक पुनर्वसन आणि या शापितांच्या कर्तृत्वाची सकस फलिते निकोपांच्या जगाच्या कारणी लावणे -इथपर्यंतची वाटचाल तीन तपांमध्ये झाली; आत्महीनता, भिक्षावृत्ती व लाचारी यांची शिकार न होता सामाजिक प्रतिष्ठेच्या दिशेने, त्यांची वाटचाल सफल झाली. ही तीन तपे संकटांची, संघर्षाची व आव्हानांची होती; स्वीकृत कार्य व परमेश्वर यांच्यावरील श्रद्धेने या प्रतिकूलतेवर मात करता आली. शाळा, वाचनालय, नियतकालिक, कलापथक, व्यायामशाळा, यासारख्या विविध उपक्रमांची वाढ वेगाने होऊ लागली, व ‘कृतं त्वया तपोवनम् उपवनम् इतिपश्चामि’ असे एखाद्या सहृदय पाहुण्याने म्हणावे, एवढा कायाकल्प त्या उजाड माळरानावर घडून आला. परित्यक्तांच्या कर्तृत्वाचे एक प्रेरणादायक नंदनवन उभे राहिले. हे सर्व दाजीसाहेबांच्या स्वप्नांचे, आकांक्षाचे व साधनेचे जग या पुस्तकात आपल्यांला भेटते. भेटत नाहीत ते फक्त दाजीसाहेब. एका कठोर अलिप्तपणे ते या पुस्तकात अदृश्य राहिले आहेत. पराकोटीची प्रसिद्धीविन्मुखता, श्रेयाबाबतची विरक्ती व ईश्वरार्पण वृत्ती यामुळे दाजीसाहेब या पुस्तकात आपल्याला दिसत नाहीत. पण विश्वसंसारातील परमेश्वराप्रमाणे ते अदृश्य असले, तरी त्यांचे सर्वव्यापी अस्तित्व आपल्याला शब्दाशब्दातून सर्वत्र जाणवते. शब्दाशब्दातून, क्वचित् अवतरण चिन्हांच्या मखरातील उद्गारांच्या रूपाने ते झळकून जातात. एरव्ही विलक्षण व्रतस्थ वृत्तीने ते जाणीवपूर्वक अव्यक्त राहिलेले आहेत. ज्याच्या प्रेरणेतून व आशीर्वादाने तपोवनातील आजचे विश्व निर्माण झाले, त्याच्या चरणी अत्यंत निर्ममपणे हे श्रेय समर्पित करून, जणु दाजीसाहेब प्रणिपातपूर्वक बाजुला झाले आहेत. शेवटच्या पर्वातील शासनाशी झालेला संघर्ष या पुस्तकात प्रतिबिंबित झाला असला तरी त्याची तीव्रता व तप्त प्रतिक्रिया यांची झळ अक्षरांपर्यंत पोचू न देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. दाजीसाहेबांनी अटीतटीचे मार्ग का पत्करले? टोकाचे निर्णय का घेतले? स्वतःच्याच तेजस्वी आयुष्याकडे पाठ फिरवून विजनात जाण्यासाठी पाऊल का उचलले? अंती सीमेच्या विरक्त वृत्तीने शांतपणे आत्मविसर्जनाची वाट का धरली? या प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळणार नाहीत. मुळात या पुस्तकाचे ते आश्वासनही नाही. तथापि या अनुत्तरित प्रश्नचिन्हांचा हूक पायामध्ये अडकल्यामुळे निवेदनाची गती स्खलित झाल्याचे जाणवल्याशिवाय राहात नाही. महापुरुषांच्या जीवित काव्यांचा शेवटचा सर्ग प्रत्यक्ष अनुभवलेल्या त्यांच्या समचित्त कन्येने आत्मनिष्ठेचा आळ न येऊ देण्याच्या कसोशीने हा वस्तुनिष्ठ वृत्तांत दिलेला आहे. विचक्षण वाचकाला यात लेखिकेच्या मनाची ओढाताण व घालमेल निश्चितच जाणवेल. पण ॠषिवचनाचे बंधन, व सत्यासत्याची ग्वाही देणारे निःसंग मन यातून लेखिकेने विलक्षण संयमाने व सुजाणपणे वाट काढली आहे. म्हणून तीन तपांच्या मौनाचे एवढे तरी दार किलकिले होऊ शकले, याबद्दल आपण अनुताईचे आभारच मानले पाहिजेत. - राम शेवाळकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि